Kaayguru.Marathi

बुधवार, जुलै २७, २०२२

तू जिथे तिथे मी !

तू जिथे तिथे मी!

प्रिये,  तुझे   अन्   माझे 
वेगळे नाहीच ग् काही असे
तू जिथे तिथे मी आहेच!
शरिरं दोन आत्मा एकच वसे 

आपली फक्त दोन शरिरं 
तरी...तुझं माझं नाही अलग
एक श्वास तुझा एक माझा
एकमेकांना देवू जगू सलग ! 

प्रिये,तू पुष्परिणी मी जलतळे
मी चंद्र नभीचा तू शुक्रतारा
तू अधीर मन मी क्षण प्रीतिचा 
तू आस मिलनाची मी उनाड वारा

प्रिये,तू जल मी मासा ना वेगळे 
तुझ्याविना जीव हा तळमळे
प्रार्थना श्री विघ्नहर्ता चरणी 
आयुष्य सोबती जगू दे सगळे!🙏 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, जुलै २४, २०२२

देवा तुझा छंद


देवा तुझा छंद   । लागला रे मला।
तुझा विना काही । आवडेना ।।१।।
सावळी ती कांती । पाहतो मी नित्य।
गातो गोड नाम  ।  आवडीने ।।२।।
चतुर्भूज मूर्ती  ।  भाळी गंध टिळा ।
छंद लागे जीवा । डोळीयासी ।।३।।
कर कटेवरी  ।  उभा विटेवरी ।
पंढरी नगरी  । पांडुरंग ।।४।।
चंद्रभागा तिरी । मेळा वैष्णवांचा ।
किर्तनात रंगे । जगजेठी ।।५।।
भक्त भेटी लागी । वेडावला हरी।
वाट पाही कांता । उभी दारी ।।६।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, जुलै २१, २०२२

लग्नाची बेडी

लग्नाची बेडी...
नवी असता वाटे गोड
काही दिवस गेले की
भासू लागते अवजड

लग्नाची बेडी...
प्रारंभी वाटे सुंदर दागिना
संसाराचा गाडा ओढताना
जीवाची होई मग दैना !

लग्नाची बेडी...
जणू लाडू वाटे गोड गोड
जो न खाई त्याला पश्चात्ताप
जो खाई त्याचा जिभेला होई फोड

लग्नाची बेडी...
हाती घालावी विचार करुन
ती तुटता तुटत नाही
आयुष्य जाते हो सरुन...!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


बुधवार, जुलै २०, २०२२

आत्मविश्वास

आत्मविश्वास  असे एक शस्त्र
हाती  असू  द्यावे  आयुष्यभर
शत्रू  कितीही  असो  बलवान
विजय मिळतोच रणांगणावर !

आत्मविश्वास मनी भरुन लंकेत
वानरसेना  बळे लढले  श्रीराम 
वधिला बलवान दशानन रावण
सितेसह परतले प्रभू अयोध्याधाम 

आत्मविश्वास बळे महाभारतात
कुरुक्षेत्री  लढले ते  पाच पांडव
शुर  विर महारथींना  पुरुनसुद्धा
दुर्योधनासह  मारिले शत कौरव

आत्मविश्वास  मनात  रुजवावा
त्यास  घालावे गुरुनिष्ठेचे  पाणी
अपंगही  लांघतो  मग उंच गिरी
त्या वेड्यांची इतिहास गातो गाणी 

आत्मविश्वासाचे एक स्फूलिंग
असाध्य ते साध्य करीते...
ध्येयाप्रती जो झाला वेडा
दुनिया त्याचे चरणी झुकते !

आत्मविश्वास  ज्याचा  हरवला
त्यावर काडीपैलवान भारी पडे
अंगी  कितीही असू द्या हो बळ
भाळी पराभवाचा  शिक्का चढे

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, जुलै १९, २०२२

प्रेमनगर

प्रेमाच्या वाटेवर आहे
माझ्या  सखीचं  गाव
दुरदूर   देशी  ओळख
प्रेमनगर   त्याचे  नाव

लता - वेलीची  वसने
करीती  येथे परिधान
पुष्परिणीच्या   बागेत
करिती   मंगल  स्नान

बासुरीची धुन साधते
मंजूळ   मधुर  संवाद
येथे   सान असो थोर
ठाऊक  नसे हो  वाद

पुष्प  कळ्यांचा माळा
शोभे  ललनांचा  गळा
कुंतली  सुगंधी  गजरा
धन्य वाटे पाहता डोळा

गाव वेशीवर येता होई
स्नेह -सौख्याने स्वागत
नक्की या  हं भेटायला
प्रेमनगरच्या  दुनियेत ! 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...