एक राजा होता.तो मृगया करण्यासाठी एका घनदाट अरण्यात गेला.शिकार करतांना तो खूप फिरला.पण,त्याला मृगाची शिकारच सापडली नाही.सूर्य डोक्यावर आला.
फिरता फिरता तो थकला,त्याला खूपच तहानही लागली.
त्याला धड चालण्याचे त्राण राहील की नाही,याची भिती वाटू लागली.राजा कठोर मन करुन आत्मविश्वासाने एकेक पाऊल चालत राहिला.
खूप दूरपर्यंत राजाला एकही नदी,एकही ओहोळ ,
एकही सरोवर,एकही कुप दिसले नाही.त्याच्या घशाला आता कोरड पडू लागली होती.तेवढ्यात त्याला समोर एक हिरवेगार,डेरेदार वृक्ष दिसला.त्या वृक्षाच्या एका फांदीवरील पानावरुन त्याला नितळ जलाचे थेंब जमिनीवर नितळत असल्याचे भासमान झाले.ते दृष्टोत्पत्तीस पडताच राजाला अपार आनंद झाला.जणू देवच पावला,असे राजाला वाटले .
राजा हर्षानंदाने जल निथळत असलेल्या वृक्षाच्या फांदीखाली जाऊन उभा राहिला.त्या फांदीच्या एका पानावरुन जमीनीवर निथळणारे पाणी पिण्याची त्यास तिव्र इच्छा झाली.ते पानावरुन गळणारे पाणी झेलण्यासाठी राजाने पळस पानांचे द्रोण बनविले.त्यात तो पानावरुन गळणा-या पाण्याचा एकेक थेंब झेलून घेत होता.अखेर थोड्या वेळाने तो द्रोण पाण्याने भरला गेला.राजाला आनंद झाला.तेवढ्यात त्या झाडाच्या एका फांदीवर एक पोपट येऊन बसला.भरलेल्या द्रोण पात्रातील पाणी पिण्याचा इच्छेने राजा तो द्रोण ओठांना लावणार,
तेवढ्यात तो पोपट मिठ्ठूऽऽ मिठ्ठूऽऽ करीत राजा जवळ गेला,व त्याने झडप मारुन राजाच्या हातातील द्रोण उलटा केला.व पोपट पुन्हा वृक्षावर जाऊन बसला.ओठाशी आलेला घोट वाया गेल्याने राजा खूपच निराश झाला.
राजाने पुन्हा दुसरा प्रयत्न केला,व पुन्हा पानावरुन ओघळणारा पाण्याच्या एकेक थेंबाने त्याने द्रोण पात्र भरुन घेतले.तो पानी पिण्यासाठी ओठाला लावणार तेवढ्यात तो पोपट पुन्हा राजाच्या दिशेने उडाला.व त्याने पुन्हा झडप घालून पाण्याच्या द्रोण उलटा केला.पोपटाचा हा क्रूरपणा पाहून राजा आता क्रोधित झाला.तो मनाशी म्हणाला,
" मी पुन्हा तिसरा प्रयत्न करेन.यावेळी मी सावध राहीन,
पोपट आला की त्याला तलवारीने कापूनच काढीन! "
संकल्प करुन राजा पुन्हा पाण्याच्या एकेक थेंब द्रोण पात्रात झेलू लागला.तिस-यांदा द्रोण पात्र त्याने मोठ्या कष्टाने भरले खरे! तो ते द्रोण पात्र ओठाला लावणार तेवढ्यात पोपट उडत उडत आला.द्रोणपात्रावर त्याने झडप घातली.त्या झटापटीत द्रोण पात्र खाली पडले,आणि उलटे होऊन रिकामे झाले.पण...राजाने त्या पोपटाला तलवारीने कापून टाकले होते.तो दोन तुकडे होऊन जमिनीवर मृत पडला होता.
राजाची तहान आता शिगेला पोहोचली होती.त्याला एकेक थेंब गोळा करण्यात वेळ नव्हता.त्याने विचार केला," जिथून पाणी येत आहे,त्याच जागी जाऊन पाणी पिऊन तृप्त व्हावे."
राजा त्या फांदीच्या मुख्य भागापर्यंत पोहचला.त्याने जे पाहिले,ते पाहून तो खूप घाबरला.त्या फांदीवर भला मोठा विषारी नाग विळखा घालून बसला होता.तो एकसारखा फुत्कार करीत होता.त्याच्या फुत्कारातून त्याच्या तोंडातील विषारी लाळ बाहेर पडत होती.तीच लाळ त्या फांदीवरुन त्या एका पानावरुन जमीनीवर निथळत होती.
राजाला सर्व प्रकार समजला.पोपटाचे एकदा नव्हे,
तिनदा द्रोण पात्र उलटे करण्याचा प्रयत्न ही लक्षात आला.
आपण या नागाचे विष प्राशन करु नये म्हणून पोपटाने आपणास तीनवेळा वाचविण्याचा प्रयत्न केला.पण आपण त्याचे प्रामाणिक व निस्वार्थी प्रयत्न समजून घेऊ शकलो नाही.आपण कृतघ्न व महापापी ठरलो.याचे राजाला खूपच दुःख झाले.तो खूप हताश झाला.राजा पोपटाबद्दल दुःख करु लागला. " आपण माणूस असूनही,बुद्धीवान असूनही एका मुक्या पक्षाची भावना समजून घेऊ शकलो नाही.मी क्रुर व वधकर्ता ठरलो.मी जर माझ्या क्रोधाला नियंत्रणात ठेवले असते.व पोपट असे का करीत आहे,हे संयमाने व निरीक्षणाने जाणून घेतले असते तर,मी पोपटाला समजू शकलो असतो.त्याचे प्राण वाचवू शकलो असतो.मी तर प्राण वाचवणा-याचेच प्राण घेतले कृतघ्न ठरलो मी ! "
राजाने मनोमन प्रतिज्ञा केली.
" मी प्रतिज्ञा करतो की,आजपासून मी मुक्या प्राणी,
पक्ष्यांना समजून घेऊन तयांवर दया करीन ,क्रोधामुळे विवेक हरवतो. माणूस चांगले-वाईट समजून घेण्याची बुद्धी गमावून बसतो. मी कोणावरही क्रोध करणार नाही ! "
तात्पर्य :- क्रोधाने मनुष्याला दुःख मिळते.म्हणून क्रोधावर नियंत्रण ठेवा !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल "पुष्प "