Kaayguru.Marathi

शुक्रवार, जुलै १२, २०२४

विठू तुझे नाम

विठू तुझे नाम ( भक्तीगीत)
विठू तुझे नाम वाटे मज भारी
जगी फक्त चाले देवा तुझी वारी
भुवरीचा स्वर्ग देवा तुझी पंढरी
जय जय विठ्ठल जय हरी !

विठू नाम घेता टळे जन्म फेरी
तुच मुक्ती दाता त्रिखंडात तारी
भुवरीचा स्वर्ग देवा तुझी पंढरी
जय जय विठ्ठल जय हरी !

तुझ्या सेवेपायी मिळे मुक्ती चारी
तुच माझा अंतरी तुच रे वैखरी
भुवरीचा स्वर्ग देवा तुझी पंढरी
जय जय विठ्ठल जय हरी !

आलो तुझ्या द्वारी दर्शन दे क्षणभरी
विठू पितांबरधारी जीव तू उद्धारी 
भुवरीचा स्वर्ग देवा तुझी पंढरी
जय जय विठ्ठल जय हरी !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल “पुष्प ”


🙏गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांची एक सुरेख प्रार्थना!🙏


   
देवा... ! विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही ; तर,विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये…एवढीच माझी प्रार्थना !

दु:खतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावंस अशी माझी इच्छा नाही; तर,
दु:खावर विजय मिळवण्याचा विश्वास माझ्यात यावा…एवढीच माझी प्रार्थना !

माझ्या मदतीला कोणी न आल्यास माझं बळ मोडून पडू नये…एवढीच माझी प्रार्थना !

तू माझं सतत रक्षण करावंस,मला तारावंस, ही माझी प्रार्थना नाहीच,संकटात तरून जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं…एवढीच माझी प्रार्थना !

माझं ओझं हलकं करुन तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही.ते ओझं वाहायची शक्ती माझ्यात यावी…एवढीच माझी प्रार्थना !

सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढीनच! आणि दु:खाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करील तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात तिळमात्रही शंका निर्माण होऊ नये…एवढीच माझी प्रार्थना !

© गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

रविवार, एप्रिल २१, २०२४

साडी [ चारोळी]

अंगभर साडी-चोळी
सौंदर्याला देई निखार
वस्राविना उघडा देह
पाहता वाढवी विकार

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, नोव्हेंबर २०, २०२३

आम्ही दोघी

आम्ही  दोघी  बहिणी
नाते आमुचे अमृतावाणी
ओठी प्रितीची गाणी
सोबत निर्मळ गंगेवाणी

आम्ही दोघींचे नाते
जसे फणसाचे गरे
ठेस लागता एकीला
दुजी डोळा अश्रूंचे झरे

आम्ही दोघींचे जगणे
जसे नदि अन् किनारा
विश्वास असा अतुट
सोबत झेलतो वादळवारा

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, नोव्हेंबर ०६, २०२३

सख्या... तुझ्यासाठी


तुझ्यासाठी सोडले मी 
माझे  घर  अन्  गाव !
झाली तुझी अर्धांगिनी
जोडले  तुझ्याशी नाव

रमले   बागडले   जेथे
खेळले मी अनेक डाव
विसरुन त्या सकलांना
जोडले  तुझ्याशी  नाव

सुख  असो  वा   दुःख
तुझ्यासवे  घेतली धाव
उजेड असो  वा अंधार
घेतला फक्त तुझ्या ठाव

तुझ्यासाठी  सख्या मी
पहा रेऽ  नटले  सजले
ये  ना सत्वर भेट ना रे 
दाव प्रेमाचा निर्मळ गाव 

माझ्या इच्छा अपेक्षांचा
कधी  न केला मी भाव
सर्वस्व सुद्धा तुम्हा दिले
अजून काय देऊ  राव ?

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...