मैत्री म्हणजे काय? याचे उत्तर जर मी दिले तर ते असे असेल–
" मैत्री म्हणजे निखळ, निकोप असा भाव असलेले आणि कुठलेही अंतर न ठेवता दोघांनीही जपलेले एक नि:शब्द नाते होय."
🔻आता दोघांत वा परस्परात मैत्री कशी असते ? याबाबत विचार करता--
१) मैत्री एकमेकांना सन्मानित करणारी असते.
२) मैत्री मित्राला अवमानित करणारी नसते, तर एकमेकांचा मान वाढविणारी असते.
३) मैत्री वेदना देणारी नसते तर प्रेरणा देणारी असते.
४) मैत्री मित्रांसाठी वेळ देणारी असते. मित्रावर कपट-कारस्थान करुन घाव घालून काळ ठरणारी नसते.
५) मैत्री नि:स्वार्थ साथ देणारी असते.प्रसंगी स्वतः जवळ असेल ते मित्राला देणारी असते. स्वार्थ पाहणारी नसते.
६) मैत्री बेचैन मनाला सुखावणारी असते,मन दुखावणारी नसते.
७) मैत्री बदल घडवणारी असते, बदला घेणारी नसते.
८) मित्र हा आपल्याला अत्यंत जवळचा वाटणारा असतो .
९) आपला मन:स्थिती निराश असताना सुद्धा तो स्वतःला विसरुन आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करतो.
🔻 मैत्री कोणात होऊ शकते? यांचे उत्तर – मैत्री ही मित्राची मित्रांशी होते.तशी मैत्री ही मित्रांशी तशीच मैत्रीणीशीही असू शकते. का? तर मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदभाव मुळी नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे.त्याचे मोल होऊच शकत नाही.उदा.कर्ण हा दुर्योधनाचा अत्यंत जवळचा मित्र होता.कुरुक्षेत्रावर महायुद्धात कुंतीमातेद्वारा त्याला समजले की, पांडवांचे आपण जेष्ठ भाऊ आहोत.तरी त्याला त्याक्षणी बंधुप्रेम रोखू शकले नाही.तर त्याने मातेला वचन दिले की, " उद्या तुझे पाच पुत्र जीवंत पाहशील.त्यात एक तर मी कर्ण असेन किंवा अर्जुन असेल!" असे सांगितले.मात्र दुर्योधनाशी असलेली मैत्री न त्यागता,युद्धात त्याचा बाजूने लढणे सोडले नाही.कारण, प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते.
असे सांगितले जाते की,प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवतेच आणि मैत्री ही दुःखातही हसवण्याचे कार्य करते. उदास मनाला खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देते.
मैत्री हा असा वटवृक्ष आहे की,त्याचा विश्वासाचा पारंब्या ह्या सदोदित आकाशाला नव्हे;तर जमीनीलाच स्पर्श करतात.[पारंब्या ह्या जिव्हाळा,ममत्वाचे प्रतिक आणि जमीन हे हृद्य आत्मियतेचे व निगर्वीतेचे प्रतिक होत. ]
मैत्रीचा विचार करता,मित्रांचे प्रकार पाडता येतील.म्हणजे बालपणापासूनचा मित्र तो लंगोटी मित्र, सुख-दु:खात धिर देतो तो हृदयमित्र,शाळा-कॉलेजात सर्व सहकार्य करतो तो पेनमित्र-शाळामित्र, एखादी कला,विद्या मिळविताना सोबत असलेला गुरुमित्र असे सांगता येतील. पाळीव प्राणी सुद्धा आपले मित्र असू शकतात.उदा.हत्ती या प्राण्याची मैत्री दाखविणारा राजेश खन्नाचा चित्रपट " हाथी मेरे साथी " , कुत्र्याचा मित्रनिष्ठा आपण सर्व जाणून आहोत-ती मैत्री दाखविणारा जॅंकी श्राॅफचा " तेरी मेहेरबानीयॉं " आणि गायीची मैत्री सिद्ध करणारा " गाय और गौरी " हा जया भादुडी-बच्चनचा चित्रपट.हे चित्रपट पाळीव प्राणी आणि माणसाचे आदर्श मित्रत्वाचे नाते सिद्ध करतात.
मैत्री हे असे नाते आहे ज्या नात्याला रंग,रुप, जात,धर्म,
पंथ,भाषा,लिंग,वय,प्रांत,संपत्तीशी काही देणेघेणे नसते.
मैत्रीचे नाते निरपेक्ष असते
जे रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट बनते.
उत्तम मित्राची लक्षणे:-
🔻मित्राला मनातील भावना व्यक्त करताना कधीच संकोच वाटत नाही.
🔻 स्वतःकडून अनावधानाने काही चूक वा अयोग्य घडलेच तर,मित्राला सांगण्यात व कबुली देण्यास तो कधीच कचरत नाही.
🔻एक मित्र आपले पराक्रम, कर्तृत्व आनंदाने कथन करतो.
🔻त्याच्या मनात मित्राविषयी कधीच वाईट विचार येत नाही.
🔻 मैत्रीचे प्रकार -
पौराणिक मैत्री-
श्रीराम आणि रावणाचा बंधु बिभिषण,तसेच श्रीराम आणि सुग्रीव यांची मित्रता,श्रीकृष्ण आणि सुदामदेव यांच्यातील मैत्री ही त्रिखंडात पौराणिक मैत्रीचे आदर्शवत उदाहरण म्हणून प्रसिद्ध आहे.
मैत्री ही निर्मळ आणि वासना विरहित असते.तिला स्वार्थाचा लवलेशही नसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील स्नेहबंध होय. तसेच राधा आणि कृष्ण यांच्यात असलेला मैत्रीच्या संबंध सांगता येईल.
🔻ऐतिहासिक मैत्री-
इतिहासाचा विचार करता,मला तर वाटते की, सम्राट पृथ्वीराज चौहान आणि त्याचे जीवलग मित्र चांदबराई यांच्या मैत्रीचा उल्लेख करता येईल.सम्राटांच्या अखेरपर्यंत त्यांना सोबत तर केलीच! पण,योग्य ती क्लुप्ती वापरुन मोहम्मद घोरीच्या वध सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याच हातून ' शब्दवेधी ' बाणाने करविला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपतीं शिवाजी
महाराज व तानाजी मालुसरेंची मैत्री-- त्यातून " आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे!" म्हणत कोंढाणा सर करणारे तानाजी मालुसरे व राजांनी तानाजीच्या बलिदानाचे स्मरण येणा-या पिढ्यांना कायम होण्यासाठी नामकरण केलेला सिंहगड विसरता येणार नाही.
दुसरी मैत्री- " महाराज ! तुम्ही विशाळगडावर पोहचा.तो पर्यंत मी ह्या घोडखिंडीत शत्रूला अडवूनच ठेवतो !" हा शब्द देऊन शिवराजांच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारे बाजीप्रभू देशपांडे, त्यांनी आपले बाजी हे नावच सार्थकी लावले...त्यांचा त्यागाचे स्मरण करुन देणारी पावनखिंड आज आपल्याला विसरता येणार नाही.असे अगणित मित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जमविले.त्यांच्या मैत्रीला शतशः प्रणाम!🙏
पाळीव प्राण्यांची मैत्री-
पाळीव प्राणी हे सुद्धा उत्तम मैत्रीचे उदाहरण देता येईल.ते तर माणूसही निभावणार नाही अशी मैत्री करतात.ही उदाहरणे प्रमाणभूत सिद्ध झाली आहेत.राजा महाराणा प्रतापांचा घोडा ,अत्यंत जखमी झाला असतानाही स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता,राणांना शत्रूपासून वाचविण्यासाठी दूर सुखरुपस्थळी घेऊन विसावला.राणाजीकडे पाहून अश्रू निमाले.व तिथेच धन्याला सुखरुप पाहून त्याने प्राण सोडले " धन्य धन्य चेतक घोडा! " त्यांची ही कृतज्ञता सारथ्य आजही चितोडगडात " चेतक का चबुतरा " स्थळी मैत्रीची धन्यता सिद्ध करतो आहे..
छत्रपती शिवाजीराजे यांचा मोती श्वान रायगडावर पाहता आपली धन्यता सिद्ध करतो आहे.आणि कृष्णा घोडी हे आदर्श सारथीची उदाहरणे देता येतील. हे प्राणी असले तरी,त्यांची मैत्री,अढळ निष्ठा मानवाला पुसून काढता येणार नाही.मानवी ( राजे) मैत्रीचे हे अतुलनीय उदाहरण म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहेत.
सोबत असताना कधी कधी रडता रडता हसवणारी, तर कधी दूर गेल्यावर त्याच मित्र आणि मैत्रिणीच्या आठवणी मध्ये हसता हसता रडवणारी अशी घट्ट मैत्री असावी.तर कधी प्रेमामध्ये हरल्यानंतर घनदाट अंधारामध्ये हरवलेल्या मनाला देखील काजव्याच्या प्रकाशाने प्रसन्न करणारी मैत्री असावी.हीच मैत्री जीवनात सुखाचे नंदनवन फुलवू शकते.
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "