२ डिसेंबर :जागतिक गुलामगिरी मुक्तता दिवस !
२ डिसेंबर १९४९ साली संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाची घोषणा करून, कुठल्याही स्वरूपाच्या गुलामगिरीचे जगभरातून उच्चाटन व्हावे म्हणून आवाहन केले होते. त्यानंतर २००२ हे साल आंतरराष्ट्रीय वर्ष या कार्याची स्मृती म्हणून जाहीर झाले होते.
गुलामगिरी हा संघटित गुन्हा आहे व जगभरात त्याचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न, पूर्वकाळापासून होत आले आहेत. हे विसरुन चालणार नाही.पण, ही प्रथा काही देशात-समाजांत निर्धोकपणे सुरु होती.हेही नाकारता येत नाही.
" गुलामगिरी ही श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत असून ज्या व्यवस्थेत माणसांना कोणाची तरी मालमत्ता समजले जाते आणि बळाचा वापर करून काम करायला लावले जाते, तिला सर्वसाधारणपणे ' गुलामगिरी ' किंवा ' गुलामी ' अशी संज्ञा आहे. "
गुलामांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विकत घेण्यात येत असते. काम सोडून जाण्याचा, कामास नकार देण्याचा तसेच कामासाठी मोबदला मागण्याचाही अधिकार त्यांना नसतो.त्यांना ' मानवी हक्क ' नाकारले जातात. अलीकडील काळात जगभरातील बहुतांश ठिकाणी तसं च आपल्या भारतातही गुलामगिरीला कायद्यानेच बंदी घातली असली तरी बेकायदा ती काही स्वरूपात चालू आहेच हे भयावह सत्य आहे.ते म्हणजे-
१) भूकेले व आर्थिक दृष्ट्या गरीब व दरिद्री मुली- मुलांना विविध आमिषांना बळी पाडून त्यांचे अपहरण करणे.
२) गरजू स्त्रियां व पुरुषांच्या व्यापार करून, त्यांना कष्टांच्या कामाला जुंपणे.
३) अल्पवयीन मुली,तरुणी, स्त्रिया यांना लैंगिक भूका भागविण्याच्या कामाला विकणे, वापरणे, जबरदस्ती करून त्यांच्याकडून विविध नीच दर्जाची अमानवीय कामे करवून घेणे.
ही गुलामगिरीची नवी आधुनिक आवृत्ती होय.
२ डिसेंबर २००९ च्या संदेशात युनोचे सरचिटणीस बान की मून म्हणाले होते त्यानुसार,
" गुलामगिरीचे उच्चाटन केवळ कायद्याने होणार नाही. या मोहिमेत गरिबी हटाव, साक्षरता प्रसार, लैंगिक समानता, हिंसेचे उच्चाटन हे कार्यक्रमदेखील अंतर्भूत व्हायला हवेत."
आज ' जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन ' आहे.आजच्या दिवशी आपण गुलामगिरीला विरोध करण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. स्त्रिया, पुरुष व लहानग्यांना जबरदस्तीने गुलाम बनवून त्यांच्याकडून काम करवून घेणे हा गुन्हा आहे.हे समाजाला पटवून देणे आवश्यक आहे.आपण ' आधी मी गुलामगिरी नाकारली, मानवता जोपासली.हे तत्व स्वतः स्विकारु या!' चला तर गुलामगिरीविरोधातील आवाज लोकांपर्यंत पोहचवूया! आजच्या दिवशी हे प्रण घेऊया, त्यांनाही त्यांचे हक्क मिळवून देऊया !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "