आत्मविश्वास असे एक शस्त्र
हाती असू द्यावे आयुष्यभर
शत्रू कितीही असो बलवान
विजय मिळतोच रणांगणावर !
आत्मविश्वास मनी भरुन लंकेत
वानरसेना बळे लढले श्रीराम
वधिला बलवान दशानन रावण
सितेसह परतले प्रभू अयोध्याधाम
आत्मविश्वास बळे महाभारतात
कुरुक्षेत्री लढले ते पाच पांडव
शुर विर महारथींना पुरुनसुद्धा
दुर्योधनासह मारिले शत कौरव
आत्मविश्वास मनात रुजवावा
त्यास घालावे गुरुनिष्ठेचे पाणी
अपंगही लांघतो मग उंच गिरी
त्या वेड्यांची इतिहास गातो गाणी
आत्मविश्वासाचे एक स्फूलिंग
असाध्य ते साध्य करीते...
ध्येयाप्रती जो झाला वेडा
दुनिया त्याचे चरणी झुकते !
आत्मविश्वास ज्याचा हरवला
त्यावर काडीपैलवान भारी पडे
अंगी कितीही असू द्या हो बळ
भाळी पराभवाचा शिक्का चढे
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "