Kaayguru.Marathi

रविवार, मार्च १७, २०१९

आत्महत्या.... का करु नये...!

    आत्महत्या... आज सर्वत्र सहजच वापरला जाणारा शब्द. पण, आपल्या साधू-संत, ऋषी - मुनी आणि श्रृती-स्मृतीकार, पुराणकार, देवीभागवत, शुक्र नीति,चाणक्यनीति, रामायण, महाभारत, संहिताग्रंथ, इत्यादि परमपवित्र ग्रंथकारांनी मानवी जीवनाला मार्गदर्शक सिद्धांत, तत्व, नीति-नियम, कथिले. ह्याद्वारा मानवी जन्म सार्थकी लागावा. जीवाला परमात्मा आणि मोक्षप्राप्ती व्हावी हाच परम उद्देश यातून साध्य व्हावा असा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते.
भगवान श्रीकृष्णाने गीताग्रंथात अगदी स्पष्टपणे कथन केले आहे की, -
यः  शास्त्रविधिमुत्सृज्य  वर्तते  कामकारतः।
न  स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परा गतिम्।
तस्माच्छास्त्र प्रमाणं ते कार्याकार्यव्वस्थितौ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्त कर्म कर्तुमिहार्हसि।।
(गीता १६।२३-२४)
अर्थ -
" जो मनुष्य शास्त्रसंमत विधीला सोडून आपल्या इच्छा नुसार मनमानी वर्तन करतो, अशा  मनुष्याला सिद्धी, शान्ती आणि परमगती प्राप्त होत नाही. कारण, मनुष्यासाठी कर्तव्य - अकर्तव्य समजून घेण्यासाठी शास्त्र हेच प्रमाण आहे. असे समजून हे मनुष्या.. तू या लोकांत शास्त्रसंमत नियत कर्तव्य - कर्म करावे.अर्थात,तू शास्त्रसंमत असेच कर्तव्य - कर्म करीत रहा.
  तात्पर्य, असे की, आपण ' काय करावे, काय करु नये?' हे समजून घेतांना विधीशास्त्र प्रमाणभूत मानले पाहिजे. "
जे शास्त्रसंमत आचरण करतात ते ' नर ' आणि जे मनाला येईल असे आचरण करतात. ते ' वानर ' होत. गीताग्रंथात भगवान श्रीकृष्णाने मनमानी आचरण करणा-यास ' असूर ' असे म्हटले आहे.
' प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदूरासुराः।'
(गीता १६।७)
  आत्महत्या करु नये. या संबंधी शास्त्र काय म्हणते. ते जाणून घेऊ या.
१) आत्महत्या करणारा मनुष्य साठ हजार वर्षापर्यंत अन्धतामिस्त्र नरकात निवास करतो.
संदर्भ - ◽(पाराशरस्मृती ४।१-२)
२) भावाचा खुण केल्याने अत्यंत घोर नरकाची प्राप्ती होते, परंतु त्याहूनही भयंकर नरक स्वतः आत्महत्या केल्याने प्राप्त होतो.
(महाभारत, कर्णपर्व-७०।२८)
३) जो पुरुष अथवा स्त्री काम, क्रोधाने फाशी घेऊन, शस्त्रद्वारा किंवा विष प्राशन करुन आत्महत्या करतात. त्यांचे शव चांडाळाने दोरी बांधून राजमार्गावरुन फरफटत न्यावे. अशा व्यक्तींचे अग्निसंस्कार आणि इतर विधि करणे वर्जित करावे.
(कौटिल्य - अर्थशास्त्र ४।७)
४) आत्महत्या करणारे पुरुष स्त्री घोर नरकात जातात. आणि सहस्त्र नरक यातना भोगून वराह योनीत जन्म  घेतात. म्हणून समजदार व्यक्तींनी चुकूनही आत्महत्या करु नये.
(स्कंदपुराण, काशी. पू. १२।१२-१३)
५) आत्महत्या करणारी व्यक्ती कदाचित वाचली व जीवंत राहीली, किंवा संन्यास ग्रहण करुन ह्या विचारांचा त्याग जरी केला तरी ती व्यक्ती 'प्रत्यवसित' म्हणून ओळखली जाते. अशी व्यक्ती समाजात सर्वाकडून बहिष्कृत समजली जाते. तिची शुद्धी केवळ चांद्रायणव्रत किंवा दोनदा  तप्तकृच्छ-व्रत केल्यानेच होऊ शकेल. ( हे व्रत अत्यंत कठिण आहे.)
( लघुयमस्मृती २२-२३)
६) जी व्यक्ति आत्महत्या करते तीचे सुतक धरु नये.
१) याज्ञवल्क्यस्मृती ३।६
     २) विष्णुस्मृती २२
     ३)गरुडपुराण, आचार. १०६।६
     ४) कूर्मपुराण, उ. २३।७३
   वरील विषयाने आपल्या स्मृतीकारांनी अत्यंत दूरदृष्टीने, खडतर तपश्चर्या करुन प्राप्त केलेल्या योगसामर्थ्याने मांडलेले हे सिद्धांत, केलेला उपदेश सुज्ञपणे समजून घेतला तर मानवी जन्म खरोखर सार्थकी लागेल. कारण हा नरदेह प्राप्त होणे सहजसाध्य गोष्ट नाही. आपली धर्मसंस्कृती ८४ लक्ष योनी (जन्म )मानते.
त्या योनींची संख्या समजून घेतांना त्यांचे प्रकार विचारात घेतल्यास लक्षात येईल.

🔸पदम् पुराणातील एक श्लोकानुसार...

जलज नव लक्षाणी, स्थावर लक्ष विम्शति, कृमयो रूद्र संख्यक:।

पक्षिणाम दश लक्षणं, त्रिन्शल लक्षानी पशव:, चतुर लक्षाणी मानव:।।
संदर्भ ◽( पद्मपुराण-७८।५)

अर्थात :-
🔸जलचर ९ लाख,
🔸स्थावर अर्थात वृक्ष - वेली २० लक्ष, 🔸सरीसृप, कृमि कीटक- ११ लक्ष,
🔸पक्षी/नभचर १० लक्ष ,
🔸स्थलीय/थलचर ३० लक्ष
🔸आणि उर्वरित ४ लक्ष मानवीय
एकूण प्रकार ८४ लक्ष असे आहेत.

       वरील माहिती समजुन घेतली आणि हे जाणून अनमोल असा मनुष्य जन्म प्राप्त झाला असल्याने आपल्यावर असणारे जन्मजात ऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे ऋण :-
१) देव ऋण
२) मातृ ऋण 
३) पितृ ऋण
४) गुरु ऋण
५) समाज ऋण
ह्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण कटिबद्ध राहावे. कारण निसर्गाच्या प्रत्येक घटक आपणास सदैव खडतर जीवन जगण्याचे व सुखाचे दिवस प्राप्त करण्याचे अखंडित मार्गदर्शन करीत असतात.
१) सूर्य रोज अस्ताला जातो. पण पुन्हा नव्याने सकाळी उदयाला येतो.
२) अमावास्या अंधार घेऊन आली म्हणून पौर्णिमा उजेड देणे बंद करीत नाही.
३) कृष्णपक्षात कलेकलेने लहान होणारा चंद्र शुक्लपक्षात त्याच कलेकलेने मोठा होऊन सृष्टीला अमृत प्रकाश प्रदान करतो.
४) समुद्राला ओहोटी आहे तशीच आनंदाची भरतीही आहे. किना-याला भेटण्याची त्याची आस वर्षानुवर्षे जीवंतच आहे.
५) ग्रिष्माची काहिली सहन केली तरच वसंताचा स्पर्श आपणास अनुभवता येईल हे वृक्ष - तरुंना चांगलेच कळते. म्हणूनच ते पानगळती स्विकारतात कारण त्या शिवाय हिरवाई शक्यच नाही. हे त्यांनाही कळते.
६) माठ थेंबाथेंबानी पाझरतो, तेव्हाच त्यातील जल शितल होते. व त्याला अनंत हातांचा स्पर्श घडतो. उष्णोदकाला कोण प्राशन करील?
७) सागर, सरोवर, नदी-तलाव यातील पाणी सूर्यकिरणांची तप्तता सहन करते, तापते, तेव्हा त्याची वाफ बनते. त्यातून बनतो मेघ. मेघ जलाभिषेक करतात तेव्हाच सृष्टीचा सर्जनोत्सव सुरु होतो.
८) उन्हाच्या झळा सोसून भेगाळले तरच मृगसरी प्राशन करता येईल. ही वेडी आस घेऊन भूमी दरवर्षीचा ताप सहन करतेच ना?
९) गढूळ पाण्याचा पूर आल्याशिवाय नदीपात्रालाही पुर्णत्व लाभत नाही. हे कसे विसरता येईल.
१०) सकाळ  आहे त्यानंतर दुपार आहेच, दुपार नंतर संध्याकाळ आहेच, रात्री नंतर दिवस उगवणारच आहे. हे आपण नाही समजणार तर कोण समजून घेईल.?
११) जन्म आहे हे खरे.. पण ती प्रत्येकाला मरणही आहे. मरण आहे म्हणून सृष्टी चक्र थांबले का?
या समस्त गोष्टी आपण समजून घेतल्या तर हा मनुष्य जन्म नक्की गोड होईल. व कोणीही आत्महत्या करण्यास धजावणार नाही.म्हणूनच हे सद्गमानवांनो
सुखी जगा.इतरांनाही सुखाने जगु द्या, कोणालाही काया, वाचा, मनाने दुखवू नका. दुःख हलके करण्यासाठी खूप हसा. हसवत रहा.!
संदर्भ :- १)क्या करे, क्या न करे? (आचार संहिता) राजेंद्र कुमार धवन
प्रकाशक- गीताप्रेस, गोरखपूर २७३००५(१३ वी आवृत्ती )

◽प्रा.पुरूषोत्तम पटेल,
मुं.पो.म्हसावद
ता.शहादा जि.नंदुरबार
भ्रमणध्वनी :- ८२०८८४१३६४

गुरुवार, जानेवारी ०३, २०१९

बाप्पा गणेशा या हो!

बाप्पा गणेशा या हो

शिवसुता तुम्ही गौरीनंदना
मंगलमूर्ती  या हो!

हृदयी लागली हुरहूर आता
गणपती बाप्पा  या हो!

निरोप घेऊन वरीस झाले
दुःखहर्ता  या हो!

मांडव घातला अंगणी आज
सुखकर्ता या हो!

ढोल ताशांचा निनाद गर्जे
शूर्पकर्णा  या हो!

मखरी कोरीले मयुरासन
मोरेश्वरा  या हो !

तुम्ही नसता उदास वाटे
चिंतामणी  या हो!

रिद्धी सिद्धीचे तुम्ही दयाळा
सिद्धीविनायक  या हो!

जमविल्या सा-या एकवीस पत्री
महागणपती  या हो!

लाडू मोदक प्रसाद ठेविला
विघ्नहरजी  या हो!

कथा किर्तनी संतजन आले
गिरिजात्मज  या हो!

आतूर सारे भक्त दर्शना
वरदविनायक  या हो!

जगी दाटला अंधार सारा
मंगलमूर्ती  या हो!

शब्दसौदर्य :-
प्रा.श्री.पुरूषोत्तम पटेल
mhasawad.blogspot.in

बाप म्हणजे काय ?

बापाला बघायला शिका...!

मोठं झाल्यापासून  बापाला,
कधी मिठी मारून बघितलीयं का ?
नाही ना. एकदा मिठी मारून बघा...!
ह्रदय स्थिर होऊन जाईल.
मोठ्ठ झाल्यापासून कधी
बापाचा मूका घेऊन बघितलायं का?
एकदा बापाचा मूका घेऊन बघा...!
बापाची दाढी गालावरुन  खरचटताच
बापा पेक्षा आपण अजुन छोटेचं आहोत ;
याची जाणीव होऊन जाईल .
बापाची चप्पल पायात आली म्हणून कोणी बाप होत नाही,
त्यासाठी आयुष्यभर दुय्यम स्थान घ्यावं लागत ,
कधी घेऊन बघितलं आहे का  दुय्यम स्थान ?
नाही ना. एकदा ही कल्पना तरी करुन बघा,
बापाची किंमत कळून येईल .
बापाला बुढ्ढा, म्हातारा, बाबा अस म्हणून  बघितलंय का?
साधु लोकांना बाबा म्हटल जातं.. तसं
कधी बापाला बाबा म्हणून बघितलं आहे का ? नाही ना.
एकदा बाबा म्हणून तर बघा...
खऱ्या संतांची ओळख होऊन जाईल.
बापाच्या त्याग पाहिलायं...?
बापाचं घरावर नाव नाही,
बापाचं हातावर नाव नाही,
बापाचं छातीवर नाव नाही,
बापाचं गाडीवर नाव नाही,
पण.. तुम्हाला ओळख दिली नावांची...
स्वतःच्या घामाच्या आणि रक्ताच्या धारांनी...
भिजवलेली सिमेंट-वाळू आणि विटांनी बनलेलं
घर असून देखील तो घरासाठी परका ,
कधी परकं होऊन बघितलंय  का ? नाही ना...?
परकं होऊन बघा,
बाप किती खंबीर असतो याची जाणीव होऊन जाईल.
आईचं प्रेम जास्त आणि बाबाचं कमी असतं...
असं कधीही नसत .
कधी सूर्य आणि चंद्र यांच्यातील
एक साम्य बघितलं आहे का ?
एकदा बघुन घ्या...
दोघंही प्रकाश देतात...!
पण एकाचा(बाप) उष्ण मात्र मन-शरीराला उर्जा देणारा.
अन् दुस-याचा(आई) आल्हाददायक मन-शांती देणारा.
एकदा स्वतः हे प्रामाणिकपणे अनुभवा.
बाप फक्त पाया पडण्यापुरता नसतो,
त्याचा तळपायांना कधी निरखून बघितलं आहे का ?
एकदा तरी निरखून बघा, तुमच्यासाठी त्याने खालेल्या खस्ता कळतील.
आयुष्यातील एक देवदूत तुमच्या समोर उभा असल्याचं समजेल.
© प्रा.पुरूषोत्तम पटेल,
mhasawad.blogspot.in

हरितालिका व्रत कथा

         💠 हरितालिका व्रत कथा 💠
कैलास पर्वतावर उमामहेश्वर बसले होते. तेव्हा देवी पार्वतींनी विचारले, " हे महेश्वरा, मी असे कोणते व्रत केले की, ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात ? " ते ऐकून महेश्वर म्हणाले, " हे प्रिये, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे ; असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो, ते ऐक. ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले, ते परम मंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे. सर्व व्रतात श्रेष्ठ आहे.
भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथे पुर्ण होतात. तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस."
पार्वतीदेवी म्हणाली, हे महेश्वरा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणांकडून ऐकायचे आहे."
यावर शिवशंकरजी म्हणाले, " या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर, आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस. तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमवान चिंताग्रस्त झाले, अत्यंत दुःखी झाले. आपली ही लाडकी लेक कोणाला देऊ अशी काळजी करु लागले. तेव्हा नारदमुनी आकाशमार्गे तिथे आले. हिमवानाने मोठ्या आनंदाने नारदमुनींचा आदर सत्कार केला आणि विचारलं ,
" हे मुनीश्रेष्ठ ! माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले असावे असे मला वाटते. आपण कोणता हेतू मनात धरुन आला आहात ते सांगा ? "
महर्षी नारदजी म्हणाले, " हे गिरीराजा, भगवान श्रीविष्णुंनी मला आपणांकडे पाठविले आहे. स्त्रियांत रत्नभूत अशी तुमची कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे. वासुदेवासारखा दुसरा वर कुणीच नाही. म्हणून हे गिरीराजा, तुम्ही आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असे मला वाटते ! "
नारदमुनींचे बोलणे ऐकून गिरीराज हिमवान म्हणाले , " वासुदेव स्वतः माझी कन्या मागत आहेत. आणि आपणही मला तसेच करावे असे म्हणता ; तसे मला करायलाच हवे ! "
नंतर नारदमुनी श्रीविष्णुकडे गेले. म्हणाले," भगवान मी तुमचा विवाह निश्चित करुन आलो ! हिमवानानीही मोठ्या आनंदाने सांगितले की, मी माझी कन्या श्रीविष्णुला देण्याचे निश्चित केले आहे !"
हे ऐकून देवी तुम्ही दुःखी झालात. तशाच आपल्या सखीच्या घरी गेलात. तुम्हास पाहता सखीने विचारले," तू अशी कष्टी का ? काय झाले ? " यावर देवी तुम्ही म्हणालात..,  "  महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे, पण माझ्या पित्याने दुसरेच ठरविले आहे. आता मी काय करु ? "
तुमच्या या प्रश्नावर सखी म्हणाली,  " आपण महाराज गिरीराजांना माहित नसलेल्या अशा प्रदेशात जाऊ या ! " त्याप्रमाणे तुम्ही दोघींनी विचार केलात. सखीने तुम्हास मोठ्या अरण्यात नेले. तुम्ही अशा निघून गेल्यावर तुमच्या शोध हिमराजांनी सर्वत्र सुरु केला.
ते मनात म्हणाले, " माझी कन्या मी श्रीविष्णुला देण्याचे नारदमुनींजवळ कबूल केले होते, आता मी त्यांना काय सांगू ?"
" देवी, या विचारांनी गिरीराज तुम्हास शोधण्यासाठी या अरण्यातून त्या अरण्यात भटकंती करु लागले. देवी, तुम्ही सखीसह एका घोर अरण्यात, रम्य नदीकाठी असलेल्या मोठ्या गुहेत प्रवेश केला. अन्न, पाणी सर्व वर्ज्य केले. भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेचा दिवशी हस्त नक्षत्रावर तुम्ही तुमच्या सखीसह वाळूचे लिंग स्थापून माझे मनोभावे पूजन केले. देवी, तुम्ही माझे स्तूतीगीत गायिलेस. जागरण केलेस. तुमच्या व्रताच्या प्रभावाने माझे आसन हालले. तुम्ही जिथे सखीसह व्रत करीत बसला होतात, मी तेथे आलो. आणि म्हणालो,
" हे देवी, मी तुमच्या व्रताने प्रसन्न झालो आहे. तुम्ही हवा असलेला कोणताही वर मागा !" हे ऐकताच तुम्ही म्हणालात की, " हे प्रभो महेश्वरा ! तुम्ही जर माझ्या या व्रताने माझ्यावर प्रसन्न झाला आहात, तर तुम्हीच माझे पती व्हा ! " देवी तुमचा हा वर ऐकून मी म्हणालो, " देवी, हे फार चांगले आहे. " असे बोलून मी कैलास पर्वतावर आलो. तद्नंतर प्रातःकाल होताच तुम्ही तुमच्या या व्रताची उत्तरपूजा  करुन तुमच्या सखीसह आरंभिलेल्या या व्रताचे पारणे तिथेच केले.
तुमचे पिता गिरीराज हिमवान तुमच्या शोध घेत त्या घनघोर अरण्यात आले. तेथेच त्यांनी तुम्हाला सखीसह पाहिले. तुम्हाला पाहताच ते तुमच्याजवळ आले व म्हणाले, " कन्ये, तू या घनघोर अरण्यात का येऊन राहिलीस ? चल, आधी आपण महाली परत जाऊ या." पिता हिमवानाचे बोल ऐकून हे देवी तुम्ही म्हणालात,
" पिताश्री, तुम्ही माझा विवाह श्रीशंकराशी करणार असे मला वाटले होते. परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदललात ; माझा विवाह वासुदेवाशी करण्यास नारदमुनींना होकार दिला. म्हणून मी या वनात निघून आले. तुम्ही जर माझा विवाह  श्री शिवशंकराशी  लावून देत असाल तरच मी या घनघोर अरण्यातून राज्यातील राजमहालात परत येईन. नाहीतर येथेच राहीन. मी तसा दृढनिश्चय केला आहेच !  "
हे देवी, तुमचे हे दृढनिश्चयात्मक बोल ऐकताच, हिमराज म्हणाले, " तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन ! " हे वचन पिता गिरीराज हिमवानांनी तुम्हास दिले व घरी-महाली घेऊन आले. पुढे हिमवान राजांनी यथाविधी तुमचा  विवाह माझ्याशी लावून दिला. देवी, तुम्ही जे व्रत आचरले त्याच्या प्रभावाने तुम्हाला सौभाग्य मिळाले. असे बोलून महादेव म्हणाले, "  हे देवी, हे सौभाग्दायक सर्वोत्तम व्रत अद्याप मी कोणालाही सांगीतलेले नाही. हरित म्हणजे हिरवे आणि आलि म्हणजे सखी. सखीने तुम्हाला हिरव्यासमृद्ध अशा अरण्यात  नेले म्हणून या व्रताला हरितालिका  व्रत हे पावन पुण्यदायक नाव मिळाले."
श्री शंकराचे हे उद्गार ऐकून देवी पार्वती म्हणाल्या , " प्रभो, या व्रताचा पूजाविधी मला कृपा करुन सांगा ! या व्रतापासून काय फळ मिळते, हे व्रत कोणी करावे तेही सांगा ! " देवी पार्वतीचा हट्ट समजून श्री शिवशंकरजी म्हणाले, " हे देवी, हरितालिका हे व्रत  सौभाग्यदायक आहे. सौभाग्याची ईच्छा असणा-या स्त्रियांनी हे व्रत भक्ती आणि श्रद्धापूर्वक करावे.
व्रताचा पूजाविधी सांगतो ते ऐका. " केळीचे खांब आणून त्यास तोरण लावून मखर करावे. ते चंदनाने सुगंधित करावे. त्यावर छत लावावे. ते विविध रंगाच्या उत्तमोत्तम  पट्टवस्त्रांनी सुशोभित करावे.तेथे मंगल वाद्याचा गजर करावा.सखीसहित तुमची मूर्ती व माझे स्वरुप असणारे शिवलिंग वाळूत तयार करुन गंध, पुष्प, धूप, दिप, फळे इत्यादि उपचारांनी माझे पूजन करावे. नैवेद्य अर्पन करावा. रात्री भक्ती व श्रद्धापूर्वक आनंदीवृत्तीने जागरण करावे.
* या व्रताचा पुजनाचा वेळी पूजीकेने मंत्र म्हणावे ते असे -
१) नमः शिवाय । शांताय पंचवक्राय शूलिने ।।
२) नंदिभृंगीमहाकालगणयुक्ताय शंभवे ।।
३)  शिवायै हरकांतायै प्रकृत्ये सृष्टिहेतवे ।
शिवायै सर्वमांगल्ये शिवरुपे जगन्मये शिवे कल्याणदे।
नित्य शिवरुपे नमोस्तुते।।
४) भवरुपे नमस्तुभ्यं शिवायै सततं नमः ।
नमस्ते ब्रम्हरुपिण्ये जगद्धात्र्यै नमो नमः ।
संसारभयसंतापात त्राहि मां सिंहवासिनी।
येन कामेन देवी त्व पूजितासि महेश्वरी ।
राज्यसौभाग्य संपत्तीदेहि मामांह पार्वती।
देवी पार्वती, या मंत्रांनी तुमच्या सखीसहित तुमची व माझी पूजा करावी.
नंतर श्रीहरितालिका कथा पठण करावी. हे व्रत यथाविधि केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्तजन्मापर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धि होते.दुसरे दिवशी ब्राम्हणास वायनदान करावे. नंतर पारणे करावे. हे देवी, याप्रमाणे जी  स्त्री हे व्रत करील ती स्त्री तुम्हाप्रमाणे आपल्या पतीसह रममाण होईल. इहलोकी अनंत सुख, ऐश्वर्य, वैभव उपभोगून अंती माझे सायूज्य प्राप्त होईल. हजारो अश्वमेध आणि शत वाजपेय यज्ञ केल्याने जे पुण्य व फळ प्राप्त व्हावयाचे ते या कथा श्रवण-पठणाच्या योगाने प्राप्त होते.
हे देवी, याप्रमाणे मी हे सर्वोत्तम श्रेष्ठ व्रत तुम्हांस निवेदन केले. या एका व्रताच्या आचरणाने कोटी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते.
।। इति भविष्योत्तरपुराणे हरगौरी संवादे हरितालिका व्रतकथा समाप्त।।
              

◽श्री हरितालिका पुजेची तयारी ◽

                 ◽ उपकरणे  ◽
तांब्या, फूलपात्र, पळी, ताम्हण, ताट, व नैवेद्याची वाटी, समई, त्यात तेल व वाती, निरांजन, (तूप व फूलवातीसह) उदबत्ती, व उदबत्ती घर, कापूर, धूपारती, एक चौंरंग, व पाट, केळीचे चार बारीकसे खांब.                 हरितालिकादेवी मूर्ती व शिवाची पिंडी(वाळूची), घंटा, आगपेटी, इत्यादि.
🔹 पूजेचे साहित्य :-
हळद, कुंकू, गुलाल, दोन नारळ, उदबत्ती, कापसाचे वस्त्रे, विड्याची पाने - १२, सुपारी-१०, खारिक-५, बदाम-५, गुळ खोबरे, केळी, व इतर फळे, जानवे, वासाचे तेल, पंचामृत, (दूध, दही, तूप, मध, साखर ) अक्षता, गंध, सिंदूर, अत्तर, कोमट पाणी, काडपेटी, काचेच्या हिरव्या बांगडी, गळसरी, सुट्टे पैसे, दक्षिणा, दूर्वा, इत्यादि.
🌸 फुले :-
चाफा, केवडा, कन्हेर, बकूळ, धोतरा, कमळ, शेवंती, जास्वंद, मोगरा, अशोक, इत्यादि.
💠 पत्री :-
बेलपत्र, अशोक, आवळी, कण्हेर, कदंब, ब्राम्ही, धोतरा, आघाडा इत्यादि.
🔽 सौभाग्यवायनाचे साहित्य ◾
लहान सुपली, (सुफ) हळद, कुंकू, काजळ, तांदूळ, सुपारी, खारिक, बदाम, नारळ, खण, हिरव्या बांगड्या, गळेसरी, आरसा, फणी, विडा व दक्षिणा, इत्यादि.
🔽पुजेसाठी नियम ◽
०१) पूजेचे धातूमय साहित्य तांब्याचे असावे.  चांदीची उपकरणेही उपयोगात आणता येतील.
०२) मूर्ती मातीच्या असल्यास पूजेचे उपचार हळूवारपणे करावेत. दुर्वेने किंवा फुलाने किंचीत पाणी शिंपडावे.
०३) घरातील देवासमोर विडा ठेवून, नमस्कार करुन मगच आसनावर बसून पुजेस यथाक्रम सुरुवात करावी. पूजा करतांना सर्व साहित्य व पदार्थ जवळच आणून निट सांभाळावे. मध्येच उठू नये.
०४) देवीवर फुले उडवू नयेत. हलकेच वाहावित. प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तरपूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये.
०५) देवीला अनामिकेने कुंकू वाहावे. कुंकूम-अक्षता व फूले उजव्या हाताची अनामिका, मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने वाहाव्यात.
०६) विड्याची पाने उताणी व देठ देवीकडेकरुन देवीसमोर ठेवावी, वर सुपारी ठेवावी. नारळाची शेंडी देवीकडे करुन ठेवावा. देवीचे मुख पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असावे. देवीच्या डाव्या बाजूस समई व निरांजन उजव्या बाजूस ठेवावे. उदबत्ती निरांजनाजवळ ठेवावी.
०७) अर्घ्य म्हणजे गंधपुष्प व अक्षता. अक्षता म्हणजे कुंकूममिश्रित तांदूळ. फूले सुंगधित ताजी व न तुटलेली वाहावीत.
०८) फुलाचे देठ देवीकडे करुन वाहावीत. देवीला लाल व पिवळी फुलं फार प्रिय असतात. दुर्वा व बेलाचे त्रिदल आपल्याकडे अग्र करुन वाहावे.
०९) प्रदक्षिणा घालतांना स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे फिरावे. त्यावेळी हात जोडलेले असावेत.
१०) देवीला उदबत्ती, निरांजन, कापूर आरतीने ओवाळतांना ती उजव्या हाताने खालून आपल्या डावीकडून वर व वरुन उजवीकडे खाली अशी देवीच्या मूर्तीवर प्रकाश पाडीत ओवाळावी. त्या वेळी डाव्या हाताने घंटानाद करावा.
दुस-या दिवशी उत्तरपूजा होईपर्यंत तेलाचा दिवा सतत लावलेला असावा. उत्तरपूजेनंतर हरितालिकेच्या मूर्ती, देवीला वाहिलेली फुले, पत्री इत्यादि (निर्माल्य ) समुद्रात किंवा वाहत्या नदित किंवा भरलेल्या तळ्यात विसर्जित करावे.
हरितालिका व्रत करणाऱ्या सुवासिनीने नवीन साडी नेसावी. नथ व दागदागिने हे सौभाग्यअलंकार धारण करावे. हळद-कुंकू लावून घ्यावे. कुमारिकेनेही हे व्रत आचरावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक, लाभदायक व मनोरथ पूर्ण करणारे असे आहे. व्रत करतांना मनात कोणतीही अढी, क्लेश, नैराश्य, चिंता न धरता सश्रद्ध भक्तिभावे आचरावे.
        🔹🌸 🔸💠🔸🌹🔸🌸🔹
◽ पूजा प्रारंभ करण्यापूर्वी  ◽
व्रत करणाऱ्या सुवासिनीने प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळद-कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवून नमस्कार करावा. ब्राह्मण गुरुजींना व वडिलधारी माणसांना नमस्कार करुन नव्या किंवा स्वच्छ धुतलेल्या आसनावर बसावे. नंतर पूजा प्रारंभ करावी.
            * * * * * * * * * * * * *
◽।। अथ हरितालिका पूजा प्रारंभ।। ◾

◾ द्विराचम्य  ◽

तीन नावांचा उच्चार करुन प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्राशन करावे. :-
०१) ॐ केशवाय नमः ।
०२) ॐ नारायणाय नमः ।
०३) ॐ माधवाय नमः ।
* पुढील नावाच्या उच्चार करुन -
०४)        ॐ गोविंदाय नमः।
म्हणून संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन सोडावे. याप्रमाणे दोन वेळा करावे.
येथून पुढे ध्यान करावे. हातात अक्षता घेऊन दोन्ही हात जोडावेत. दृष्टि आपल्या समोरील देवीवर असावी.
०५) ॐ विष्णवे नमः।
०६) ॐ मधुसुदनाय नमः ।
०७) ॐ त्रिविक्रमाय नमः ।
०८) ॐ वामनाय नमः।
०९) ॐ श्रीधराय नमः ।
१०) ॐ ह्रषीकेशाय नमः ।
११) ॐ पद्मनाभाय नमः ।
१२) ॐ दामोदराय नमः ।
१३) ॐ संकर्षणाय नमः ।
१४) ॐ वासुदेवाय नमः ।
१५) ॐ प्रद्युम्नाय नमः ।
१६) ॐ अनिरुद्धाय नमः ।
१७) ॐ पुरुषोत्तमाय नमः ।
१८) ॐ अधोक्षजाय नमः ।
१९) ॐ नारसिंहाय नमः ।
२०) ॐ अच्यूताय नमः ।
२१) ॐ जनार्दनाय नमः ।
२२) ॐ उपेन्द्राय नमः ।
२३) ॐ हरये नमः ।
२४) ॐ श्रीकृष्णाय नमः ।
हातातील अक्षता देवीला वाहाव्यात.
◽ देवतावंदन ◽
🔽श्रीमन् महागणाधिपतये नमः ।
🔽इष्टदेवताभ्यो नमः।
🔽कुलदेवताभ्यो नमः।
🔽ग्रामदेवताभ्यो नमः।
🔽स्थानदेवताभ्यो नमः।
🔽मातृपितृभ्यो नमः।
🔽उमामहेश्वराभ्यो नमः।
🔽श्रीलक्ष्मीनारायणांभ्यो नमः।
🔽सर्वेभ्यां देवेभ्यो नमः।
🔽सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्यो नमः।
                  निर्विघ्नमस्तू।।
© प्रा.पुरूषोत्तम पटेल, मु.पो.म्हसावद
mhasawad.blogspot.in

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...