स्वातंत्र्य दिन चिरायु होवो !
उद्या आपल्या भारतमातेच्या ७२वा स्वातंत्र्यदिवस. जाज्वल्य राष्टप्रेमाने भारावलेल्या १५ अॉगष्ट १९४७ च्या हर्षोल्होसित दिवशी भारतमातेच्या मुकुटातील लाल किल्ल्यावर तिरंगा राष्ट्रध्वजाचे डौलाने ध्वजारोहण करण्यात आले. आसमंत दशदिशांनी फूलून आला होता. स्वातंत्र्य सूर्याने भारत माता की जय…..! च्या निनादात आपले नवचैतन्याचे किरण दशदिशांना पसरवले. तेव्हापासून तर आजपर्यंत आपण सर्व जण देशभरातून हा चैतन्यदायक, स्फूर्तीदायक असा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आलो आहोत.
भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनंत स्त्री-पुरुषांनी आणि बालगोपाळांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. जुलमी इंग्रजानी त्या थोर स्वातंत्र्यविरांना अतोनात छळले असल्याचा इतिहास आजही विसरणे शक्य नाही. आठवते ना ती जालियनवाला बागेतील क्रुरतेची घटना? एवढे सोसूनही भारतमातेचे विर सुपूत्र घाबरले नाही. इंग्रजांविरोधात लढतांना “ भारतमाता की जय! ” आणि “वंदे मातरम् ” “ इन्कलाब जिंदाबाद ” ह्या घोषणा देत क्रांतीविरांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या आहेत. अनंत क्रांतीविर, ज्यांची नावे उच्चारताच स्फूरण चढते व जुलमी इंग्रज सत्तेविरुद्ध प्रचंड चिड निर्माण होते.
भारतीय जनतेत स्वातंत्र्य लालसा निर्माण व्हावी म्हणून हसत हसत फासावर गेलेल्या क्रांतीविरांची गाथा हिमालयाइतकी उत्तुंग व गंगौघाएवढीच पवित्र आहे. त्यांचा अदम्य विरतेच्या इतिहास आजही सुवर्णाक्षरांनी आपणास स्फूर्ती देत आहे. हे आपण कोणीही विसरु शकत नाही. या सर्वांचा रक्ताने पावन झालेली ही भारतमाता आज विरांची व क्रांतीकारकांची भूमी म्हणून ओळखली जाते.
स्वातंत्र्यासाठी वेडावलेल्या अशा अनंत ज्ञात अज्ञात सुपूत्रांच्या बलिदानावर दिं. १५ अॉगष्ट १९४७ रोजी आपण स्वातंत्र्य मिळविले आहे.ह्या राष्ट्रध्वजाला घडविण्यासाठी, त्याला ऊंच करण्यासाठी अगणित स्वातंत्र्यसैनिक लढले. आजही भारतीय सैन्याचे शूर-विर जवान स्वतःच्या प्राणाचे आजही बलिदान करीत आहेत. लतादिदिंनी गाईलेले
“ ए मेरे वतन के लोगो जरा आँखमे भरलो पाणी। जो शहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी। ”
असे सुवर्णमय शब्दलालित्य लाभलेले गीत आपण सदैव कृतज्ञतापूर्वक स्मरुण आहोतच! वास्तविकतः स्वातंत्र्याचा प्रतिक असलेला आपला तिरंगा राष्ट्रध्वज आपल्या सर्वांसाठी सार्वभौमत्वाचा सुगंध पेरीत आहे. तिरंगा राष्ट्रध्वजाचा मान-सम्मान राखणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे आपण सदैव प्राणपणाने पार पाडू या.
१) राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी उद्या सकाळी जवळच्या केंद्रावर, शाळेत, सरकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला न विसरता वेळेआधीच उपस्थित राहा.
२) प्लॅस्टिक किंवा कागदाचे राष्ट्रध्वज अति उत्साहाने गाड्यांवर वा मोटारसायकल वा सायकलीवर लावू नका.
३)कागदाच्या वा प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज लहान मुलांच्या हाती कदापि देवू नका. राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक आहे. ही सूज्ञपणाची जाणीव ठेवा.व इतरांनाही करुन द्या.
४) राष्ट्रध्वज तिरंगा हा आपल्या देशाची संस्कृती, शौर्य, धैर्य, त्याग - बलिदान यांचे प्रतिक आहे.हे जाणिवपूर्वक लक्षात ठेवा.
५) राष्ट्रध्वज तिरंगाचा अपमान करणाऱ्या घटकांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी.
६) तिरंगा राष्ट्रध्वजाच्या गौरवशाली इतिहासाची थोरवी सदैव कथन करा. हा अखंडीत वारसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करा
७) स्वातंत्र्यासाठी शहिद झालेल्या शहिदांचे ऋण आपण अनंत जन्मातही फेडू शकत नाही.ते लढले;फासावर गेले म्हणूनच आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. त्यांचा त्याग व बलिदानाशी कृतज्ञ रहा.
पुढील पिढ्यांचा विश्वास व राष्ट्रनिष्ठा मजबूत करण्यासाठी व राष्ट्रध्वजाला सन्मानाची भावना जागविण्यासाठी आज आपण प्रत्येक जण वचनबद्ध होऊ या..!
🌹 वंदे मातरम् 🌹
© प्रा.पुरूषोत्तम पटेल.