Kaayguru.Marathi

बुधवार, जुलै ०६, २०२२

नको ना रे बाबा…

नको  ना रे बाबा मला असा दूर सारु
तूच  तर  माय  माझी मी तुझी वासरु

बाबा...तू वटवृक्ष तर मी तुझी पारंबी
तुझ्या जीवनाची आहे  मी सुंदर छबी
नको ना रे  बाबा मला  असा दूर करु
तूच  तर  माय माझी  मी तुझी वासरु

बाबा…तू  शिंपले  तर  मी  तुझा मोती
तुझी  माझी सुंदर अनमोल गोड नाती
तुझा डोळ्यांत ओघळते होऊन मी अश्रू
नको  ना  रे  बाबा मला असा दूर सारु

बाबा…तू   बासरी  तर   मी   तिचे  सूर
माझं  हसणं  खेळणं  देई निराशेला नूर
नको  ना   सोडू   तुझं  लाडकं  कोकरु
नको  ना  रे  बाबा  मला असा दूर सारु

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, जून २८, २०२२

भक्तीचा छंद


प्रभो मज लागो । भक्तीचा हा छंद ।
गाईन मी नाम   । आवडीने ।।१।।

गोड  तुझे  नाम । गोड तुझे रुप ।
पाहीन मी रुप   । आवडीने ।।२।।

तुच माझी माय  । तुच माझा बाप ।
चरणाचा दास   । आवडीने ।।३।।

द्यावा मज वर   । गोड तो प्रसाद ।
करावी तू कृपा  । आवडीने ।।४।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


शनिवार, जून १८, २०२२

नामकरण

प्रिये ये ना तू जवळी
अशी लांब नको जाऊ
तुझ्या माझ्या प्रेमाला
मधूर नाव आपण देऊ!

प्रीतिचे विश्वनिर्माते
विसरता येत नाही कधी
राधाकृष्ण नलदमयंती
स्मरण करु तयांचे आधी

प्रेम करावे मेघासारखे
जगून गेली मिरा दिवाणी
शिरी-फरहाद लैला-मजनू
हिर-रांझा बाजीराव-मस्तानी

आपल्याही निकोप प्रीतिचे
आपणही करु बिजारोपण
उगवेल तरु निस्सीम समर्पणाचे
दुनिया करेल त्याचे नामकरण!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


गुरुवार, जून १६, २०२२

आई

आई✍️

आई...अचानक स्वर्गीच्या यात्रेला
जायची का ग् केली तू घाई?
तू सहज निघून गेली पण...
येता आठव अश्रू थांबत नाही!

आई...क्षणभराचा ग् विलंब
जणू आला हवेचा झोत
जाऊन पळत वैद्य आणेतो
विझून गेली तुझी प्राणज्योत !

आई...सारे सुख संपत्ती वैभव
आज तर माझ्या दारी आले
तू नसता माझ्या जवळी वाटे
मातृछत्र कायमचे मी गमावले

आई...फिरुन ये ना ग् तू...
या भूलोकी एकदा माझ्यासाठी
फिरव माया ममता जिव्हाळ्याचा
हात तू प्रेमाने माझा पाठी !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "

मंगळवार, जून १४, २०२२

माझ्या गावाचे रहस्य

माझ्या  गावाचे   रहस्य
केवळ मीच हो जाणतो
येणा-या प्रत्येक व्यक्तीला
अतिथि  देवो  मानतो !               ‌‌   

माझ्या  गावाचे   रहस्य
फक्त  मीच  रे   जाणतो
सर्वधर्म जाती पंथ भाषा
गुण्यागोविंदाने हो नांदतो

माझ्या   गावाचे   रहस्य
मलाच   आहे  की ठाव !
सासु - सुना  एकमेकींना
   आई-लेकी मानतात राव!             

माझ्या   गावाचे   रहस्य
आहे वळणावळणाची वाट
पण, घराघरात पाहशील !
सुसंगती सुसंस्कारी थाट

माझ्या गावाला येता वाटे
करावी सगळ्यांशी दोस्ती
आबालवृद्ध सगळे नरनारी
संकट येता एकमेका हात देती        

तुला वाट्टेल नवल
ऐकता माझ्या गावाचे रहस्य
ना ठावे दुःख क्लेश राग लोभ
सर्वामुखी  प्रसन्न  हास्य!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...