Kaayguru.Marathi

बुधवार, मे ३१, २०२३

तुझ्यात मी![ अष्टाक्षरी]

सखे तू माझी मी तुझा 
तन दोन आत्मा  एक
ठेच  लागे मज पाया
डोळा अश्रु तुझे कैक.  ।।१।।

सख्या माझ्या हृदयी तू
कप्पा मी तुझ्या मनीचा  
शुक्रतारा  मी  तारका
दवबिंदू   तू    पर्णाचा  ।।२।।

तुझ्यासवे  जग  भासे
स्वर्गाहून       सुंदरसे
तूच  माझी  स्वप्नपरी
दुजा  सर्व  गौण दिसे  ।।३।।

नभ   तू  तुझी मी मेघ
इंद्रधनु  तू    आभाळी
सप्तरंगी   रंगते     मी
होते लाली उष:काळी  ।।४।।

रोमरोमी    तू  कन्हैया 
सूर  तू  मी  रे  बासुरी
स्पर्श   होता  अधरांचा
होते    गोविंदा   बावरी ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


मंगळवार, मे ३०, २०२३

घे झेप आभाळी! [अष्टाक्षरी]

नको अडकून राहू पिंज-यात या गड्या तू
पंख पसरुन  घ्यावी उंच आभाळी झेप तू  ।।१।।

असतील जरी दाणे  सोने रुपे नी मोत्यांचे 
टाकूनिया  दे तू सारे  पाश  मोह मायेचे तू ।।२।।

दिले  देवाने  पंखात बळ   हे  विहरण्याचे
ओलांडून जा  सागर  नदी  डोंगर  दूर  तू  ।।३।।

तोड गड्या पायाची रे बेडी सोन्याची दास्याची
सामर्थ्याचा गर्व नये हो दिनांचा कैवारी तू ।।४।।

जग एक बंदिशाळा कोणी न येथे कुणाचा
कारा तोडुनिया व्हावे जगन्नाथ सृष्टीचा तू ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, मे १४, २०२३

माझी माय


[ आज जागतिक मातृ दिवस त्यानिमित्ताने आई चरणी समर्पित काव्यसुमन!💐🙏🙏🙏]

माझी माय

चालत होतो एकटा
होती ती एक भयाण रात्र
घेऊन अनवाणी दोन पाय
तुडवित होतो रस्ता…
खाचखळगे, दगडधोंड्यांनी भरलेला
कधी पडलो,कधी ठेचाळून पडलो
खाल्ल्या अनंत खस्ता
पायात घुसला काटा 
पोहचलो कसाबसा घरी
माझ्या येण्याची वाट पाहत…
चिंतेत बसली होती दारी
दोन्ही पाय रक्तबंबाळ पाहून 
मोकले धायऽऽधाय
जिव्हाळा हृदयीचा 
शांत राहिना…
कोण हो ती? 
ती तर माझी माय ! 
ती तर माझी माय!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, मे ०३, २०२३

नाशिक स्नेह संमेलन -२०२३

नाशिक स्नेह संमेलन -२०२३
अक्षरवेड्या साहित्यिकांची
नाशिक नगरी मांदियाळी 
स्नेह सौख्य आनंदाचा
चला लावूया टिळा भाळी. ।।१।।

पंचवटीच्या पाच वटांचे
निर्मळ भावे दर्शन घेऊ 
दशरथनंदन प्रभू रामाचे
एकनिष्ठेचे गुणगान गाऊ ।।२।।

सरस्वतीचे पूजक आम्ही
उचलू हो गुरुजींच्या वसा
भिमरायाच्या समतेचा
शब्दाशब्दांत उमटवू ठसा ।।३।।

विनायकाची अक्षरलेखणी
पोहचवू साता समुद्रापार
उभवू माय मराठीचा झेंडा
प्रसंगी झेलू उरावरी वार ।।४।।

घेतले व्रत अक्षर गुंफण्याचे
तात्यांचा तेजस्वी लेखणीचे
गणबोलीचे वैभव लेवून
विश्व जागवू खान्देशकन्येचे ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

✍️अष्टाक्षरी काव्य लेखन रचना नियम

✍️अष्टाक्षरी काव्य लेखन रचना नियम
✍️ अष्टाक्षरी काव्यलेखन हा खूप सुंदर असा काव्यलेखन प्रकार आहे.
✍️ प्रामुख्याने आद्य स्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या बहुसंख्य कविता अष्टाक्षरी काव्यलेखन प्रकारात मोडतात.
✍️ अष्टाक्षरी काव्य हा गेय काव्य प्रकार आहे.हा त्याचा महत्वाचा विशेष.
उदा.१)
       अरे खोप्यामधी खोपा । सुगरणीचा चांगला ।
       देखा पिलासाठी तिनं।झोका झाडाले टांगला।।१।।
       पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला
       तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला।।२
                           © बहिणाबाई चौधरी 
) ज्योतिबांना नमस्कार मनोभावे करतसे
      ज्ञानामृत आम्हा देई आशा जीवन देतसे।।१।।
      थोर जोति दीन शूद्रा अतिशूद्रा हाक मारी
      ज्ञान ही ईर्षा देई ती आम्हाला उद्धरी।।२।
                            © सावित्रीबाई फुले 
३) देवा श्री करुणाकरा. 
    महादेवा गौरीहरा 
    तुज नमितो दयाळा 
    यावे दर्शना सत्वरा ।।१।। 
  © प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
✍️लेखन नियम :
) प्रत्येक कडवे हे आठ अक्षरांचे असावे.
२) कडवे हे दोन ओळींचे असले तर त्यातील पहिला गट हा आठ अक्षरांचा आणि दुसरा गट आठ अक्षरांचा असे एकूण १६ अक्षरे असतील. उदा.सावित्रिबाई फुले आणि बहिणाबाई चौधरी यांची रचना पहा.
३) रचना चरणात असली तर प्रत्येक चरण(चारओळी) 
 आठच अक्षरांचेच असावे.
४) आठपेक्षा कमी वा आठपेक्षा जास्त अक्षरे नकोत.
४) रचनेतील प्रत्येक शब्दाचा आरंभ हा दोन,चार, सहा अशा सम शब्दांतच करावा.
५) आरंभ हा एकाक्षरी,तीनाक्षरी,पंचाक्षरी शब्दांत करणे टाळावे.ते नियमात बसत नाही.
६) चरणात दुस-या व चौथ्या ओळीत शेवटच्या शब्दांत स्वरयमक असावाच!
उदा. 💎 गर्व शब्दाला सर्व असा स्वरयमक.
       💎 वाणी शब्दाला गाणी असा स्वरयमक.
✍️ चला तर.करा मग अष्टाक्षरी लेखनाचा श्रीगणेशा!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...