Kaayguru.Marathi

बुधवार, सप्टेंबर २२, २०२१

पर्णपिसारा




शिशिराची हुडहूडी
ग्रिष्माची काहिली 
अंगावर झेलली
हरवून गेली... 
पर्णपिसा-याची सिद्धी 
वाजत गाजत
ऋतूराज अवतरले
निराश मना चैतन्य लाभले
प्रितस्पर्शी अंग-अंग मोहरले
रोम-रोमी बहरली
पर्ण पुष्प पिसा-याची सिद्धी..... 


© प्रा.पुरुषोत्तम पटेल, 
मु.पो.म्हसावद

मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१

माझे राणी (भूलोळी)

आप जिंदगी हो मेरी
असं दूर दूर नका जाऊं
आपको मिलने बेकरार दिल
राणी मिठीत घ्यायला आतूर हे बाहू


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बाबा...तुम्ही जगायचंय!

शेतकरीराजा ... जगाच्या पोशिंदा ! पण.. त्याचा कष्टाला मोल नाही ; तो अख्ख्या जगाला पोसतो.पण...त्याला पोसण्याची ताकद कोणत्याही व्यवस्थेत नाही. हेच सर्वात मोठे दुःख होय. इतरांना सहज मिळते ; पण या ख-या राजाला मागुनही मिळत नाही. त्याची स्वप्न कधीच पूर्ण होतांना दिसत नाही.कधी अस्मानी तर कधी सुलतानी(सरकारी) संकटे त्याचा सतत पाठलाग करतात. त्यातच शेतकरी राजाचे आत्मबळ संपते. आणि तो हताश होऊन "आत्महत्येचा "  मार्ग स्विकारतांना दिसतो. एका शेतक-याला त्याचा मुलगा सर्व संकटे झेलून जगण्याची विनंती करतो आहे.


बाबा... तुम्ही हरायचं नाय
आत्महत्येचा इच्चार
डोस्क्यात आणायचा नाय
तुमचं बोट धरुन मला
हे जग वाचायचं हाय...!
तुमच्या प्रामाणिकपणा अन् जिद्द
मला घ्यायची हाय!
हरामाने नव्हं ; घामातून पिकत्यात मोती
हे अख्ख्या जगताला दावायचं हाय!
बाबा तुम्ही तर माझ्या
जगण्याचा कणा हाय
आईच्या कुंकवाचे लेणं हाय
वादळ वारं येवोत कितीही
त्यांची दिशाच मी बदलणार हाय
तुम्ही फक्त माझ्यासवे पाय घट्ट रोवून
उभं राहायचं हाय
आमच्यासाठी तुम्हाला जगायचं हाय!
काळ्या आईशी ईमान जोडणार हाय
सेवा करुन हे जीवन बदलणार हाय
बाबा... तुम्ही फक्त माझं ऐंका..!
हे पाहण्यासाठी तुम्ही जगायचं हाय
आत्महत्येचा इच्चार...
डोस्क्यात आणायचा नाय!

©प्रा.पुरूषोत्तम पटेल
म्हसावद

रविवार, सप्टेंबर १९, २०२१

कवितेची मैत्री

कवितेची मैत्री

कविता असते
अज्ञाताच्या पलीकडची
चित्रकाराच्या कुंचल्यातली
हृदयात साठवायाची...
कवितेचा प्रत्येक टिंब
शब्दाचा प्रतिबिंब...
नकळत एकेक टिंबातून
द्रौपदीचे वस्त्र...
कितीतरी रेशमी
सहस्त्र अर्थ...!

अर्थाची सृष्टी.. आणि
जिव्हाळा भरायचा असतो
मनात काठोकाठ..!
कवितेच्या प्रवासाला असतो
युगायुगाचा पल्ला...
तो गाठतांना
अनुभवाच्या गाठी
घ्याव्या लागतात पाठी
पिढ्यांचा हे संचीत
म्हणूनच... ह्रदयापासून
जपायचे असते
नुसती ठेव म्हणून नव्हे ;
तर... वापरण्यासाठी!
जीवनाच्या समृद्धीला
घेऊन तिच्या आधार
कविता जगायची असते...
जगायची असते..!

©प्रा. पुरुषोत्तम पटेल
मु.पो.म्हसावद

शनिवार, सप्टेंबर १८, २०२१

पत्रलेखन

 आईचे मुलास पत्र…!


प्रिय लेकरा ,

तुला हृदयापासून अनंत आशीर्वाद !

आज तू शिकून सवरुन मोठ्ठा झालास.

नोकरीला लागून साईब झालास.

पण तुला माहित हाय का?

तुला लाहनचा मोठ्ठा कोणी केलाय ते ? नाहीना... ?

मग ऐक तं,कदाचित उद्या मीही नसेन…

लेकरा,अमरत्वाचे वरदान इथे भूतलावरील कोणत्याच मानवप्राण्याला नाय ! हे लक्षात असू दे

जवा तू जनमलास ,तवापासंन तू चार वरीसचा होईस्तो,

सगळं काय मी केलं व्हय ! नाय रं लेकरा …

तुझा जनमापासंनंच तुझं उठणं,बसणं,न्हाऊ-माखू

घालणं,इतकंच काय तुझे लंगोट बदलणं,नवीन लंगोट बांधण,ही सगळी कामं तुझा बाबानं स्वताच केलीत की!

बाळा,तुला सांगते,तुझा जनमापासंनंच माझी पाठ आजारपणानं धरली,

अन् मी सुद्धा चार वरीस खाटेलाच बसून व्हती !

माझंसुद्धा चार वरीसपावेतो उठणं,बसणं, औषधपाणी देणं अन् रांधणं,वाढणं,उष्टी-खरकटी भांडी धुणं-घासणं

ही सगळीच कामं तुझा बाबांनीच केली रं !

तुझे बाबा ते चार वरीस अन् ह्यात असेतो माझी आई 

अन् मैत्तर झाले…अन् तुझी आईही तेच झाले.

तुलाही असं काही जगता यावं म्हणून हा प्रपंच!

बाळा! तुला सांगते,मला आजारपणाने खूपच थकल्यागत वाटे ! तुझ्यासाठीचं दूधही आटलं व्हतं.

तुला दूध प्यायला मिळावं म्हणून त्यांनी द्रोणाचार्य परमाणं पिठात पाणी कालवून दूध पाजलं नाही तुला. तर…स्वतः रातदिन काबाडकष्ट करुन एक गाय विकत आणली.तुझ्या दूधापायी !

त्या गाईचा गुराखी बनुन सांभाळ करणं,चारा-पाणी करणं, शेणं-मूत आवरणंही,

सगळी कामं तुझ्या बाबांनीच केली.का?

तर तुला दूध पिऊन " कृष्ण-बलरामा " प्रमाणं

बलवान होता यावं हे तेंचं सपन व्हतं म्हणून... !

तू जव्हा  दुडुदुडू चालू लागला,चालतांना पडू लागला तर धावत येऊन तुला मी नाय तर तुझ्या बाबांनीच सावरलं.

बोट धरुन चालायला ही त्यासनीच तर शिकवलं बाळा !

तुझा हट्टापायी ते घोडा झाले.तुला पाठीवर घेऊन घरभर फिरले.तू," चल रं घोडा टबऽऽडऽक टऽबऽऽडक " असं बोलून खुष व्हायचा.

तुला सांगते,तू नऊ महिण्याचा अस्ताना,तुला हगवण लागली तुझे हागरे लंगोट बदलणे,ते धुणे हे जीवावर गेले त्यास्नी.पण,एक शब्दानेही त्रागा नाही की राग नाही केला त्यास्नी . तुझ्यासाठी ते सगळं करीत व्हते!

तू काहीच खाईना,पिईना,अन् दिवसरात्र काही केल्या झोपेना...रडून रडून आकांत मांडला व्हतास तू !

चार दिवस तुला छातीशी - कडेवर घेऊन रात्रंदिन तुझी काळजी तुझा बाबांनीच घेतली.ते चार दिवस त्यांनी जागून काढल्या.

घरातली सगळी कामही त्यासनीच आवरली.कशी आवरली एवढी कामं? तेच जाणे !तुला तवा तर कायबी कळेना.तुला न कळणारी गोष्ट आज सांगितली तर खरी नाय वाटायची.जाऊ दे…!तू म्हणशील, " आई-बाबांनी ही काम करणं त्येचं कर्तव्यच सारे की ! " 

तुझं भी खरंच हाय  म्हणा !

पण तू एकदा बोलला व्हता," बाबा, तुम्ही खूप कष्ट करतात.मी त्याचं मोल विसरणार नाही .नोकरीला लागलो न् की तुम्हा दोघांना खूप सुखात ठेवीन मी!

तुमच्या चाकरीला नोकर राखीन की! " 

हे ऐकून आम्हास्नी आभाळ चार बोटं दूर राहिल्याचं वाटलं व्हतं!

लेकरा,आम्ही काही तालेवार नव्हतो,पण तरी तूला शिकवलं,पोटाला चिमटा देऊनच! स्वतः दहा वेळा तुटलेली चप्पल शिवून वापरली.

पण तुला सायबांचे बुट विकत दिधले.

सवताचा घास तुझा मुखात भरवला.तू पोटभर जेवला की मगच  आम्ही जेवलो.तू उपाशी राहायला नको म्हणून…!

तुझा बाबानं सवता ठिगळं लावलेलं धोतर अन् फाटका सदरा व मी सुद्धा ठिगळं लावलेली साडी वापरली,पण तुला महागातली सुटपॅन्ट अन् टयाय का काय ? तो घेऊन दिला." तू साईब व्हावा.हे सपन पुर्ण व्हावं.मग तुझ्यासाठी कायपण..." यासाठी त्येंनी सारी हौसमजा दूर सारली.

 तेंचं व माझं सपन आज पुरं झालं.तू मोठ्ठा सायब झाला.शिकता शिकता शिरमंताची लेक तुला बायको मिळाली.तू लग्नही उरकून घेतलं.त्येचा आम्हाला राग नाय !तुझा संसार सुखात चाललाय.तुला दोन पोरं होऊन ती घरभर हिंडाय लागलीत.कामाला नोकरचाकर ,फिरायला महागडी 

गाडी ...मोठ्ठा राजमहाल वाटावा असं घर आहे म्हणे तुझं! हे ऐकून आम्ही धन्य झालोय!🙏

ही सगळी सुवार्ता मला तुझ्या घरी कामाला असणारी रमाबाई येऊन सांगून गेली. ऐकूण मन भरुन आलं रं पोरा !

आम्ही काय ? जन्माचे दरिंदर,तुला आता कायबी देवू शकणार नाही.जेवढं आमच्या झोळीत होतं ते सर्व तुला देऊन झालं.आता म्हातारे झालो.हातापायातलं बळ संपतं चाललंय.तुला आमची आता गरजच नाय.पण तू आमच्यापासून दूर राहिला तरी त्येचं आम्हाला वाईट नाही. " तू सुखात रहा ! "

" तू खूप सुखात रहा! तुला दुखाचा कधी चटका लागू नये.म्हणून आई अंबाबाईला हात जोडून प्रार्थना! "

आणि बाळा,एक गोष्ट ऐक…चुकलो असू आम्ही तर माफ कर.🙏

रमाबाईचं ऐकूण तुझा बाबाला राहवलं नाही.तू बोलवलं नसलं तरी , ते तुला भेटण्यासाठी आठ दिवसांपुर्वी तुझ्या बंगल्यावर आले.पण,तुझ्या बंगल्याचा गेटजवळच तुझा बाबाला तुझ्या पट्यावाल्यांन अडवलं. 

" ए,भिकारड्या...कोण रं तू ?"

अरं दादा,मी तुझा सायबाचा बाप हाय.त्याला भेटाया आलोय ! त्याची आवडती ' मोहनथाळ ' घेऊन आलोय.मला आत जाऊ दे रं दादा.! "

" तू...अन सायबाचा बाप ! चोर , भिकारी,चल निघ इथनं! सायबांचा बाप कधीचा मेलाय !" म्हणत त्याने तुझा बाबाला ढकललं.त्ये भूईवर खाली पडले.तव्हा,तू बंगल्यातून बाहेर आला. " गणा,कोण आहे  रे हा ? " विचारलं.

" साहेब,आहे कोण तरी भिकारी.तुम्हाला भेटायचं म्हणतो.मी म्हटलंय,साहेबांना वेळ नाही .चल निघ ! 

" तेव्हा तू " ठिक , निघतोय मी .जायला सांग त्याला! " असं म्हणत बाळा,तू गाडीत बसून निघून गेला.साधी विचारपुस सुद्धा केली नाहीस रे तू! पोरा,हा संस्कार केला नव्हता रे तुझ्यावर . इतका निर्दयी कसा झालास रे तू ? पोरा,मी विसरलेच रे,तू आता मोठा सायब झालास.शिरमंताचा जावाई झालास,पैसैवाला झालास,म्हणून गर्व तर नाही झालाय ना तुला ? पोरा,नको रे हा गर्व ! गर्वाचं काही काही टिकत नाही.ऐक माझं आणि सोडून दे हा विचार. माणसं ओळख,माणसं जोड.ती आयुष्यभर पुरतात.मान-पान-शान पद असे तो राहते.नंतर ते सरते.हे नको विसरु रं लेकरा ! "

 बाळा, तुझा घरुन परत आल्यावर तुझा बाबांन धिर सोडला.हाय खाल्ली.म्हणाले,

 " आपण आपल्या पोराला परके झालो गं! ओळख मोडली त्यानं ,ओळख मोडली…" म्हणत ते धाय मोकलून रडले.😭जेवण खाणं बंद केलं.तुझा वागण्याला बघून त्यांनी चार दिवसांत जगाचा निरोप घेतला.मी विधवा झाले पोरा,तुझे पितृछत्र असं कोसळलं.जे पुन्हा दिसणार नाही.काळाचा पोटात गुडुप झालं….!

रमाबाई मला म्हणाली," बाय,तुझी सून तूझ्या पोराला ईचारत होती," तुझ्यासाठी तुझा बाबानं काय केलं? "

या प्रश्नाला तू गप्प होतास म्हणे ! 

पण ...तूला तुझा बायकोसमोर जे बोलण्याचं धाडस झालं नाही.ते सगळं मी ह्या पत्रात लिहलंय.ते वाचून दाखव तिला.अन् सांग,तुझी बायको म्हणजे आमची सुन, कुटुंबाची गृहलक्ष्मी तिच्याबाबत आम्हाला कधी राग ना द्वेष नाहीच! तीही सुखात राहो हा आशीर्वाद सांग ! तुझे आई-बाबा म्हणून नातवांना डोळे भरुन पाहू शकलो नाही.म्हणून ह्या वेड्या आजीचा मंगल आशीर्वाद सांग! सांगशील ना! हे मागणे नव्हे तर  विनंती समज पोरा!"🙏

पण शेवटी एकच मागणं ,तुला वाढवताना आम्ही जे घरंदाज संस्कार केले.ते संस्कार तू तुझ्या मुलांवर कर! न जाणो, आमच्या वाट्याला जे दुःख आलं ते तुम्हा नवरा बायकोच्या वाट्याला न येवो.ही अंबाबाई चरणी प्रार्थना!तुला नातवांनी विचारलंच ," आजी आजोबा कुठं राहतात.त्यांना भेटायचं आहे ."

" तू सांग,चिमण्यांनो, तुमचे आजी-आजोबा माझ्या लहानपणीच एका अपघातात मेले.ज्यांना मीही डोळे भरुन पाहिले नाही.असं सांग.पण,आमची ओळख करुन देऊ नकोस!ही तुला हात जोडून विनंती!🙏"

तू व तुझा परिवार सुखात राहो! हा आशीर्वाद!


✍️ तुझी आई 


प्रा.पुरुषोत्तम पटेल, म्हसावद

भ्रमणध्वनी-8208841364




Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...