Kaayguru.Marathi

रविवार, सप्टेंबर १९, २०२१

कवितेची मैत्री

कवितेची मैत्री

कविता असते
अज्ञाताच्या पलीकडची
चित्रकाराच्या कुंचल्यातली
हृदयात साठवायाची...
कवितेचा प्रत्येक टिंब
शब्दाचा प्रतिबिंब...
नकळत एकेक टिंबातून
द्रौपदीचे वस्त्र...
कितीतरी रेशमी
सहस्त्र अर्थ...!

अर्थाची सृष्टी.. आणि
जिव्हाळा भरायचा असतो
मनात काठोकाठ..!
कवितेच्या प्रवासाला असतो
युगायुगाचा पल्ला...
तो गाठतांना
अनुभवाच्या गाठी
घ्याव्या लागतात पाठी
पिढ्यांचा हे संचीत
म्हणूनच... ह्रदयापासून
जपायचे असते
नुसती ठेव म्हणून नव्हे ;
तर... वापरण्यासाठी!
जीवनाच्या समृद्धीला
घेऊन तिच्या आधार
कविता जगायची असते...
जगायची असते..!

©प्रा. पुरुषोत्तम पटेल
मु.पो.म्हसावद

शनिवार, सप्टेंबर १८, २०२१

पत्रलेखन

 आईचे मुलास पत्र…!


प्रिय लेकरा ,

तुला हृदयापासून अनंत आशीर्वाद !

आज तू शिकून सवरुन मोठ्ठा झालास.

नोकरीला लागून साईब झालास.

पण तुला माहित हाय का?

तुला लाहनचा मोठ्ठा कोणी केलाय ते ? नाहीना... ?

मग ऐक तं,कदाचित उद्या मीही नसेन…

लेकरा,अमरत्वाचे वरदान इथे भूतलावरील कोणत्याच मानवप्राण्याला नाय ! हे लक्षात असू दे

जवा तू जनमलास ,तवापासंन तू चार वरीसचा होईस्तो,

सगळं काय मी केलं व्हय ! नाय रं लेकरा …

तुझा जनमापासंनंच तुझं उठणं,बसणं,न्हाऊ-माखू

घालणं,इतकंच काय तुझे लंगोट बदलणं,नवीन लंगोट बांधण,ही सगळी कामं तुझा बाबानं स्वताच केलीत की!

बाळा,तुला सांगते,तुझा जनमापासंनंच माझी पाठ आजारपणानं धरली,

अन् मी सुद्धा चार वरीस खाटेलाच बसून व्हती !

माझंसुद्धा चार वरीसपावेतो उठणं,बसणं, औषधपाणी देणं अन् रांधणं,वाढणं,उष्टी-खरकटी भांडी धुणं-घासणं

ही सगळीच कामं तुझा बाबांनीच केली रं !

तुझे बाबा ते चार वरीस अन् ह्यात असेतो माझी आई 

अन् मैत्तर झाले…अन् तुझी आईही तेच झाले.

तुलाही असं काही जगता यावं म्हणून हा प्रपंच!

बाळा! तुला सांगते,मला आजारपणाने खूपच थकल्यागत वाटे ! तुझ्यासाठीचं दूधही आटलं व्हतं.

तुला दूध प्यायला मिळावं म्हणून त्यांनी द्रोणाचार्य परमाणं पिठात पाणी कालवून दूध पाजलं नाही तुला. तर…स्वतः रातदिन काबाडकष्ट करुन एक गाय विकत आणली.तुझ्या दूधापायी !

त्या गाईचा गुराखी बनुन सांभाळ करणं,चारा-पाणी करणं, शेणं-मूत आवरणंही,

सगळी कामं तुझ्या बाबांनीच केली.का?

तर तुला दूध पिऊन " कृष्ण-बलरामा " प्रमाणं

बलवान होता यावं हे तेंचं सपन व्हतं म्हणून... !

तू जव्हा  दुडुदुडू चालू लागला,चालतांना पडू लागला तर धावत येऊन तुला मी नाय तर तुझ्या बाबांनीच सावरलं.

बोट धरुन चालायला ही त्यासनीच तर शिकवलं बाळा !

तुझा हट्टापायी ते घोडा झाले.तुला पाठीवर घेऊन घरभर फिरले.तू," चल रं घोडा टबऽऽडऽक टऽबऽऽडक " असं बोलून खुष व्हायचा.

तुला सांगते,तू नऊ महिण्याचा अस्ताना,तुला हगवण लागली तुझे हागरे लंगोट बदलणे,ते धुणे हे जीवावर गेले त्यास्नी.पण,एक शब्दानेही त्रागा नाही की राग नाही केला त्यास्नी . तुझ्यासाठी ते सगळं करीत व्हते!

तू काहीच खाईना,पिईना,अन् दिवसरात्र काही केल्या झोपेना...रडून रडून आकांत मांडला व्हतास तू !

चार दिवस तुला छातीशी - कडेवर घेऊन रात्रंदिन तुझी काळजी तुझा बाबांनीच घेतली.ते चार दिवस त्यांनी जागून काढल्या.

घरातली सगळी कामही त्यासनीच आवरली.कशी आवरली एवढी कामं? तेच जाणे !तुला तवा तर कायबी कळेना.तुला न कळणारी गोष्ट आज सांगितली तर खरी नाय वाटायची.जाऊ दे…!तू म्हणशील, " आई-बाबांनी ही काम करणं त्येचं कर्तव्यच सारे की ! " 

तुझं भी खरंच हाय  म्हणा !

पण तू एकदा बोलला व्हता," बाबा, तुम्ही खूप कष्ट करतात.मी त्याचं मोल विसरणार नाही .नोकरीला लागलो न् की तुम्हा दोघांना खूप सुखात ठेवीन मी!

तुमच्या चाकरीला नोकर राखीन की! " 

हे ऐकून आम्हास्नी आभाळ चार बोटं दूर राहिल्याचं वाटलं व्हतं!

लेकरा,आम्ही काही तालेवार नव्हतो,पण तरी तूला शिकवलं,पोटाला चिमटा देऊनच! स्वतः दहा वेळा तुटलेली चप्पल शिवून वापरली.

पण तुला सायबांचे बुट विकत दिधले.

सवताचा घास तुझा मुखात भरवला.तू पोटभर जेवला की मगच  आम्ही जेवलो.तू उपाशी राहायला नको म्हणून…!

तुझा बाबानं सवता ठिगळं लावलेलं धोतर अन् फाटका सदरा व मी सुद्धा ठिगळं लावलेली साडी वापरली,पण तुला महागातली सुटपॅन्ट अन् टयाय का काय ? तो घेऊन दिला." तू साईब व्हावा.हे सपन पुर्ण व्हावं.मग तुझ्यासाठी कायपण..." यासाठी त्येंनी सारी हौसमजा दूर सारली.

 तेंचं व माझं सपन आज पुरं झालं.तू मोठ्ठा सायब झाला.शिकता शिकता शिरमंताची लेक तुला बायको मिळाली.तू लग्नही उरकून घेतलं.त्येचा आम्हाला राग नाय !तुझा संसार सुखात चाललाय.तुला दोन पोरं होऊन ती घरभर हिंडाय लागलीत.कामाला नोकरचाकर ,फिरायला महागडी 

गाडी ...मोठ्ठा राजमहाल वाटावा असं घर आहे म्हणे तुझं! हे ऐकून आम्ही धन्य झालोय!🙏

ही सगळी सुवार्ता मला तुझ्या घरी कामाला असणारी रमाबाई येऊन सांगून गेली. ऐकूण मन भरुन आलं रं पोरा !

आम्ही काय ? जन्माचे दरिंदर,तुला आता कायबी देवू शकणार नाही.जेवढं आमच्या झोळीत होतं ते सर्व तुला देऊन झालं.आता म्हातारे झालो.हातापायातलं बळ संपतं चाललंय.तुला आमची आता गरजच नाय.पण तू आमच्यापासून दूर राहिला तरी त्येचं आम्हाला वाईट नाही. " तू सुखात रहा ! "

" तू खूप सुखात रहा! तुला दुखाचा कधी चटका लागू नये.म्हणून आई अंबाबाईला हात जोडून प्रार्थना! "

आणि बाळा,एक गोष्ट ऐक…चुकलो असू आम्ही तर माफ कर.🙏

रमाबाईचं ऐकूण तुझा बाबाला राहवलं नाही.तू बोलवलं नसलं तरी , ते तुला भेटण्यासाठी आठ दिवसांपुर्वी तुझ्या बंगल्यावर आले.पण,तुझ्या बंगल्याचा गेटजवळच तुझा बाबाला तुझ्या पट्यावाल्यांन अडवलं. 

" ए,भिकारड्या...कोण रं तू ?"

अरं दादा,मी तुझा सायबाचा बाप हाय.त्याला भेटाया आलोय ! त्याची आवडती ' मोहनथाळ ' घेऊन आलोय.मला आत जाऊ दे रं दादा.! "

" तू...अन सायबाचा बाप ! चोर , भिकारी,चल निघ इथनं! सायबांचा बाप कधीचा मेलाय !" म्हणत त्याने तुझा बाबाला ढकललं.त्ये भूईवर खाली पडले.तव्हा,तू बंगल्यातून बाहेर आला. " गणा,कोण आहे  रे हा ? " विचारलं.

" साहेब,आहे कोण तरी भिकारी.तुम्हाला भेटायचं म्हणतो.मी म्हटलंय,साहेबांना वेळ नाही .चल निघ ! 

" तेव्हा तू " ठिक , निघतोय मी .जायला सांग त्याला! " असं म्हणत बाळा,तू गाडीत बसून निघून गेला.साधी विचारपुस सुद्धा केली नाहीस रे तू! पोरा,हा संस्कार केला नव्हता रे तुझ्यावर . इतका निर्दयी कसा झालास रे तू ? पोरा,मी विसरलेच रे,तू आता मोठा सायब झालास.शिरमंताचा जावाई झालास,पैसैवाला झालास,म्हणून गर्व तर नाही झालाय ना तुला ? पोरा,नको रे हा गर्व ! गर्वाचं काही काही टिकत नाही.ऐक माझं आणि सोडून दे हा विचार. माणसं ओळख,माणसं जोड.ती आयुष्यभर पुरतात.मान-पान-शान पद असे तो राहते.नंतर ते सरते.हे नको विसरु रं लेकरा ! "

 बाळा, तुझा घरुन परत आल्यावर तुझा बाबांन धिर सोडला.हाय खाल्ली.म्हणाले,

 " आपण आपल्या पोराला परके झालो गं! ओळख मोडली त्यानं ,ओळख मोडली…" म्हणत ते धाय मोकलून रडले.😭जेवण खाणं बंद केलं.तुझा वागण्याला बघून त्यांनी चार दिवसांत जगाचा निरोप घेतला.मी विधवा झाले पोरा,तुझे पितृछत्र असं कोसळलं.जे पुन्हा दिसणार नाही.काळाचा पोटात गुडुप झालं….!

रमाबाई मला म्हणाली," बाय,तुझी सून तूझ्या पोराला ईचारत होती," तुझ्यासाठी तुझा बाबानं काय केलं? "

या प्रश्नाला तू गप्प होतास म्हणे ! 

पण ...तूला तुझा बायकोसमोर जे बोलण्याचं धाडस झालं नाही.ते सगळं मी ह्या पत्रात लिहलंय.ते वाचून दाखव तिला.अन् सांग,तुझी बायको म्हणजे आमची सुन, कुटुंबाची गृहलक्ष्मी तिच्याबाबत आम्हाला कधी राग ना द्वेष नाहीच! तीही सुखात राहो हा आशीर्वाद सांग ! तुझे आई-बाबा म्हणून नातवांना डोळे भरुन पाहू शकलो नाही.म्हणून ह्या वेड्या आजीचा मंगल आशीर्वाद सांग! सांगशील ना! हे मागणे नव्हे तर  विनंती समज पोरा!"🙏

पण शेवटी एकच मागणं ,तुला वाढवताना आम्ही जे घरंदाज संस्कार केले.ते संस्कार तू तुझ्या मुलांवर कर! न जाणो, आमच्या वाट्याला जे दुःख आलं ते तुम्हा नवरा बायकोच्या वाट्याला न येवो.ही अंबाबाई चरणी प्रार्थना!तुला नातवांनी विचारलंच ," आजी आजोबा कुठं राहतात.त्यांना भेटायचं आहे ."

" तू सांग,चिमण्यांनो, तुमचे आजी-आजोबा माझ्या लहानपणीच एका अपघातात मेले.ज्यांना मीही डोळे भरुन पाहिले नाही.असं सांग.पण,आमची ओळख करुन देऊ नकोस!ही तुला हात जोडून विनंती!🙏"

तू व तुझा परिवार सुखात राहो! हा आशीर्वाद!


✍️ तुझी आई 


प्रा.पुरुषोत्तम पटेल, म्हसावद

भ्रमणध्वनी-8208841364




पत्रलेखन

 मुलाचे आई-बाबांना पत्र…


महाशक्तीरुपी, प्रेरणाशक्ती,सकलगुणनिधी,तिर्थरुप आई-बाबा…

तुम्हाला शिरसावंद्य नमस्कार !🙏

  आई,मला अमेरिकेला येऊन एक वर्ष झाले.ह्या एक वर्षाच्या काळात तुझी अन् बाबांची आठवण आलीच नाही,असा एकही दिवस गेला नाही.

आई ! आज सकाळी सकाळी व्हॉटसअपवर एक व्हिडिओ पाहिला.

" या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या

  जाहल्या,तिन्ही सांजा जाहल्या…"

आई,त्या भावगीतातील एकेक शब्द ऐकताना हृदय विदिर्ण होत होते.हृदयावर कोणीतरी जोरजोराने मोठ्ठा हातोडा मारीत आहे असे वाटत होते...डोळ्यातील अश्रूधारा धबधबा कोसळावा तसे बाहेर येत होते.

मी ते गीत ऐकूण भावविव्हळ झालो.

मन सांगत होते, ' ही अवस्था आई-बाबांची तर नसेल ना ? ' वाटले,आत्ताच निघावे.आणि तुम्हाला मिठी मारावी.

आई-बाबा, मला रात्रभर डोळ्याला डोळा लागला  नाही हो !शंकेचे मुषक माझे मन क्षणाक्षणाला कुरतडत होते.

तू आणि बाबा सुखात आहात ना? आई,प्रात:काळी उठून " बाप्पा ,माझ्या जन्मदात्यांना सुखात ठेव रे ! प्रार्थना केलीय मी !"🙏

  ते गीत ऐकल्यापासून रोज उठल्यावर ते रात्री झोपेपर्यंत अनेकवेळा तुम्ही माझ्या डोळ्यासमोर उभे असल्याचे मला भास होतात.आई-बाबा ! तुमच्या प्रेमळ आठवणी मला आजही अस्वस्थ करतात हो.डोळे ओलावतात ग् आई.

पण,डोळे पुसणारे तुम्ही कोणीच जवळ नसतात.

मराठीच्या पीएम सरांनी शिकविलेला

 " जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी । " हे संस्कृत सुभाषित आठवलं.आई त्यांनी समजावले होते, " जगात आई आणि जन्मभूमी हे दोन्ही स्वर्गाहून ही मोठे होत.म्हणून स्वर्गाची अपेक्षा फोल आहे.खरा स्वर्ग तर ह्या दोन्हींचा ठिकाणीच वसला आहे.त्यांची सेवा केली तर स्वर्गसुख मिळणारच."

 आई, मी इथे अमेरिकेत आपलेपणा हरवल्याचे अनुभवतोय ! जन्मदाते आणि आपल्या जन्मभूमी पासून दूर झाल्याशिवाय त्यांचा माया-ममत्वाची ऊब नाही कळत ! 

आई,हे अमेरिकेत आल्यावर कळलंय ग् मला ! 

आई-बाबा,तुम्हाला सांगतो, अमेरिकेत मला सर्व सुख-सुविधा लिलया मिळताहेत! माझी नोकरी म्हणजे ' सोन्याचं अंडी देणारी कोंबडीच ! ' इथे मोठ्या रकमेचा पगार मिळतोय मला.पण त्या पैशाला की ना आई, मी शाळेत जातांना तू देत असलेल्या एक रुपयाची देखील मोल नाही,असं वाटतं गं... 

एक बेल वाजवली,की सेवेला माणूस हजर! एक फोन केला की,जे हवे ते निमिषार्धात माझ्या टेबलावर ठेवले जाते.पण,त्या वस्तुंना,त्या पेय व पदार्थांना तुझ्या मायेच्या आणि सुगरण हाताचा स्पर्शच नाही. हे सारे खूप महागडे असले तरी  मला निरस,कंटाळवाणे,बेचव भासते.आई,मला कळत नाही तू इतकं प्रेम का लावले ग् मला ? तुझे हे प्रेम मला जन्मोजन्मी लाभ दे ! तुझ्या प्रेमाचे रसायन अजुनतरी जगातील  कोणत्याच कंपनीला बनवता आलेले नाही हे अगदी खरंय!❤️ कुठे झिरपते आई-बाबा हे जिव्हाळ्याचे न विसरता येणारे रसायन ? सांगा ना !

आई,मी अमेरिकेत यायला निघालो तेव्हा बाबांनी मला गणपती बाप्पाची एक छोटीसी तसबिर दिली होती.आठवते न् आई तुला ? 

तेव्हा तू म्हणाली होतीस, " हा गणपती बाप्पा म्हणजे बुद्धिदाता,सुखकर्ता व दुःखहर्ता.तोच तुझी माऊली आणि साऊलीही! तोच चिंतामणीही आहे ! तू जेव्हा नवीन कामाला सुरुवात करशील तेव्हा त्यास प्रथम  नमस्कार कर!🙏तुला एकटे वाटेल तेव्हा त्याच्याशी बोल! तुझ्या मनातील सर्व चिंता तो दूर करिल." 

आई तू सांगितल्याप्रमाणे मी रोज सकाळी माझ्या ड्युटीवर जाण्यापुर्वी ह्या विघ्नहराला नमस्कार करतो.🙏 मला एकटे वाटले तेव्हा त्याच्याशी गप्पा करतो.खरंच खूप हायसे वाटते मला !अन् जणू तुम्हीच माझ्याशी बोलत असल्याचा भास होऊ लागतो.

माझे रोजचे कार्य तुझ्या अन् बाबांच्या आठवणीनेच सुरु होते... 

आई-बाबा,मी खेड्यातला एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा साता समुद्रापार आलो. सुरुवातीला मी वामनाने तीन पावलात त्रिखंड व्यापले तेवढा आनंद अनुभवला.पण महिन्याभरातच तो कापूर उडून जावा,तसा उडून गेला. आनंद शोधूनही सापडत नाही हो मला ! गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे,पण... आपल्या प्रेमाच्या माणसांची सोबत हरवून अमेरिकेत आलो की काय असे वाटतेय मला इथे ! कोणावर रागही करता येत नाही अन् मनातला एकटेपणा भडाभडा बोलून मोकळं ही होता येत नाही.इथं जो तो आपापल्या धुंदीत जगतो.शान-शौकी,मद्य आणि सिगारेट्स तर इथल्या तरुण-तरुणींची आवडती व्यसनं,ही व्यसने इथल्या समाजाची गरज झालीय जणू!

त्यांच्यासोबत जावे तर,friend,This is a beer, please try once, atleast a half peg..आई,मी त्यांना विनम्रपणे म्हणतो,Sorry to say that but I'm not interested in any kind of drinks... असं काही सांगितले तर Yor are silly म्हणून हिणवले जाते.म्हणून मी ड्युटीवरुन आलो की घरी एकटाच थांबतो.अगदी कात्रित अडकल्यासारखी गत झालीय हो माझी!

 तुमची आठवण येऊन मन प्रचंड होमसिक होतं.

पण मी भारतात सहज परत येऊही शकत नाही.ते काय मुंबई टू गोवा थोडेच आहे.शिवाय मी कुबेरपुत्रही नाही.चार सहा तासांत फ्लाईटने यायला ! 

मला आठवते,माझ्या शिक्षणासाठी व फ्लाईटच्या तिकीटासाठी तुमच्याहाती पुरेशी रक्कम नव्हती.एवढी ऐपत नसतांनाही मला अमेरिकेला जाऊन शिकण्याची व नोकरीची तिव्र इच्छा होती.आई,वेडच म्हण ना ! माझी इच्छा पुर्ण करण्यासाठी बाबांनी रक्ताचा घाम गाळून कमविलेली चार एकर शेती सावकाराला गहाण ठेवण्याचा बाबांना तू आग्रह केला.आणि बाबांनी,हजारदा सावकाराच्या विनवण्या केल्या.हे काय माहिती नाही का मला?

 तुम्ही चार लाख मिळवून मला अमेरिकेत पाठविले.तेव्हा बाबांना तूच म्हणाली होतीस की,

" जाऊ द्या की ...आपला लेक अमेरिकेत जाऊन खूप शिकेल हो…मोठ्या पगाराची नोकरी करेन.रग्गड पैसा कमवून शेती परत मिळवून देईन...पैसा पैसा काय करताय हो,पैसा तर सळ्ळी कोंबडीही खात नाही." असं म्हणून तूच तर धिर दिला होतास बाबांना.हे मी नाही विसरु शकत आई.

आई,इथे आपल्या घरात असलेली आपुलकी,आनंद पैशांनी ही मिळत नाही ग्.निदान तुमची भेट होईपर्यंत काही दिवस का असेना अनुभवता आला असता.पण ते सुखही इथे नाही हो बाबा !म्हणून वाटते.भारतात उडत उडत यावे.तुम्हाला कडकडून मिठी मारावी.

असो. भारतात परत यायची इच्छा असूनही मी परत येऊ शकत नाही.सावकाराची रक्कम परत करायची न् आई ? मग तेवढी रक्कम होइस्तो थांबावेच लागेल न् मला. हट्ट माझाच होता.त्याची शिक्षा मला भोगलीच पाहिजे की नाही आई ? 

 दहावीच्या पुस्तकात वि.दा.सावरकरांची ' सागरा प्राण तळमळला ' ही कविता अभ्यासतांना इंग्लंडला असलेल्या स्वातंत्रवीर सावरकरांना मायभूमीला भेटण्याची  जी तळमळ लागली होती,तीच तळमळ मलाही लागलीय गं ! पण मी केलेल्या वेडेपणामुळे प्रोग्नो कंपनीशी किमान तीन वर्षांचा बॉण्ड लिहून झाल्याने मला तो मोडताही येणार नाही.

अगदी कात्रित अडकल्यासारखी गत झालीय हो माझी!

तुम्ही आठवले की मन प्रचंड होमसिक होतं.धरलं तर चावतं,सोडलं तर पळतं ! अशी अवस्था झालीय माझी.मी काय करु आई? सांग ना ग् !सांग ना ?

पण तुला सांगतो आई,

बाबांनी मला सांगितलेले ते वाक्य," बाळा,तू जिथे जाशील तिथे तुला मी शिकविलेला सुसंस्कार इतरांना दे.पण इतरांचा एकही वाईट दुर्गुण घेऊ नकोस.हे मी जीवापाड जपतोय.

बाबा,मला समजावताना तुम्ही सांगितलेली गोष्ट - देवगुरु बृहस्पतीपूत्र कच असूर गुरु शुक्राचार्याकडे संजीवनी विद्या घ्यायला गेला होता.असूरांसोबत विद्या ग्रहण करतांना त्याने असूरांचा एकही दुर्गुण घेतला नाही की देवयांनी त्याचा प्रेमात पडली असताही तिला विनम्रपणे त्याने नकार दिला.उचलला फक्त संजीवनी विद्येच्या मंत्र.आणि घरुन जसा निर्मळ गेला तसाच तन-मनाने निर्मळच घरी परतला.तूही तसाच तन-मनाने निर्मळ रहा." 

बाबा, ही शिकवण मी माझ्या हृदयाच्या पटलावर कोरुन ठेवलीय ! मी सुद्धा इथे कुणीही तरुणीचा प्रेमात पडणार नाही.व प्रेमात पडूही देणार नाही.कचासारखाच शुद्ध येऊन मिळेल तुम्हाला.आई,हे वचन आहे माझे !

ते प्राणपणे पार पाडीन मी .

आई-बाबा,एक सांगतो, अमेरिकेत येणा-या माझ्या सर्व नवतरुणांना इथे सर्वकाही सुख मिळेल,जगातील ऐंशी टक्के श्रीमंती इथे नांदते...पण येथील माणसं केवळ वीस टक्के सुख अनुभवताना दिसतात.जगातील सगळ्यात जास्त घटस्फोट इथे होतात. एकत्र कुटुंब पद्धती इथे दिसणे महामुश्कीलच!लग्न झाले की,मुलगा आपली बायको घेऊन आई-बाबांपासून विभक्त होतो.

ह्यालाच इथे ' जीवन ऐसे नाव ! ' असा हा देश!   

 ज्या भूमित आई-बाबांना केवळ जन्माचे साधन मानले जाते,ज्या भूमीत मनाचे समाधान नसेल त्या भूमीत सोन्याचा खाणी असल्या तरी त्या भूमीत वास्तव्य नको.अशी भूमी मानवातील माणूसकी जाळून असुरी प्रवृत्ती जोपासते,ती भूमी त्याज्य करावी.असे आपले जुने-जानते म्हणून गेले.हे मला इथे आल्यावर पटलंय आई!

म्हणून  हात जोडून शेवटचे एकच आग्रहाचे सांगतो,

गड्यांनो,आपली भारतमाताच श्रेष्ठ होय! तिची सेवा करता करता स्वर्गसुखाचा मेवा खाऊ या!मी पण लवकरच परत  येतो आपल्या भारतमातेच्या सेवेला…!

जय हिंद!🙏 वंदे मातरम् !🙏


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

    म्हसावद

शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१

चिऊताई , कविता

चिऊताई

चिऊताई,चिऊताई

कुठे गेली ग् बाई ?

तुला टाकून घास मला

गोड लागतच नाही

सोड रुसवा ऐक विनवणी परत ये ग् बाई


प्रेमळ माझी आई 

घास भरवते मला

राखून ठेवते रोज

एक घास तुझाच

जेवायला माझ्याशी तू परत ये ग् बाई


सिमेंटच्या गावात

घरटी मोडून गेली 

म्हणून रागावून तू

उडून का दूर झाली

देईन तुला सुंदर घरटे परत ये ग् बाई


पिल्लांना तुझ्या मी

खूप लळा लावीन

तांदळाची कणी 

खायला गे घालीन

अंगणात बागडाया तू परत ये ग् बाई


तुझा चिवचिवाट

मला हवासा वाटे

काऊच्या कावकाव

भयकारीच वाटे

आनंदें नाचू आपण तू परत ये ग् बाई


तुझे आणि माझे

जन्मजन्माचे सख्य

जीवापाड जपेन मी

पुरविन सारे लक्ष

गप्पा करु एकमेकी तू परत ये ग् बाई


नको धरु चिऊताई

माणसांची ग् भिती

प्रेमाने जोपासू दोघी

घट्ट मैत्रीची नाती

माणसाला साद द्याया तू परत ये ग् बाई

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



गुरुवार, सप्टेंबर ०९, २०२१

भूलोळी : लेखन विषयक नियम


मित्र मैत्रिणींनो... नमस्कार !🙏
भूलोळी , मनाला भूरळ पाडणारी शब्दरचना ! केवळ चार ओळीत सुंदर काव्यलेखनाचा हा नवीन प्रकार मला  देवी शारदा कृपेने सहज स्फुरला.हा एक नवीन काव्यरचना प्रकार.हा लेखन प्रकार जन्मा घालावा असा देवी शारदेने जणू मजला आदेश दिला.तीजला वंदन करुन मी
 " भूलोळी " या लेखन प्रकारात लेखन करीत आहे !
[माझे प्रथम भूलोळी लेखन pratilipi वर दि.१७ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध झाले आहे.आजपावेतो ६५ भूलोळी लिहून पूर्ण केल्या असून pratilipi वर प्रकाशित झाल्या आहेत.व यापुढेही लेखन सुरुच आहे.]

✒️ देवी शारदे !🌹🙏( भूलोळी क्र १  )
मॉ तुझे मेरा प्रणाम🙏
आज दे तू मजला आशिष
करता रहूं मैं तेरा गुणगान
लिहितो आद्य भूलोळी झुकवून शीश

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

" भूलोळी " ही फक्त चार ओळीत लेखन करावयाची असून तिला शब्दांची नव्हे; तर, ४२ अक्षरांची मर्यादा आहे.पहिली आणि तिसरी ओळ हिंदी भाषेत ,तर दुसरी आणि चौथी ओळ मराठी भाषेत अशी ही मनमोहक नुतन काव्यरचना आहे.माझ्या स्वतःच्या प्रतिभेने स्फुरले भूलोळी लेखन प्रकाराविषयी अधिकची माहिती - 
पहिली ओळ (हिंदी) अक्षरसंख्या  -०८
दुसरी ओळ (मराठी)अक्षरसंख्या - १०
तिसरी ओळ (हिंदी)अक्षरसंख्या -  १२
चौथी ओळ (मराठी)अक्षरसंख्या - १४
दुसरी व चौथी ओळ यात यमक साधला आहे.
आपणही माझ्या या नवीन भूलोळी रचना प्रकारात मी केलेले लेखन वाचन करावे. समिक्षा द्यावी.
ही आनंददायी भूलोळी आपणास भूरळ घालेलच! आपणही लेखन करुन चालना द्यावी .🙏
✒️ भूलोळी- रचना क्रं.२

२) ए शोना
शोना तेरे बिन मेरा
एक क्षण ही जात नाही ग्
कैसे कहूं जानू मैं तुम्हारे सिवा
आयुष्यात सुखी होऊ शकत नाही ग्

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
   म्हसावद,(नंदुरबार )

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...