Kaayguru.Marathi

बुधवार, ऑक्टोबर २६, २०२२

गुलजार [ अष्टाक्षरी ]



प्रिये   किती  सुंदर  ग्    रुप   तुझे  गुलजार
तुला  बनविले ज्याने  त्याचे मानितो आभार 

प्रिये पाहिली  मेनका  रंभा  उर्वशी  स्वर्गीची
तुझ्या  पुढे  न टिकती  तू  ग  रती   मदनाची

पित  वर्णी  तुझी  काया वाटे  ग् बावणकशी
केस  सोनेरी  उडता  भासे तू  नागीन  जशी

डोळे   पाहता  वाटे   तू   मज  ग्   मृगनयनी
चाल तुझी मस्तानी ग  जणू  तू  गजगामिनी

माझा संसाराची  शोभे  तूच  तर खरी  राणी
तुझ्या संगती  लिहिली आपुली प्रीतकहाणी

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, ऑक्टोबर १८, २०२२

राजकारण

राजकारण 

जिथे नीतिला मिळत नाही गती
शब्दांची जिथे वाटत नाही भीती
राजकारण…

गल्ली ते दिल्ली सतत चालत राहते
मिडीयात अग्रस्थानी जाऊन बसते
राजकारण…

रक्त नात्यात दुरावा निर्माण करते
स्वार्थी पोळी सतत भाजत रहाते
राजकारण…

क्षणोक्षणी करते शब्दांची चिरफाड 
दिल्या वचनांची ठेवत नाही चाड
राजकारण…

रातोरात रंकाचा राव करुन देई
रावालाही रातोरात रंक करील
राजकारण…

खुर्चीसाठी सतराशे साठ उड्या
मतदारांना देते भूलथापांचा पुड्या
राजकारण…

आज या पक्षात उद्या त्या पक्षात
मर्यादा सोडून वागते जनमानसात
राजकारण…

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
 

शनिवार, ऑक्टोबर ०८, २०२२

आई-बाबा

आई माझी सरस्वती
जणू दिपकाची वाती
संस्कार तिचे संजीवक
लाभे जीवना सन्मती

सकल ज्ञानाचे आगर
बाबा माझे बृहस्पती
आशिष मिळता तयांचा
संकटे दूर हो पळती

आईच्या चरणी लाभे
मज स्वर्गसुखाची प्राप्ती
निराश मना मिळते
आनंदे जगण्याची गती

बाबांच्या एक एक शब्द
शिकवी मज प्रेमाची नाती
आयुष्याच्या वाटेवरती
टळे दुःख दैन्याची भीती

फिटे ना आई बाबांचे ऋण 
जरी घेतले जन्म साती
करीता आईबाबांची सेवा 
लाभे प्रभुकृपेचे माणिक मोती

शब्दार्थ - साती= सात

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल," पुष्प "

शुक्रवार, ऑक्टोबर ०७, २०२२

नवरात्रोत्सव:अर्थ व बोध

  नवरात्रोत्सव: अर्थ व बोध 
   
 हा देवी आदिशक्ती,आदिमातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक पवित्र पावन हिंदू सण आहे. 
   नवरात्री म्हणजे नऊ रात्रींचा समूह. असा शब्दशः अर्थ घेता येईल. हा सण पूर्वापार नऊ रात्री आणि दहा दिवस असा साजरा केला जातो.
१) प्रथम नवरात्री ही वर्षात चैत्र महिन्यात (मार्च/एप्रिलमध्ये) साजरी केली जाते. हा वासंतिक नवरात्रोत्सव. हा चैत्र शु।। प्रतिपदा ते चैत्र शु।। नवमीपर्यंत साजरा होत असतो.
२) दुसरी नवरात्री अश्विन महिन्यात ( सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये) साजरी केली जाते. हा शारदीय नवरात्रोत्सव होय. हा देवीउत्सव अश्विन महिन्याचा शुक्ल पंधरवड्यात शु।। प्रतिपदा ते शु।। नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. 
    अशा रितीने हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून चैत्र मासी आणि अश्विन मासी अशी दोन वेळा केली जाते. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात या नवरात्रोत्सवाला
ग्लोबल स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसते.
    सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप चैतन्यालाच देवी- आई - माता असे नाव देण्यात येऊन तिची पूजा करण्याची आदर्श प्रथा सुरु झाली. शाक्त संप्रदायी लोकांनी तर तिला विश्वजननी म्हटले.शाक्त पंथात शक्ती ही उपास्य देवता असून तिची परमतत्त्व या स्वरूपात उपासना केली जाते. हीच संवित्स्वरूपा देवी भगवती आपल्या अंतर्गत असलेल्या सृष्टीस बाह्य स्वरूपात प्रकट करते.
    शाक्त पंथ हा शक्तिप्रधान आहे. बऱ्याचशा ग्रंथांची रचना शिव व शक्ती यांच्या संवादाच्या रूपात केलेली आहे. ज्या ग्रंथात शक्ती किंवा पार्वती ही उत्तर देणारी असून शिव हा प्रश्नकर्ता असतो, तो शाक्त संप्रदायातील ग्रंथ होय.शैव संप्रदायात याच्या उलट ग्रंथरचना दिसते.शाक्त संप्रदायींनी या देवी भगवतीलाच
सर्वश्रेष्ठ देवता,आदिमाया,आदिशक्ती, जगदंबा म्हणून गौरविले. 
   देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. ती पुढीलप्रमाणे:- 
सौम्य रुपातील देवी :- 
उमा, गौरी, पार्वती, जगदंबा,भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे आहेत.
उग्र रुपातील देवी :-
दुर्गा, काली, चंडी, भैरवी,चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.
नवरात्रोत्सवातील देवीची नऊ रुपे :-

" प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति,कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि,ब्रह्मणैव महात्मना।।"
 १. शैलपुत्री २. ब्रह्मचारिणी ३. चंद्रघंटा 
 ४. कुष्मांडा ५. स्कंदमाता ६. कात्यायनी 
 ७. कालरात्री ८. महागौरी ९ सिद्धिदात्री
अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
     नवरात्रोत्सव हा ऋतू परिवर्तनाचा काळ म्हटला तर चुकीचे ठरणार नाही. नवरात्रीमुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह,नवीन उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभावही मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.असे वर्णन आहे.
 ✨ वासंतिक नवरात्रोत्सव हा विशेषत्वाने ऋतूराज वसंताच्या काळात येतो.रानावनातील वृक्षराजीची पर्णगळती झालेली असते. सर्वत्र रानावनात वाहत्या वा-याबरोबर कोरड्या पर्णाचा भितीप्रद खडऽखळाट सळसळ ऐकू येऊ लागते.हिरव्या पर्णाअभावी वृक्षही निस्तेज वाटू लागतात.रानात सर्वत्र जणू भकासलेपण पसरल्याचे दिसते.रानाची चैतन्य शक्ती क्षीण झाल्याचे दिसते.अशा वेळी ऋतूराज वसंत येतो.निष्पर्ण वृक्षराजी चैत्रपालवीची प्रसन्नता घेऊन षोढषवर्षीय कन्येसारखी लाजू लागते. जणू कोवळ्या लाल,केशरी, हिरव्या रंगांच्या साज लेवून रान नटू थटू लागते.पाहता पाहता रानात चैतन्याची सळसळ दौडू लागते.वृक्षराजी फुलांनी आणि फळांनी बहरते.नव्या,लाजरी नवरीसारखा साजशृंगार करुन, मोठ्या दिमाखात झुलणा-या आम्रमंजरीच्या मनमोहक पुष्पभाराला अलवार स्पर्श करुन वारा रानावनात,द-याखो-यात अमृतवार्ता सांगत सुटतो.हवालदिल झालेल्या रानपाखरांना सावलीचा गारवा मिळाल्याने त्यांनाही नवीन जीणे जगण्याची शक्ती मिळते.हा आगळा चैतन्यशक्तीचा आगमनाचा आनंदसोहळा म्हणजेच वासंतिक नवरात्रोत्सव म्हणता येईल.
असे हे सृष्टीतील परिवर्तन म्हणजे शक्तीचाच हा खेळ होय.
✨ शारदीय नवरात्रोत्सव हा शरद ऋतूच्या सुरूवातीलाच येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव असे म्हटले जाते. अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. पाऊसाचे चार महिने शेतीची कामे सुरु असत. पूर्वीच्या काळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असे. त्यामुळे त्या काळी समाजातील लोकांना बाहेर फिरणे,एकत्र येऊन आनंदसोहळे साजरे करणे शक्य होत नसे.काही वेळा तर पाऊस अखंड संततधार लावायचा.तर काही वेळा पाऊस महिनाभर मुक्कामही करायचा.धो धो कोसळणारा पाऊस नद्या नाल्यांना पूर- महापूर आणत असे.अशावेळी एका गावाचा दुस-या गावाशी संपर्क तुटायचा.परिणामी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्रीया,पुरुष घरातच थांबत असत. गावात मंदिर वा मठ असलाच तर तिथे पावसाच्या चातुर्मासात पांडवप्रताप,महाभारत, रामायण, किंवा अठरा पुराणांचे वाचन,तसेच भजन गायन असे मन प्रसन्न करणारे कार्यक्रम होत असत.किंवा नामसप्ताहाचेही आयोजन होत असे.हाच काय तो त्या काळी एक विरंगुळा होता.
    हळूहळू पाऊस ओसरु लागे,शेतातील पेरलेली पिके तरारुन येत.ज्वारी,बाजरीच्या कणसात मोत्यासारखे दाणे चमकू लागत. कणसे पक्व होऊन पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ असे.भारत हा कृषिप्रधान देश व कृषीसंस्कृतीचा देश म्हणूनच ओळखला जातो. त्याकाळी शरद ऋतूत येणारा हा नवरात्रोत्सव समाजातील धुरीणांनी कृषिविषयक लोकोत्सव बनवला. त्यामुळे शेतकरी व सगळा समाज हा उत्सव अत्यंत आनंदाने,प्रेमाने साजरा करु लागले. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. म्हणूनच नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करीत, व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले कोवळेंकूर उपटून देवीला वाहत. ही पद्धत या सणाचे कृषिविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे प्रगतीपथाकडे वाटचाल करणा-या समाजात या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्री हा भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला.
      नवरात्रोत्सवात ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.शक्तीच्या ( देवीच्या) उपासनेतून कुंडलिनी जागृती करता येते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्रोत्सव हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचे पर्व आहे असेही म्हणता येईल.
 ✨ नवरात्रोत्सव: अर्थ -
वरवर विचार करता ' नवरात्री म्हणजे नऊ रात्री ' असे म्हणता येईल. भारतीय संख्याशास्राचा विचार करता आठ या संख्येला वृद्धी,क्षय ही दोन्ही आहेत.मात्र नऊ ही संख्या अशी आहे की ती कोणत्याही परिस्थितीत मैत्री वाढवेल, पण क्षीण होणार नाही.उदा.
९×२=१८ , १+८= ९.       ९×७=६३ , ६+३=९
९×३=२७ , २+७= ९.       ९×८=७२ , ७+२=९
९×४=३६ , ३+६= ९.       ९×९=८१ , ८+१=९
९×५=४५ , ४+५= ९.       ९×०=०९, ०+९=९
९×६=५४ , ५+४= ९ 
गुणाकाराअंती आलेल्या संख्यांची बेरीज केली तर---- १८+२७+३६+४५+५४+७२+८१+०९=४०५ही संख्या येते.त्यातही ४+०+५=९ हाच मित्र अंक मध्यवर्ती होय.
   असा हा नऊ अंक म्हणजे परिपूर्णता….! पूर्णत्वाचे प्रतिक ! नऊ म्हणजे चक्राचे शेवटचे टोक ! नऊ म्हणजे संपूर्णत्व ! अथपासून ते इतिपर्यंत! सर्वांना आपल्यात सामावून घेणारे ! सर्वांगीण,सर्वदा ! शिवाय मानवाचा शरीराची सुद्धा नऊद्वारे होत.ती पुढीलप्रमाणे - 
दोन डोळे,दोन कान,दोन नाकपुड्या, एक मूत्रद्वार(शिश्न) ,एक गुदद्वार अशी दोन गुप्तांगे आणि एक तोंड. 
आणि या नऊद्वारांचा संबंध नऊ मुलभूत जीवन प्रेरणांशी पुढीलप्रमाणे जोडता येईल:-
तोंड- पोषणेच्छा , दोन डोळे - संरक्षणेच्छा,व प्रभुत्वेच्छा,दोन कान- अनुसरेणेच्छा व श्रवणेच्छा,दोन नाकपुड्या म्हणजे गंधेच्छा [ सुगंध व दुर्गंध] मूत्रमार्ग - कामेच्छा आणि गुदद्वार - उत्सर्जनेच्छा हे सुद्धा नऊ या संख्येत मोजले जातात.यांचेही संयम,तप, बल,शौर्य, तेज वाढविण्यासाठी सुद्धा नवरात्री उत्सव साजरा होत असावा.असे वाटते.
✨ नवरात्रोत्सव: बोध -
म्हणतात ना…
" यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।"
अर्थ - जिथे स्त्रियांची पूजा होते,तिथे देवतांचा सतत वास असतो.आणि जिथे स्त्रियांची पूजा होत नाही तिथे सकल चांगले कर्म सुद्धा निष्फळ होते.
     आधुनिक संत प्रवृत्तीचे भारतीय थोर विचारवंत महात्मा गांधी म्हणतात की,
" जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ! " अशा शब्दात त्यांनी स्त्रीला महत्त्व देऊन तिला सबला करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीचा स्त्रीत्वाचा दर्जा उंचावून स्त्री अबला नसून सबला आहे हे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून व प्रत्यक्ष जगण्यातून सिद्ध केले. 
   हा विचार लक्षात घेता समाजाच्या संरक्षण संवर्धन, समृद्धीसाठी स्री शक्तीचा केलेला सन्मान,स्री शक्तीविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता,तिचे पावित्र्य जपण्यासाठी सर्व स्वरुपी,सर्वरुपी स्रीची पूजा करण्याची ही कल्पकता खूपच थोर वाटते.अनादि काळी आपल्या पुर्वजांनी मांडलेला हा विचार प्रत्यक्षात साकार करण्यासाठी नवरात्रीच्या उत्सवातून निकोप विचारांचा पेरणीचा,समाज एकात्मतेचा जागर सुरु केला.त्यांना कृतज्ञतेने नमन केल्यावाचून पुढे जाणे शक्यच नाही!🌹🙏🙏🙏
    स्री म्हणजे प्रकृतीचे महन्मंगल रुप! जननी,माता,आई,जन्मदात्री,माय,अंगाई गाऊन जोजवणारी स्तनदा,कोणी वाकड्या नजरेने आपल्या बाळाकडे पाहिले तर त्याचे लचके तोडण्याचे सामर्थ्य असलेली वाघीण ! बाळाला लहानाचे मोठे करतांना आपल्या पंचप्राण एकत्र करुन सावली धरणारा वटवृक्ष,बाळाचा भार नऊ महिने नऊ दिवस आपल्या पोटात जीवापाड सांभाळून,त्यास जन्म देऊन पूर्णत्वास नेणारी, वंदनीय स्त्रीला माता, देवी रुप समजून तिची नऊ रुपांत पूजा करणे म्हणजे कृतज्ञतेचा हा दिव्य भव्य विनम्र सोहळाच !
   असंख्य रुपांनी, असंख्य हातांनी विश्व पुरुषाच्या वंशवेलीची केलेली ही जपणूक… नित्य…अव्याहत…निरंतर त्याची कृतज्ञतापूर्वक केलेली पूजा ! आंतरिक जिव्हाळ्याने केलेले स्मरण ! 
   मातेच्या ऋणातून परतफेड करणे शक्य नाहीच…! मात्र तिच्या अगणित ऋणातून काही अंशी उतराई होण्याचा हा अल्पसा प्रयत्न! अखंड पूजा ! नऊ दिवस ! नऊ रात्री ! म्हणजे नवरात्री!
  नवरात्रोत्सवप्रेमींनो… शेवटी एक नम्र विनंती !🙏 
✨घटस्थापना करणे म्हणजे नवरात्री नव्हे...!
✨अखंड ज्योत लावणे म्हणजे नवरात्री नव्हे...!
✨दांडिया खेळणे म्हणजे नवरात्री नव्हे...!
तर नवरात्री म्हणजे या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेता घेता बालिका जन्माचा आणि 
समस्त माता,भगिनिंचा,लेकी-सुनांचा सन्मान करणे म्हणजेच नवरात्री होय ! व ह्या सर्वांचा जागरण म्हणजे " नवरात्रोत्सव ! " होय.

सर्व मंगल मांगल्ये ।
शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी ।
नारायणी नमोस्तुते ।।

चला तर …आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्ताने नवसंकल्प करु या! 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्पम् "





Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...