Kaayguru.Marathi

शुक्रवार, जानेवारी १४, २०२२

मकरसंक्रांत


श्रीविघ्नहर्ता घालितो तुला मी विनम्र दंडवत
सकल  जनांसी बळ दे करु कोरोनावर मात

सूर्यदेवा ! उत्तरायण  होऊ  दे तू आता सुखी
दुःख  दैन्य  घालव उमलू  दे  गोड शब्द मुखी

गुळ-साखरेची गोडी अन् स्निग्धता तिळाची
तिळातिळाने  वाढावी नाती स्नेह-सौख्याची

देवा, तू  दाता ! पूर्ण  कर ही मनीची इच्छा !
आनंदाने  देतो  प्रभो  मी तुमच्या  कृपेने हो 
मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा !
        
       ©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, जानेवारी १३, २०२२

पोरा , ऐंक ना जरा !

पोरा , ऐंक ना जरा!

पोरा बैस  न् जरा जवळ ऐंक रं माझ्या मनातलं
तुझ्याच रं सुखासाठी  रक्त जाळलं मी उरातलं !

सांगणार  नव्हतो रं पण आज येळच तशी आली
वृद्धाश्रमी घाला थेरड्याला सून सकाळी म्हणली

स्वतः उपाशी राहून मी घास भरवला तुला मुखी
तुझ्या आजारपणी माझ्या मांडीची होती रं उशी

तुझ्या शाळंचा खर्चापायी नाही  केली मौजमजा
आणं... तू शिकून आता  साईब  झाला रं राजा!

तुला  मोठ्ठं  करतांना  मी  लई खाल्ल्या रं खस्ता 
आता म्हातारपणी नको दावू वृद्धाश्रमाचा रस्ता

पोरा, ऐंक ! पेरलं तेच  उगवतं  हा  दैवाचा न्याय 
पटतंय का  तुझ्या मनाला विचार करुन पाहायं !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, जानेवारी १२, २०२२

शिवसूर्य जननी


स्वराज्यजननी राजमाता जिजाऊसाहेब यांना 
🙏🌹शब्दसुमनांनी विनम्र अभिवादन!🌹🙏
                       शिवसूर्य जननी
दशदिशांना काळोख असता
तू झाली सह्याद्रीच्या उषःकाल
तुझ्याच पोटी शिवसूर्य उदेला
जाळीयेला अन्यायाचा काळ 

तुझ्या रुपे प्रकटली भूवरी
अष्टभूजा जगतजननी भवानी
शब्दाशब्दात प्रसवे तुझ्या
दृष्ट दुर्जन संहारक वाणी

अनंत यातना सोसून वर्मी
आऊ ! तू मानिली ना हार
शून्यातून निर्मिले हिंदस्वराज्य
खजील केलेस शत्रू ते चार !

जिजाऊ तुमचे विचारधन
पेरीले हो मी माझ्या हृदयी 
कोटी कोटी विनम्र अभिवादन
करितो आज पावन समयी !🙏
   
🙏🙏🙏🌹विनम्र अभिवादन!🌹🙏🙏🙏
        ©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



मंगळवार, जानेवारी ११, २०२२

मृगनयनी [भूलोळी]

जब तुझे देखा मैंने
प्रिये भासली मृगनयनी
ओ रुप सुहाना दिल में जा बैठा
शोधू का मी कुणी तूच आता माझी राणी !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, जानेवारी १०, २०२२

मानवा समजून घे !

मानवा जागा हो!

मतलबासाठी नेहमीच  पुढे  पुढे
अनंत  कोटी - कोटी अनंत हात
अखेरच्या  क्षणी रे   सरणावरती
शुष्क  लाकडांचीच मिळते साथ !

सुखात  आमचाच  म्हणणारे  ही 
संकटे  येताच  हो पळ  काढतात
अखेरच्या त्या  क्षणी  माणसाला
जमीन  पुरते  हो  साडेतीन  हात

जगी कोणीच  नसतो  रे कुणाचा
सगळेच  म्हणती  हे अंतीम सत्य
तरी  हा  माझा, ती माझी,ते माझे
म्हणतच जगती इथे हे नव्हे असत्य…!

म्हणूनच   म्हणे   हा  " पुरुषोत्तम "
नको  रे  करु  मोह  नको  रे माया
जन्मभर  का   झिजवशी  मानवा
सन्मार्ग  विसरुन  स्वार्थाने काया !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...