कविता हृदयातून जन्म घेते आणि सहजच ओठांवर येते. " ईश्वराच्या कृपेची मज रोज प्रचिती येते . "मी तर म्हणेन की,
" हे शब्द माझे नव्हे मनीचे । मज मुखी श्रीहरी वदतो। लेखणी देऊन हाती । शब्दश्री आकारा आणितो । "
आलेले अनुभव, अनुभवलेले भावनिक स्वभाव,पाहिलेले प्रेम,भक्ती,जिव्हाळा,त्याग,समर्पण, इत्यादितून विविध विषयावर कविता स्फुरते.कवितेत प्रेमाचं भावविश्व उलगडताना कल्पनेला आपसूकच बळ येतं.अभंग,भक्तीगीत,भूपाळी लिहितांना भक्तीचा गंगौघ हृदयातून नकळत अखंडित झिरपतो. भावगीत ,अंगाई गीताची रचना करतांना स्नेह-सौख्याने ओलावलेले शब्दतरंग मनरुपी विणेतून झंकारतात.प्रेमगीत लिहितांना कृष्ण-राधेची कृष्ण-मिराची,शिव-पार्वती,सिता-श्रीराम,कृष्ण आणि कृष्णेचे बंधुप्रेम,लैला-मजनु,बाजीराव-मस्तानी,
शिरिन-फरहाद इत्यादिंची निर्व्याज प्रीती,राम-लक्ष्मण,कृष्ण-सुदामा,कृष्ण-अर्जुन यांचं अलौकिक सख्यत्व ,श्रीगणेश-गौरी,यशोदा-कृष्ण,कुंती-पांडव,जिजाऊ-शिवराय,इत्यादि आई-पुत्रांवर लेखन करतांना त्यांच्या मातृनिष्ठेचे अलौकिक दिव्य तेज शब्दापुढती आलेले मळभ दूर करतात . आणि...अनेक गाईंचे दूध एकत्र करुन तयार झालेले दही घुसळताच; नवनीत प्राप्त व्हावे,त्यातून मिळालेले साजुक तुप पदार्थात मिसळताच त्यास अमृताचा गोडवा देते.अगदी तसेच...विविध विषयावरचं माझं लिखाण बहरतं. अर्थात माझ्या लिखाणाला बुद्धीदाता श्री विघ्नेश्वराचा आशीर्वाद आणि देवी श्वेतवस्रा शारदेची प्रेरणा,आणि मायबाप वाचकांचे प्रेमाचे बळ प्राप्त आहे.त्यांच्याविना हे लेखन कार्य महाकठीण; शक्यच नव्हे ! म्हणूनच याप्रसंगी या तीन्ही विभूतिंचे स्मरण करणे व त्यांच्या विषयी कृतज्ञता बाळगणे हे मी आद्य वंदनीय समजतो.
प्रिय वाचकहो, माझे साहित्य आपण वाचन करावे,वाचन करतांना जे काही गोड आणि आपणास प्रेरक वाटेल ते आपण स्विकारालच्...पण जे काही त्याज्य असेल ते आपण बिनदिक्कत दुर्लक्ष करावे.माझे साहिित्य वाचन करतांना आपणही प्रेमाच्या विश्वात रममाण व्हाल व प्रेम रसात न्हाऊन निघाल. या सार्थ विश्वासाने आपणास प्रेमाचा आग्रह !🙏
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "