Kaayguru.Marathi

शुक्रवार, मार्च २९, २०१९

शक्तीशाली लेक-आणि बाप


एक छोटीशी... पण हृदयस्पर्शी गोष्ट

  एका जन्मदात्याने अापल्या मुलाचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केले. खूप चांगल्या प्रकारे त्याचे शिक्षण केले...   जेणेकरून मुलाच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.......!

.... काही काळानंतर  मुलगा एक कर्तबगार यशस्वी व्यक्ती बनला,...एका मल्टी नॅशनल कंपनीचा सी.ई.ओ. झाला. उच्च पद ,भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा त्याला कंपनीकडून प्रदान करण्यात आल्या.

आई-वडीलांनी चांगली मुलगी पाहून एके दिवशी असाच त्याचा विवाह एका चांगल्या मुलीशी लावून दिला. त्यांना मुलंही झाली. घरात गोकूळ फुलले.  आता त्यांचा एक सुखी परिवार बनला.

'कालाय तस्मै नमः।।' वडील म्हातारे होत चालले होते. एक दिवस वडीलांना आपल्या मुलाला प्रत्यक्ष नोकरीच्या ठिकाणी  भेटायची इच्छा झाली.. आणि ते मुलाला भेटायला त्याचा कार्यालयात गेले. त्यांनी बघितलं की मुलगा एका मोठ्या व शानदार कंपनीचा अधिकारी बनलाय. त्याचा कार्यालयात हजारो कर्मचारी त्याचा शब्दाचा आदर करीत  काम करत आहेत. हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली !

... म्हातारे वडील मुलाच्या कॅबिन मध्ये गेले. व त्याच्या  खांद्यावर हात ठेवून उभे राहीले. आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलाला  विचारलं की..... " पोरा, या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे ? " 
मुलगा स्मित हास्य करत, आत्मविश्वासाने म्हणाला. "माझ्याशिवाय कोण असू शकतं बाबा ?"

   वडीलांना त्याचाकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यांना विश्वास होता की, त्यांचा मुलगा गर्वाने म्हणेल की,
" बाबा, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात. ज्यांनी मला एवढ्या योग्यतेचं बनवलं ! " पण मनाविरुद्ध घडलं. 
या विचाराने त्यांचे डोळे भरून आले. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले. पणराहून त्यांनी परत एकदा वळून मुलाला विचारलं की,एकदा परत सांग ! " या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे ? "

मुलगा ह्या वेळेस म्हणाला की... " बाबा, फक्त तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती ! " वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले.....
ते म्हणाले,अरे बाळा, आताच तर तू स्वतःला जगातला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणत होतास....! आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगतो आहेस ? "

मुलाने  हसतच त्यांना आपल्या समोर बसवले आणि म्हणाला, "बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता.

    ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या  खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल. तर तो मुलगा/मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना ? हो की नाही बाबा ! " मुलाचे हे सुसभ्य वर्तन व नैतिकता पाहून वडीलांचे डोळे परत एकदा  भरून आले.आनंदाश्रूंनी !!!  त्यांनी आपल्या मुलाला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली."....

खरंच आहे की, ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल....ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते.

आपले यश व संपन्नता आणि सुसंस्कार पाहूनच   "आई-वडील " आपल्या मुला-मुलींवर ; प्रगतीवर खुश असतात...........! ✒

🙏जय श्री चिंतेश्वर महादेव 🙏

रविवार, मार्च १७, २०१९

आत्महत्या.... का करु नये...!

    आत्महत्या... आज सर्वत्र सहजच वापरला जाणारा शब्द. पण, आपल्या साधू-संत, ऋषी - मुनी आणि श्रृती-स्मृतीकार, पुराणकार, देवीभागवत, शुक्र नीति,चाणक्यनीति, रामायण, महाभारत, संहिताग्रंथ, इत्यादि परमपवित्र ग्रंथकारांनी मानवी जीवनाला मार्गदर्शक सिद्धांत, तत्व, नीति-नियम, कथिले. ह्याद्वारा मानवी जन्म सार्थकी लागावा. जीवाला परमात्मा आणि मोक्षप्राप्ती व्हावी हाच परम उद्देश यातून साध्य व्हावा असा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते.
भगवान श्रीकृष्णाने गीताग्रंथात अगदी स्पष्टपणे कथन केले आहे की, -
यः  शास्त्रविधिमुत्सृज्य  वर्तते  कामकारतः।
न  स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परा गतिम्।
तस्माच्छास्त्र प्रमाणं ते कार्याकार्यव्वस्थितौ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्त कर्म कर्तुमिहार्हसि।।
(गीता १६।२३-२४)
अर्थ -
" जो मनुष्य शास्त्रसंमत विधीला सोडून आपल्या इच्छा नुसार मनमानी वर्तन करतो, अशा  मनुष्याला सिद्धी, शान्ती आणि परमगती प्राप्त होत नाही. कारण, मनुष्यासाठी कर्तव्य - अकर्तव्य समजून घेण्यासाठी शास्त्र हेच प्रमाण आहे. असे समजून हे मनुष्या.. तू या लोकांत शास्त्रसंमत नियत कर्तव्य - कर्म करावे.अर्थात,तू शास्त्रसंमत असेच कर्तव्य - कर्म करीत रहा.
  तात्पर्य, असे की, आपण ' काय करावे, काय करु नये?' हे समजून घेतांना विधीशास्त्र प्रमाणभूत मानले पाहिजे. "
जे शास्त्रसंमत आचरण करतात ते ' नर ' आणि जे मनाला येईल असे आचरण करतात. ते ' वानर ' होत. गीताग्रंथात भगवान श्रीकृष्णाने मनमानी आचरण करणा-यास ' असूर ' असे म्हटले आहे.
' प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदूरासुराः।'
(गीता १६।७)
  आत्महत्या करु नये. या संबंधी शास्त्र काय म्हणते. ते जाणून घेऊ या.
१) आत्महत्या करणारा मनुष्य साठ हजार वर्षापर्यंत अन्धतामिस्त्र नरकात निवास करतो.
संदर्भ - ◽(पाराशरस्मृती ४।१-२)
२) भावाचा खुण केल्याने अत्यंत घोर नरकाची प्राप्ती होते, परंतु त्याहूनही भयंकर नरक स्वतः आत्महत्या केल्याने प्राप्त होतो.
(महाभारत, कर्णपर्व-७०।२८)
३) जो पुरुष अथवा स्त्री काम, क्रोधाने फाशी घेऊन, शस्त्रद्वारा किंवा विष प्राशन करुन आत्महत्या करतात. त्यांचे शव चांडाळाने दोरी बांधून राजमार्गावरुन फरफटत न्यावे. अशा व्यक्तींचे अग्निसंस्कार आणि इतर विधि करणे वर्जित करावे.
(कौटिल्य - अर्थशास्त्र ४।७)
४) आत्महत्या करणारे पुरुष स्त्री घोर नरकात जातात. आणि सहस्त्र नरक यातना भोगून वराह योनीत जन्म  घेतात. म्हणून समजदार व्यक्तींनी चुकूनही आत्महत्या करु नये.
(स्कंदपुराण, काशी. पू. १२।१२-१३)
५) आत्महत्या करणारी व्यक्ती कदाचित वाचली व जीवंत राहीली, किंवा संन्यास ग्रहण करुन ह्या विचारांचा त्याग जरी केला तरी ती व्यक्ती 'प्रत्यवसित' म्हणून ओळखली जाते. अशी व्यक्ती समाजात सर्वाकडून बहिष्कृत समजली जाते. तिची शुद्धी केवळ चांद्रायणव्रत किंवा दोनदा  तप्तकृच्छ-व्रत केल्यानेच होऊ शकेल. ( हे व्रत अत्यंत कठिण आहे.)
( लघुयमस्मृती २२-२३)
६) जी व्यक्ति आत्महत्या करते तीचे सुतक धरु नये.
१) याज्ञवल्क्यस्मृती ३।६
     २) विष्णुस्मृती २२
     ३)गरुडपुराण, आचार. १०६।६
     ४) कूर्मपुराण, उ. २३।७३
   वरील विषयाने आपल्या स्मृतीकारांनी अत्यंत दूरदृष्टीने, खडतर तपश्चर्या करुन प्राप्त केलेल्या योगसामर्थ्याने मांडलेले हे सिद्धांत, केलेला उपदेश सुज्ञपणे समजून घेतला तर मानवी जन्म खरोखर सार्थकी लागेल. कारण हा नरदेह प्राप्त होणे सहजसाध्य गोष्ट नाही. आपली धर्मसंस्कृती ८४ लक्ष योनी (जन्म )मानते.
त्या योनींची संख्या समजून घेतांना त्यांचे प्रकार विचारात घेतल्यास लक्षात येईल.

🔸पदम् पुराणातील एक श्लोकानुसार...

जलज नव लक्षाणी, स्थावर लक्ष विम्शति, कृमयो रूद्र संख्यक:।

पक्षिणाम दश लक्षणं, त्रिन्शल लक्षानी पशव:, चतुर लक्षाणी मानव:।।
संदर्भ ◽( पद्मपुराण-७८।५)

अर्थात :-
🔸जलचर ९ लाख,
🔸स्थावर अर्थात वृक्ष - वेली २० लक्ष, 🔸सरीसृप, कृमि कीटक- ११ लक्ष,
🔸पक्षी/नभचर १० लक्ष ,
🔸स्थलीय/थलचर ३० लक्ष
🔸आणि उर्वरित ४ लक्ष मानवीय
एकूण प्रकार ८४ लक्ष असे आहेत.

       वरील माहिती समजुन घेतली आणि हे जाणून अनमोल असा मनुष्य जन्म प्राप्त झाला असल्याने आपल्यावर असणारे जन्मजात ऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे ऋण :-
१) देव ऋण
२) मातृ ऋण 
३) पितृ ऋण
४) गुरु ऋण
५) समाज ऋण
ह्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण कटिबद्ध राहावे. कारण निसर्गाच्या प्रत्येक घटक आपणास सदैव खडतर जीवन जगण्याचे व सुखाचे दिवस प्राप्त करण्याचे अखंडित मार्गदर्शन करीत असतात.
१) सूर्य रोज अस्ताला जातो. पण पुन्हा नव्याने सकाळी उदयाला येतो.
२) अमावास्या अंधार घेऊन आली म्हणून पौर्णिमा उजेड देणे बंद करीत नाही.
३) कृष्णपक्षात कलेकलेने लहान होणारा चंद्र शुक्लपक्षात त्याच कलेकलेने मोठा होऊन सृष्टीला अमृत प्रकाश प्रदान करतो.
४) समुद्राला ओहोटी आहे तशीच आनंदाची भरतीही आहे. किना-याला भेटण्याची त्याची आस वर्षानुवर्षे जीवंतच आहे.
५) ग्रिष्माची काहिली सहन केली तरच वसंताचा स्पर्श आपणास अनुभवता येईल हे वृक्ष - तरुंना चांगलेच कळते. म्हणूनच ते पानगळती स्विकारतात कारण त्या शिवाय हिरवाई शक्यच नाही. हे त्यांनाही कळते.
६) माठ थेंबाथेंबानी पाझरतो, तेव्हाच त्यातील जल शितल होते. व त्याला अनंत हातांचा स्पर्श घडतो. उष्णोदकाला कोण प्राशन करील?
७) सागर, सरोवर, नदी-तलाव यातील पाणी सूर्यकिरणांची तप्तता सहन करते, तापते, तेव्हा त्याची वाफ बनते. त्यातून बनतो मेघ. मेघ जलाभिषेक करतात तेव्हाच सृष्टीचा सर्जनोत्सव सुरु होतो.
८) उन्हाच्या झळा सोसून भेगाळले तरच मृगसरी प्राशन करता येईल. ही वेडी आस घेऊन भूमी दरवर्षीचा ताप सहन करतेच ना?
९) गढूळ पाण्याचा पूर आल्याशिवाय नदीपात्रालाही पुर्णत्व लाभत नाही. हे कसे विसरता येईल.
१०) सकाळ  आहे त्यानंतर दुपार आहेच, दुपार नंतर संध्याकाळ आहेच, रात्री नंतर दिवस उगवणारच आहे. हे आपण नाही समजणार तर कोण समजून घेईल.?
११) जन्म आहे हे खरे.. पण ती प्रत्येकाला मरणही आहे. मरण आहे म्हणून सृष्टी चक्र थांबले का?
या समस्त गोष्टी आपण समजून घेतल्या तर हा मनुष्य जन्म नक्की गोड होईल. व कोणीही आत्महत्या करण्यास धजावणार नाही.म्हणूनच हे सद्गमानवांनो
सुखी जगा.इतरांनाही सुखाने जगु द्या, कोणालाही काया, वाचा, मनाने दुखवू नका. दुःख हलके करण्यासाठी खूप हसा. हसवत रहा.!
संदर्भ :- १)क्या करे, क्या न करे? (आचार संहिता) राजेंद्र कुमार धवन
प्रकाशक- गीताप्रेस, गोरखपूर २७३००५(१३ वी आवृत्ती )

◽प्रा.पुरूषोत्तम पटेल,
मुं.पो.म्हसावद
ता.शहादा जि.नंदुरबार
भ्रमणध्वनी :- ८२०८८४१३६४

गुरुवार, जानेवारी ०३, २०१९

बाप्पा गणेशा या हो!

बाप्पा गणेशा या हो

शिवसुता तुम्ही गौरीनंदना
मंगलमूर्ती  या हो!

हृदयी लागली हुरहूर आता
गणपती बाप्पा  या हो!

निरोप घेऊन वरीस झाले
दुःखहर्ता  या हो!

मांडव घातला अंगणी आज
सुखकर्ता या हो!

ढोल ताशांचा निनाद गर्जे
शूर्पकर्णा  या हो!

मखरी कोरीले मयुरासन
मोरेश्वरा  या हो !

तुम्ही नसता उदास वाटे
चिंतामणी  या हो!

रिद्धी सिद्धीचे तुम्ही दयाळा
सिद्धीविनायक  या हो!

जमविल्या सा-या एकवीस पत्री
महागणपती  या हो!

लाडू मोदक प्रसाद ठेविला
विघ्नहरजी  या हो!

कथा किर्तनी संतजन आले
गिरिजात्मज  या हो!

आतूर सारे भक्त दर्शना
वरदविनायक  या हो!

जगी दाटला अंधार सारा
मंगलमूर्ती  या हो!

शब्दसौदर्य :-
प्रा.श्री.पुरूषोत्तम पटेल
mhasawad.blogspot.in

बाप म्हणजे काय ?

बापाला बघायला शिका...!

मोठं झाल्यापासून  बापाला,
कधी मिठी मारून बघितलीयं का ?
नाही ना. एकदा मिठी मारून बघा...!
ह्रदय स्थिर होऊन जाईल.
मोठ्ठ झाल्यापासून कधी
बापाचा मूका घेऊन बघितलायं का?
एकदा बापाचा मूका घेऊन बघा...!
बापाची दाढी गालावरुन  खरचटताच
बापा पेक्षा आपण अजुन छोटेचं आहोत ;
याची जाणीव होऊन जाईल .
बापाची चप्पल पायात आली म्हणून कोणी बाप होत नाही,
त्यासाठी आयुष्यभर दुय्यम स्थान घ्यावं लागत ,
कधी घेऊन बघितलं आहे का  दुय्यम स्थान ?
नाही ना. एकदा ही कल्पना तरी करुन बघा,
बापाची किंमत कळून येईल .
बापाला बुढ्ढा, म्हातारा, बाबा अस म्हणून  बघितलंय का?
साधु लोकांना बाबा म्हटल जातं.. तसं
कधी बापाला बाबा म्हणून बघितलं आहे का ? नाही ना.
एकदा बाबा म्हणून तर बघा...
खऱ्या संतांची ओळख होऊन जाईल.
बापाच्या त्याग पाहिलायं...?
बापाचं घरावर नाव नाही,
बापाचं हातावर नाव नाही,
बापाचं छातीवर नाव नाही,
बापाचं गाडीवर नाव नाही,
पण.. तुम्हाला ओळख दिली नावांची...
स्वतःच्या घामाच्या आणि रक्ताच्या धारांनी...
भिजवलेली सिमेंट-वाळू आणि विटांनी बनलेलं
घर असून देखील तो घरासाठी परका ,
कधी परकं होऊन बघितलंय  का ? नाही ना...?
परकं होऊन बघा,
बाप किती खंबीर असतो याची जाणीव होऊन जाईल.
आईचं प्रेम जास्त आणि बाबाचं कमी असतं...
असं कधीही नसत .
कधी सूर्य आणि चंद्र यांच्यातील
एक साम्य बघितलं आहे का ?
एकदा बघुन घ्या...
दोघंही प्रकाश देतात...!
पण एकाचा(बाप) उष्ण मात्र मन-शरीराला उर्जा देणारा.
अन् दुस-याचा(आई) आल्हाददायक मन-शांती देणारा.
एकदा स्वतः हे प्रामाणिकपणे अनुभवा.
बाप फक्त पाया पडण्यापुरता नसतो,
त्याचा तळपायांना कधी निरखून बघितलं आहे का ?
एकदा तरी निरखून बघा, तुमच्यासाठी त्याने खालेल्या खस्ता कळतील.
आयुष्यातील एक देवदूत तुमच्या समोर उभा असल्याचं समजेल.
© प्रा.पुरूषोत्तम पटेल,
mhasawad.blogspot.in

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...