मुलाचे आई-बाबांना पत्र…
महाशक्तीरुपी, प्रेरणाशक्ती,सकलगुणनिधी,तिर्थरुप आई-बाबा…
तुम्हाला शिरसावंद्य नमस्कार !🙏
आई,मला अमेरिकेला येऊन एक वर्ष झाले.ह्या एक वर्षाच्या काळात तुझी अन् बाबांची आठवण आलीच नाही,असा एकही दिवस गेला नाही.
आई ! आज सकाळी सकाळी व्हॉटसअपवर एक व्हिडिओ पाहिला.
" या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या
जाहल्या,तिन्ही सांजा जाहल्या…"
आई,त्या भावगीतातील एकेक शब्द ऐकताना हृदय विदिर्ण होत होते.हृदयावर कोणीतरी जोरजोराने मोठ्ठा हातोडा मारीत आहे असे वाटत होते...डोळ्यातील अश्रूधारा धबधबा कोसळावा तसे बाहेर येत होते.
मी ते गीत ऐकूण भावविव्हळ झालो.
मन सांगत होते, ' ही अवस्था आई-बाबांची तर नसेल ना ? ' वाटले,आत्ताच निघावे.आणि तुम्हाला मिठी मारावी.
आई-बाबा, मला रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही हो !शंकेचे मुषक माझे मन क्षणाक्षणाला कुरतडत होते.
तू आणि बाबा सुखात आहात ना? आई,प्रात:काळी उठून " बाप्पा ,माझ्या जन्मदात्यांना सुखात ठेव रे ! प्रार्थना केलीय मी !"🙏
ते गीत ऐकल्यापासून रोज उठल्यावर ते रात्री झोपेपर्यंत अनेकवेळा तुम्ही माझ्या डोळ्यासमोर उभे असल्याचे मला भास होतात.आई-बाबा ! तुमच्या प्रेमळ आठवणी मला आजही अस्वस्थ करतात हो.डोळे ओलावतात ग् आई.
पण,डोळे पुसणारे तुम्ही कोणीच जवळ नसतात.
मराठीच्या पीएम सरांनी शिकविलेला
" जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी । " हे संस्कृत सुभाषित आठवलं.आई त्यांनी समजावले होते, " जगात आई आणि जन्मभूमी हे दोन्ही स्वर्गाहून ही मोठे होत.म्हणून स्वर्गाची अपेक्षा फोल आहे.खरा स्वर्ग तर ह्या दोन्हींचा ठिकाणीच वसला आहे.त्यांची सेवा केली तर स्वर्गसुख मिळणारच."
आई, मी इथे अमेरिकेत आपलेपणा हरवल्याचे अनुभवतोय ! जन्मदाते आणि आपल्या जन्मभूमी पासून दूर झाल्याशिवाय त्यांचा माया-ममत्वाची ऊब नाही कळत !
आई,हे अमेरिकेत आल्यावर कळलंय ग् मला !
आई-बाबा,तुम्हाला सांगतो, अमेरिकेत मला सर्व सुख-सुविधा लिलया मिळताहेत! माझी नोकरी म्हणजे ' सोन्याचं अंडी देणारी कोंबडीच ! ' इथे मोठ्या रकमेचा पगार मिळतोय मला.पण त्या पैशाला की ना आई, मी शाळेत जातांना तू देत असलेल्या एक रुपयाची देखील मोल नाही,असं वाटतं गं...
एक बेल वाजवली,की सेवेला माणूस हजर! एक फोन केला की,जे हवे ते निमिषार्धात माझ्या टेबलावर ठेवले जाते.पण,त्या वस्तुंना,त्या पेय व पदार्थांना तुझ्या मायेच्या आणि सुगरण हाताचा स्पर्शच नाही. हे सारे खूप महागडे असले तरी मला निरस,कंटाळवाणे,बेचव भासते.आई,मला कळत नाही तू इतकं प्रेम का लावले ग् मला ? तुझे हे प्रेम मला जन्मोजन्मी लाभ दे ! तुझ्या प्रेमाचे रसायन अजुनतरी जगातील कोणत्याच कंपनीला बनवता आलेले नाही हे अगदी खरंय!❤️ कुठे झिरपते आई-बाबा हे जिव्हाळ्याचे न विसरता येणारे रसायन ? सांगा ना !
आई,मी अमेरिकेत यायला निघालो तेव्हा बाबांनी मला गणपती बाप्पाची एक छोटीसी तसबिर दिली होती.आठवते न् आई तुला ?
तेव्हा तू म्हणाली होतीस, " हा गणपती बाप्पा म्हणजे बुद्धिदाता,सुखकर्ता व दुःखहर्ता.तोच तुझी माऊली आणि साऊलीही! तोच चिंतामणीही आहे ! तू जेव्हा नवीन कामाला सुरुवात करशील तेव्हा त्यास प्रथम नमस्कार कर!🙏तुला एकटे वाटेल तेव्हा त्याच्याशी बोल! तुझ्या मनातील सर्व चिंता तो दूर करिल."
आई तू सांगितल्याप्रमाणे मी रोज सकाळी माझ्या ड्युटीवर जाण्यापुर्वी ह्या विघ्नहराला नमस्कार करतो.🙏 मला एकटे वाटले तेव्हा त्याच्याशी गप्पा करतो.खरंच खूप हायसे वाटते मला !अन् जणू तुम्हीच माझ्याशी बोलत असल्याचा भास होऊ लागतो.
माझे रोजचे कार्य तुझ्या अन् बाबांच्या आठवणीनेच सुरु होते...
आई-बाबा,मी खेड्यातला एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा साता समुद्रापार आलो. सुरुवातीला मी वामनाने तीन पावलात त्रिखंड व्यापले तेवढा आनंद अनुभवला.पण महिन्याभरातच तो कापूर उडून जावा,तसा उडून गेला. आनंद शोधूनही सापडत नाही हो मला ! गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे,पण... आपल्या प्रेमाच्या माणसांची सोबत हरवून अमेरिकेत आलो की काय असे वाटतेय मला इथे ! कोणावर रागही करता येत नाही अन् मनातला एकटेपणा भडाभडा बोलून मोकळं ही होता येत नाही.इथं जो तो आपापल्या धुंदीत जगतो.शान-शौकी,मद्य आणि सिगारेट्स तर इथल्या तरुण-तरुणींची आवडती व्यसनं,ही व्यसने इथल्या समाजाची गरज झालीय जणू!
त्यांच्यासोबत जावे तर,friend,This is a beer, please try once, atleast a half peg..आई,मी त्यांना विनम्रपणे म्हणतो,Sorry to say that but I'm not interested in any kind of drinks... असं काही सांगितले तर Yor are silly म्हणून हिणवले जाते.म्हणून मी ड्युटीवरुन आलो की घरी एकटाच थांबतो.अगदी कात्रित अडकल्यासारखी गत झालीय हो माझी!
तुमची आठवण येऊन मन प्रचंड होमसिक होतं.
पण मी भारतात सहज परत येऊही शकत नाही.ते काय मुंबई टू गोवा थोडेच आहे.शिवाय मी कुबेरपुत्रही नाही.चार सहा तासांत फ्लाईटने यायला !
मला आठवते,माझ्या शिक्षणासाठी व फ्लाईटच्या तिकीटासाठी तुमच्याहाती पुरेशी रक्कम नव्हती.एवढी ऐपत नसतांनाही मला अमेरिकेला जाऊन शिकण्याची व नोकरीची तिव्र इच्छा होती.आई,वेडच म्हण ना ! माझी इच्छा पुर्ण करण्यासाठी बाबांनी रक्ताचा घाम गाळून कमविलेली चार एकर शेती सावकाराला गहाण ठेवण्याचा बाबांना तू आग्रह केला.आणि बाबांनी,हजारदा सावकाराच्या विनवण्या केल्या.हे काय माहिती नाही का मला?
तुम्ही चार लाख मिळवून मला अमेरिकेत पाठविले.तेव्हा बाबांना तूच म्हणाली होतीस की,
" जाऊ द्या की ...आपला लेक अमेरिकेत जाऊन खूप शिकेल हो…मोठ्या पगाराची नोकरी करेन.रग्गड पैसा कमवून शेती परत मिळवून देईन...पैसा पैसा काय करताय हो,पैसा तर सळ्ळी कोंबडीही खात नाही." असं म्हणून तूच तर धिर दिला होतास बाबांना.हे मी नाही विसरु शकत आई.
आई,इथे आपल्या घरात असलेली आपुलकी,आनंद पैशांनी ही मिळत नाही ग्.निदान तुमची भेट होईपर्यंत काही दिवस का असेना अनुभवता आला असता.पण ते सुखही इथे नाही हो बाबा !म्हणून वाटते.भारतात उडत उडत यावे.तुम्हाला कडकडून मिठी मारावी.
असो. भारतात परत यायची इच्छा असूनही मी परत येऊ शकत नाही.सावकाराची रक्कम परत करायची न् आई ? मग तेवढी रक्कम होइस्तो थांबावेच लागेल न् मला. हट्ट माझाच होता.त्याची शिक्षा मला भोगलीच पाहिजे की नाही आई ?
दहावीच्या पुस्तकात वि.दा.सावरकरांची ' सागरा प्राण तळमळला ' ही कविता अभ्यासतांना इंग्लंडला असलेल्या स्वातंत्रवीर सावरकरांना मायभूमीला भेटण्याची जी तळमळ लागली होती,तीच तळमळ मलाही लागलीय गं ! पण मी केलेल्या वेडेपणामुळे प्रोग्नो कंपनीशी किमान तीन वर्षांचा बॉण्ड लिहून झाल्याने मला तो मोडताही येणार नाही.
अगदी कात्रित अडकल्यासारखी गत झालीय हो माझी!
तुम्ही आठवले की मन प्रचंड होमसिक होतं.धरलं तर चावतं,सोडलं तर पळतं ! अशी अवस्था झालीय माझी.मी काय करु आई? सांग ना ग् !सांग ना ?
पण तुला सांगतो आई,
बाबांनी मला सांगितलेले ते वाक्य," बाळा,तू जिथे जाशील तिथे तुला मी शिकविलेला सुसंस्कार इतरांना दे.पण इतरांचा एकही वाईट दुर्गुण घेऊ नकोस.हे मी जीवापाड जपतोय.
बाबा,मला समजावताना तुम्ही सांगितलेली गोष्ट - देवगुरु बृहस्पतीपूत्र कच असूर गुरु शुक्राचार्याकडे संजीवनी विद्या घ्यायला गेला होता.असूरांसोबत विद्या ग्रहण करतांना त्याने असूरांचा एकही दुर्गुण घेतला नाही की देवयांनी त्याचा प्रेमात पडली असताही तिला विनम्रपणे त्याने नकार दिला.उचलला फक्त संजीवनी विद्येच्या मंत्र.आणि घरुन जसा निर्मळ गेला तसाच तन-मनाने निर्मळच घरी परतला.तूही तसाच तन-मनाने निर्मळ रहा."
बाबा, ही शिकवण मी माझ्या हृदयाच्या पटलावर कोरुन ठेवलीय ! मी सुद्धा इथे कुणीही तरुणीचा प्रेमात पडणार नाही.व प्रेमात पडूही देणार नाही.कचासारखाच शुद्ध येऊन मिळेल तुम्हाला.आई,हे वचन आहे माझे !
ते प्राणपणे पार पाडीन मी .
आई-बाबा,एक सांगतो, अमेरिकेत येणा-या माझ्या सर्व नवतरुणांना इथे सर्वकाही सुख मिळेल,जगातील ऐंशी टक्के श्रीमंती इथे नांदते...पण येथील माणसं केवळ वीस टक्के सुख अनुभवताना दिसतात.जगातील सगळ्यात जास्त घटस्फोट इथे होतात. एकत्र कुटुंब पद्धती इथे दिसणे महामुश्कीलच!लग्न झाले की,मुलगा आपली बायको घेऊन आई-बाबांपासून विभक्त होतो.
ह्यालाच इथे ' जीवन ऐसे नाव ! ' असा हा देश!
ज्या भूमित आई-बाबांना केवळ जन्माचे साधन मानले जाते,ज्या भूमीत मनाचे समाधान नसेल त्या भूमीत सोन्याचा खाणी असल्या तरी त्या भूमीत वास्तव्य नको.अशी भूमी मानवातील माणूसकी जाळून असुरी प्रवृत्ती जोपासते,ती भूमी त्याज्य करावी.असे आपले जुने-जानते म्हणून गेले.हे मला इथे आल्यावर पटलंय आई!
म्हणून हात जोडून शेवटचे एकच आग्रहाचे सांगतो,
गड्यांनो,आपली भारतमाताच श्रेष्ठ होय! तिची सेवा करता करता स्वर्गसुखाचा मेवा खाऊ या!मी पण लवकरच परत येतो आपल्या भारतमातेच्या सेवेला…!
जय हिंद!🙏 वंदे मातरम् !🙏
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद