Kaayguru.Marathi

बुधवार, मार्च २२, २०२३

आनंदाची गुढी

परतले नगरी  सीताराम प्रभू
दारी उभारीली स्वागता गुढी
सडा  रांगोळी  बांधून  तोरण
त्यागिली  हेवा दावाची अढी

गंगौदके  प्रक्षालिन श्रीचरण 
वंदीन कौसल्या दशरथनंदन
दिनबंधु माझा अयोध्यानरेश
पुजन  गंधाक्षता भस्म चंदन

असुरनिकंदन पिताज्ञापालक
लक्ष्मणाग्रज गुरू ऋषीतारक
अजाणबाहू   जानकीवल्लभ
पतितपावक   भक्त  उद्धारक

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



शुक्रवार, मार्च १७, २०२३

नको रे चकवा

रे  मना  देऊ  नको तू कधी चकवा
दोष  लपविता  तुला  येईल थकवा ।।१।।

काया  वाचा  मने  होता एक गुन्हा 
लपविण्या   होई  खोटेपणा   पुन्हा ।।२।।

देव देतो अनंत हस्ते ऋण ते जाणा
श्वास देतो तो कृपाळू नाम ते म्हणा ।।३।।

कृतज्ञ  होऊनी  जो  करी जनसेवा
त्यास मिळे सहज प्रभू कृपेचा ठेवा ।।४।।

स्मरावे बोल थोर सज्जनांचे रे मना
येईल दिनरात्री आनंदे क्षण जीवना ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, मार्च १६, २०२३

जगावे बिनधास्त !


रे गड्या जगावे तू
सदैव आनंदात
असती जे कामाचे तयांशी
कर तू दोस्ती बिनधास्त  ।।१।।

दुनिया ही मतलबी
राहू नको रे तू सुस्त
जाणावा आपुला परका
ओळख ठेव तू रास्त  ।।२।।

म्हणती कामापुरता मामा
तयांची नको रे बडदास्त
अप्पलपोटी होऊन
करीती सारे तुझे फस्त ।।३।।

ऐक बोल पुरुषोत्तमाचे
जन्म नव्हे हा स्वस्त
चुकवाया चौ-याशीचा फेरा
प्रभु नाम आळवावे मस्त ।।४।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


बुधवार, मार्च १५, २०२३

सख्या रे...


सख्या रेऽऽ तू यावे भेटीस माझ्या
दे ना  गोड चुंबन गाली
उमटेल मुखावरी लाली
लाजेने  कळत नकळत ।।१।।

प्रिये...बावणखणी रुप तुझे
त्यावर रुळे कुंतल केशरी
भासे जणू तू अप्सरा
पाहता कळत  नकळत ।।२।।

सख्या रेऽऽ नकोस राहू दूर असा
घे ना तू मिठीत मजला
पेटला प्रीतिचा वणवा
शांतवी कळत नकळत ।।३।। 

प्रिये...आठवतो मज गत जन्म
मी राजा तू होती राणी
ये जवळी लिहू कहाणी
मिलनाची कळत नकळत।।४।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, मार्च ०७, २०२३

कन्हैया तुझी रे...!

कन्हैया पाहते मी जेव्हा तुझ्या नजरेतून 
मी दिसे  यमुना धारा
सख्या झोंबतो जणू तू मलमली अंगाला
होऊन खट्याळ वारा ।।१।।

गोविंदा पाहते मी जेव्हा तुझ्या नजरेतून 
तू    भासे   चंद्र  नभा
सख्या उगवतीच्या रविकिरणात शोभतो
तू जणू गोपीकात उभा ।।२।।

रेऽ  वनमाळी पाहता मी तुझ्या नजरेतून
तू  फिरतो  चराचरात
सख्या वाजता गोड  मुरली तुझ्या ओठी
मी राधा वाहते सूरात ।।३।।

केशवा तुझ्या नजरेतून मी पाहते जेव्हा 
कळे मी पहाटेची उषा
सप्तअश्वांचा टापांनी  गुलाल  उधळीत
तूच व्यापितो दशदिशा ।।४।।

माधवा तुझ्या नजरेतून पाहते मी जेव्हा
मी होते मनमोहन
पाहते तव  हृदयी मी राधा  एक  प्यारी
तू  शिव  मी  प्राण      ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...