Kaayguru.Marathi

रविवार, जुलै २३, २०१७

प्रिया

तू चोरले गुज मनीचे लपला ना चेहरा
जे नव्हते बोलायाचे बोलून गेला चेहरा
मैफिलीत जेव्हा  गायले आपुले प्रेमगीत
मिसळून सुर ओठी गाऊन गेला चेहरा
सखे तुझा वेणीत जेव्हा माळीला मी गजरा
गालावरी चंद्रखळी दावून गेला चेहरा
सखे भरुन गेली श्वासात गंध रातराणी
मलमली मिठीत माझ्या लाजून चूर चेहरा
पाहता तव चेहरा होय कलीजा खलास
बेनूर ही दुनिया कोहिनूर तुझा चेहरा.

   © प्रा.पुरूषोत्तम पटेल, म्हसावद
       09421530412

मंगळवार, जुलै १८, २०१७

जीवनाचे सार

     महाराष्ट्राची भूमी ही संताच्या पदस्पर्शाने पुण्यपावन आहे. याच मातीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती, आणि नामदेव, एकनाथ तुकाराम, समर्थ रामदास,चोखामेळा, निळोबाराय, जनाबाई, मुक्ताबाई , सकुबाई कान्होपात्रा बहिणाबाई अशी स्त्री  संताची मादियाळी पंढरपूरी चंद्रभागा वाळवंटात दाटू लागली.या संतानी समाजातील उच्च-निच, भेदभाव, विषमता, जातीभेद, हे सामाजिक वैगुण्य दूर करण्यासाठी भाव-भक्तीचा व श्रद्धा भावनांचा अचूक उतारा सांगितला. आपल्या वाणीतून संत ज्ञानेश्वर माऊलीने पसायदान मागितले. संत तुकाराम महाराजांनी तर आपल्या जन्माचेच गुपित उघड केले. ते एका अभंगात म्हणतात,       
     " आम्ही वैकुंठवासी आलो  |
             या चि कारणासी |
बोलीले जे ऋषी| साच भावे वर्तावया ||"
  अशी घुटिका देत संतसज्जनांनी सामान्य  जनांना समतेची अमृत-संजीवनी पाजली.
संत नामदेवांनी मानवी जीवनात नामस्मरण  हरिकिर्तन आणि  भगवंताचे अधिष्ठान अति महत्वाचे आहे.  ते मानवी जीवनाचे खरे सार आहे असे म्हटले. ते एका अभंगात वर्णन करतात,
" धिग तो ग्राम धिग तो आश्रम |
   संत समागम नाही जेथे ||
   धिग ते संपत्ती धिग  ते संतती |
   भजन सर्वाभूति नाही जेथे ||
   धिग तो आचार धिग तो विचार |
   वाचे सर्वेश्वर नाही जेथे ||
   धिग तो वक्ता धिग तो श्रोता |
   पांडुरंग  कथा नाही  जेथे ||
   धिग ते गाणे धिग ते पढणे |
   विठ्ठल  नामे बाण नाही जेथे ||
   नामा म्हणे धिग धिग त्यांचे जिणे |
   एका नारायणे वाचूनिया || "
अर्थ : धिग =धिक्कार, पढणे= शिकून घेणे.
         एका= एक
         नारायणे= श्री विष्णु,श्रीहरी
   या अभंगात संत नामदेव  म्हणतात,
"  जिथे संत समागम नाही त्या गावाचा आणि आश्रमाचा धिक्कार असो. जिथे श्रीहरी चे भजन नाही तेथील संपत्तीचा आणि  संततीचा धिक्कार असो.जिथे वाचावर (जिभेवर )
सर्वेश्वर नाही त्या आचार व विचारांचा धिक्कार असो. जिथे पांडुरंग कथा नाही  असा वक्ता व श्रोता यांचाही धिक्कार असो. जिथे विठ्ठल नाम नाही असे  गाणे आणि वाचन - पठणाचा धिक्कार असो. नारायणावाचून (श्रीहरी) ज्यांचे जगणे असेल त्या जगण्याचाही धिक्कार असो. "
   संत नामदेव या अभंगात संतसंग, श्रीहरी चे भजन, नामसंकिर्तन, नामस्मरण, आणि नारायणाचे अस्तित्व यांचे महत्त्व ठासून मांडत आहे.
* आश्रमात संत समागम  असावा.
* संपत्ती व संतती याच्याकडे भजन असावे.
*आचार-विचार सर्वा ठायी असलेल्या ईश   चिंतनांनी शोभून दिसावे.
* वक्ता आणि  श्रोता  यांचा विषय श्री पांडुरंग कथा असावा.
* गाणे व वाचन यात विठ्ठलनामाचा सुर हवा.
* जगण्यात श्री नारायणाचे अधिष्ठान असावे.
हे त्यांनी मुमुक्षू जनांस आवर्जून सांगितले आहे. नामदेवांच्या काळात भक्ती करण्याचा किंवा ज्ञान सांगण्याचा जो अधिकार होता तो संकुचित झाला होता. त्याच्या कक्षा रुंदावण्याचे काम नामदेव महाराजांनी केले. म्हणूनच नामदेव महाराजांच्या काळात जेवढे संत महाराष्ट्रात निर्माण झाले तेवढे एकाच वेळी पुढे कधी झाले नाहीत. कारण नामदेवाने आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्याच्या हक्काची आणि अधिकाराची जाणीव करून दिली आणि व्यक्त होण्यासाठी लिहिते केले. म्हणूनच नामेदवाच्या घरातील एकंदर चौदा जणांचा समावेश होता. त्या सर्वाच्या नावाने अभंग आहेत. ते स्वतः प्रभुनामाचा महिमा व भक्तीज्ञानाचा महिमा एका अभंगात वर्णन करतात...
" नाचू किर्तनाचे रंगी |ज्ञानदिप लावू जगी||    परेहुनी परते घर |तेथे राहू निरंतर ||"
संतांनी या अभंगात पवित्र ईश नामावाचून जगणे ही केवळ जगण्याची उणीव दाखवली नसून त्यांचा धिक्कार केला आहे.  मानवी आयुष्याला पुर्णत्व येण्यासाठी भक्ती आणि देवाठायी भाव असावाच हेआग्रहाने सांगतात.
    मानवी जन्म सार्थ  करावयाचा असेल तर प्रत्येकाने पांडुरंगाची भक्ती, संतसहवास, आणि श्री हरी कथेचे नित्य गायन ही आपल्या
जगण्याची त्रिसूत्री केली पाहिजे.
© प्रा. पुरुषोत्तम पटेल.
   ९४२१५३०४१२

शनिवार, जुलै ०८, २०१७

गुरुवंदना (कविता )

           || ओम श्री गुरुवे नमः ||
        आज आषाढातील पौर्णिमा. आषाढ पौर्णिमा. म्हणजे  व्यासपूजनाचा पवित्र दिवस!  आजच्या दिवशी 'व्यासमहर्षिंचे 'पूजन करण्यात येते.   
व्यास हे गुरुश्रेष्ठ गुरुदेव..! व्यास  गुरु वशिष्टाचे पणतू शक्तीदेवाचे नातू ऋषी पराशरांचे पूत्र व शुकदेवमुनीचे पिता. त्यांनी महाभारतात जे वर्णिले आहे ते सर्व काही जगी दिसते. संतश्रेष्ट ज्ञानदेव वर्णन करतात:
     भारती नाही ते न्हवेचि लोकी तिही
           एणे कारणे म्हणिजे पाही
              व्यासोच्छिष्ट जगत्रय
हे या ग्रंथाचे विशेष होत. म्हणूनच त्यांची पूजा. त्यांनी महाभारत रचिले. ते लिहिले साक्षात श्रीगणेश यांनी..! असा हा ग्रंथ पंचम वेद भारतात सर्वत्र पुजिला जातो.
आजच्या या पवित्र दिवशी गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करतांना गुरुंच्या आशिर्वादाने  केलेले हे काव्य. गुरुदेवांना समर्पित करतो.
             * गुरुवंदना  *
गुरु आदि  गुरु अनंत  गुरु  धाता
कोटी वंदन पायी नमवितो माथा ||धृ.||
         गुरु ब्रह्म गुरु विष्णु गुरु महेश
         गुरु चराचर गुरु  भूतांचा ईश
         गुरु वेद गुरु भाग्वद् गुरु गीता
         कोटी वंदन पायी नमवितो माथा||१|
गुरु पूज्य गुरु सिद्ध गुरु अक्षर
गुरु मंत्र गुरु हद्य ओंकारनाद
गुरु सूर्य गुरु चंद्र नौनिधि दाता
कोटी वंदन पायी ठेवितो माथा||२||
        गुरु  शिष्ट  गुरु ईष्ट  गुरु वशिष्ट
        गुरु  तरु गुरु गिरि गुरु विमल
        गुरु अनिल  गुरु सलिल गुरु पिता
        कोटी वंदन पायी नमवितो माथा||३||
गुरु व्यास गुरु भक्ती गुरु आस
गुरु रिति  गुरु  निति  गुरु  प्रिती
गुरु गंगा गुरु सिंधु गुरु  माता
कोटी वंदन पायी नमवितो माथा||४||
    
©प्रा.पुरूषोत्तम पटेल
patelpm31@gmail.com

शनिवार, जुलै ०१, २०१७

माझे जगणे

                 माझे जगणे
प्रवाहाबरोबर चाललो वाहवत गेलो नाही कधी
पाणी डबक्यातील जसे झालो नाही कधी

कर्तृत्वाला मोजला घाम जगलो जीवन साधे
कमविले स्वाभिमाने आभार मानले नाही कधी

झाल्या उरी वेदना तरी मारली ना खोटी फुंकर
तत्वांशी फितूर होऊन सलाम केला नाही कधी

दररोज अनुभवले कित्येकांचे लांगेबांधे
शब्दांना जागलो शब्द बदलले नाही कधी

आयुष्यात ठेचाळून रक्ताळलो कितीदा तरी
आधारासाठी हातभर दाढी धरलीच नाही कधी

मोडेन पण वाकणार नाही बदलला ना मंत्र
काळासंगे बदललो भूतकाळ विसरलो ना कधी

© प्रा.पुरूषोत्तम पटेल,
    मुं.पो.म्हसावद

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...