💠 हरितालिका व्रत कथा 💠
कैलास पर्वतावर उमामहेश्वर बसले होते. तेव्हा देवी पार्वतींनी विचारले, " हे महेश्वरा, मी असे कोणते व्रत केले की, ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात ? " ते ऐकून महेश्वर म्हणाले, " हे प्रिये, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे ; असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो, ते ऐक. ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले, ते परम मंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे. सर्व व्रतात श्रेष्ठ आहे.
भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथे पुर्ण होतात. तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस."
पार्वतीदेवी म्हणाली, हे महेश्वरा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणांकडून ऐकायचे आहे."
यावर शिवशंकरजी म्हणाले, " या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर, आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस. तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमवान चिंताग्रस्त झाले, अत्यंत दुःखी झाले. आपली ही लाडकी लेक कोणाला देऊ अशी काळजी करु लागले. तेव्हा नारदमुनी आकाशमार्गे तिथे आले. हिमवानाने मोठ्या आनंदाने नारदमुनींचा आदर सत्कार केला आणि विचारलं ,
" हे मुनीश्रेष्ठ ! माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले असावे असे मला वाटते. आपण कोणता हेतू मनात धरुन आला आहात ते सांगा ? "
महर्षी नारदजी म्हणाले, " हे गिरीराजा, भगवान श्रीविष्णुंनी मला आपणांकडे पाठविले आहे. स्त्रियांत रत्नभूत अशी तुमची कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे. वासुदेवासारखा दुसरा वर कुणीच नाही. म्हणून हे गिरीराजा, तुम्ही आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असे मला वाटते ! "
नारदमुनींचे बोलणे ऐकून गिरीराज हिमवान म्हणाले , " वासुदेव स्वतः माझी कन्या मागत आहेत. आणि आपणही मला तसेच करावे असे म्हणता ; तसे मला करायलाच हवे ! "
नंतर नारदमुनी श्रीविष्णुकडे गेले. म्हणाले," भगवान मी तुमचा विवाह निश्चित करुन आलो ! हिमवानानीही मोठ्या आनंदाने सांगितले की, मी माझी कन्या श्रीविष्णुला देण्याचे निश्चित केले आहे !"
हे ऐकून देवी तुम्ही दुःखी झालात. तशाच आपल्या सखीच्या घरी गेलात. तुम्हास पाहता सखीने विचारले," तू अशी कष्टी का ? काय झाले ? " यावर देवी तुम्ही म्हणालात.., " महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे, पण माझ्या पित्याने दुसरेच ठरविले आहे. आता मी काय करु ? "
तुमच्या या प्रश्नावर सखी म्हणाली, " आपण महाराज गिरीराजांना माहित नसलेल्या अशा प्रदेशात जाऊ या ! " त्याप्रमाणे तुम्ही दोघींनी विचार केलात. सखीने तुम्हास मोठ्या अरण्यात नेले. तुम्ही अशा निघून गेल्यावर तुमच्या शोध हिमराजांनी सर्वत्र सुरु केला.
ते मनात म्हणाले, " माझी कन्या मी श्रीविष्णुला देण्याचे नारदमुनींजवळ कबूल केले होते, आता मी त्यांना काय सांगू ?"
" देवी, या विचारांनी गिरीराज तुम्हास शोधण्यासाठी या अरण्यातून त्या अरण्यात भटकंती करु लागले. देवी, तुम्ही सखीसह एका घोर अरण्यात, रम्य नदीकाठी असलेल्या मोठ्या गुहेत प्रवेश केला. अन्न, पाणी सर्व वर्ज्य केले. भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेचा दिवशी हस्त नक्षत्रावर तुम्ही तुमच्या सखीसह वाळूचे लिंग स्थापून माझे मनोभावे पूजन केले. देवी, तुम्ही माझे स्तूतीगीत गायिलेस. जागरण केलेस. तुमच्या व्रताच्या प्रभावाने माझे आसन हालले. तुम्ही जिथे सखीसह व्रत करीत बसला होतात, मी तेथे आलो. आणि म्हणालो,
" हे देवी, मी तुमच्या व्रताने प्रसन्न झालो आहे. तुम्ही हवा असलेला कोणताही वर मागा !" हे ऐकताच तुम्ही म्हणालात की, " हे प्रभो महेश्वरा ! तुम्ही जर माझ्या या व्रताने माझ्यावर प्रसन्न झाला आहात, तर तुम्हीच माझे पती व्हा ! " देवी तुमचा हा वर ऐकून मी म्हणालो, " देवी, हे फार चांगले आहे. " असे बोलून मी कैलास पर्वतावर आलो. तद्नंतर प्रातःकाल होताच तुम्ही तुमच्या या व्रताची उत्तरपूजा करुन तुमच्या सखीसह आरंभिलेल्या या व्रताचे पारणे तिथेच केले.
तुमचे पिता गिरीराज हिमवान तुमच्या शोध घेत त्या घनघोर अरण्यात आले. तेथेच त्यांनी तुम्हाला सखीसह पाहिले. तुम्हाला पाहताच ते तुमच्याजवळ आले व म्हणाले, " कन्ये, तू या घनघोर अरण्यात का येऊन राहिलीस ? चल, आधी आपण महाली परत जाऊ या." पिता हिमवानाचे बोल ऐकून हे देवी तुम्ही म्हणालात,
" पिताश्री, तुम्ही माझा विवाह श्रीशंकराशी करणार असे मला वाटले होते. परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदललात ; माझा विवाह वासुदेवाशी करण्यास नारदमुनींना होकार दिला. म्हणून मी या वनात निघून आले. तुम्ही जर माझा विवाह श्री शिवशंकराशी लावून देत असाल तरच मी या घनघोर अरण्यातून राज्यातील राजमहालात परत येईन. नाहीतर येथेच राहीन. मी तसा दृढनिश्चय केला आहेच ! "
हे देवी, तुमचे हे दृढनिश्चयात्मक बोल ऐकताच, हिमराज म्हणाले, " तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन ! " हे वचन पिता गिरीराज हिमवानांनी तुम्हास दिले व घरी-महाली घेऊन आले. पुढे हिमवान राजांनी यथाविधी तुमचा विवाह माझ्याशी लावून दिला. देवी, तुम्ही जे व्रत आचरले त्याच्या प्रभावाने तुम्हाला सौभाग्य मिळाले. असे बोलून महादेव म्हणाले, " हे देवी, हे सौभाग्दायक सर्वोत्तम व्रत अद्याप मी कोणालाही सांगीतलेले नाही. हरित म्हणजे हिरवे आणि आलि म्हणजे सखी. सखीने तुम्हाला हिरव्यासमृद्ध अशा अरण्यात नेले म्हणून या व्रताला हरितालिका व्रत हे पावन पुण्यदायक नाव मिळाले."
श्री शंकराचे हे उद्गार ऐकून देवी पार्वती म्हणाल्या , " प्रभो, या व्रताचा पूजाविधी मला कृपा करुन सांगा ! या व्रतापासून काय फळ मिळते, हे व्रत कोणी करावे तेही सांगा ! " देवी पार्वतीचा हट्ट समजून श्री शिवशंकरजी म्हणाले, " हे देवी, हरितालिका हे व्रत सौभाग्यदायक आहे. सौभाग्याची ईच्छा असणा-या स्त्रियांनी हे व्रत भक्ती आणि श्रद्धापूर्वक करावे.
व्रताचा पूजाविधी सांगतो ते ऐका. " केळीचे खांब आणून त्यास तोरण लावून मखर करावे. ते चंदनाने सुगंधित करावे. त्यावर छत लावावे. ते विविध रंगाच्या उत्तमोत्तम पट्टवस्त्रांनी सुशोभित करावे.तेथे मंगल वाद्याचा गजर करावा.सखीसहित तुमची मूर्ती व माझे स्वरुप असणारे शिवलिंग वाळूत तयार करुन गंध, पुष्प, धूप, दिप, फळे इत्यादि उपचारांनी माझे पूजन करावे. नैवेद्य अर्पन करावा. रात्री भक्ती व श्रद्धापूर्वक आनंदीवृत्तीने जागरण करावे.
* या व्रताचा पुजनाचा वेळी पूजीकेने मंत्र म्हणावे ते असे -
१) नमः शिवाय । शांताय पंचवक्राय शूलिने ।।
२) नंदिभृंगीमहाकालगणयुक्ताय शंभवे ।।
३) शिवायै हरकांतायै प्रकृत्ये सृष्टिहेतवे ।
शिवायै सर्वमांगल्ये शिवरुपे जगन्मये शिवे कल्याणदे।
नित्य शिवरुपे नमोस्तुते।।
४) भवरुपे नमस्तुभ्यं शिवायै सततं नमः ।
नमस्ते ब्रम्हरुपिण्ये जगद्धात्र्यै नमो नमः ।
संसारभयसंतापात त्राहि मां सिंहवासिनी।
येन कामेन देवी त्व पूजितासि महेश्वरी ।
राज्यसौभाग्य संपत्तीदेहि मामांह पार्वती।
देवी पार्वती, या मंत्रांनी तुमच्या सखीसहित तुमची व माझी पूजा करावी.
नंतर श्रीहरितालिका कथा पठण करावी. हे व्रत यथाविधि केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्तजन्मापर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धि होते.दुसरे दिवशी ब्राम्हणास वायनदान करावे. नंतर पारणे करावे. हे देवी, याप्रमाणे जी स्त्री हे व्रत करील ती स्त्री तुम्हाप्रमाणे आपल्या पतीसह रममाण होईल. इहलोकी अनंत सुख, ऐश्वर्य, वैभव उपभोगून अंती माझे सायूज्य प्राप्त होईल. हजारो अश्वमेध आणि शत वाजपेय यज्ञ केल्याने जे पुण्य व फळ प्राप्त व्हावयाचे ते या कथा श्रवण-पठणाच्या योगाने प्राप्त होते.
हे देवी, याप्रमाणे मी हे सर्वोत्तम श्रेष्ठ व्रत तुम्हांस निवेदन केले. या एका व्रताच्या आचरणाने कोटी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते.
।। इति भविष्योत्तरपुराणे हरगौरी संवादे हरितालिका व्रतकथा समाप्त।।
◽श्री हरितालिका पुजेची तयारी ◽
◽ उपकरणे ◽
तांब्या, फूलपात्र, पळी, ताम्हण, ताट, व नैवेद्याची वाटी, समई, त्यात तेल व वाती, निरांजन, (तूप व फूलवातीसह) उदबत्ती, व उदबत्ती घर, कापूर, धूपारती, एक चौंरंग, व पाट, केळीचे चार बारीकसे खांब. हरितालिकादेवी मूर्ती व शिवाची पिंडी(वाळूची), घंटा, आगपेटी, इत्यादि.
🔹 पूजेचे साहित्य :-
हळद, कुंकू, गुलाल, दोन नारळ, उदबत्ती, कापसाचे वस्त्रे, विड्याची पाने - १२, सुपारी-१०, खारिक-५, बदाम-५, गुळ खोबरे, केळी, व इतर फळे, जानवे, वासाचे तेल, पंचामृत, (दूध, दही, तूप, मध, साखर ) अक्षता, गंध, सिंदूर, अत्तर, कोमट पाणी, काडपेटी, काचेच्या हिरव्या बांगडी, गळसरी, सुट्टे पैसे, दक्षिणा, दूर्वा, इत्यादि.
🌸 फुले :-
चाफा, केवडा, कन्हेर, बकूळ, धोतरा, कमळ, शेवंती, जास्वंद, मोगरा, अशोक, इत्यादि.
💠 पत्री :-
बेलपत्र, अशोक, आवळी, कण्हेर, कदंब, ब्राम्ही, धोतरा, आघाडा इत्यादि.
🔽 सौभाग्यवायनाचे साहित्य ◾
लहान सुपली, (सुफ) हळद, कुंकू, काजळ, तांदूळ, सुपारी, खारिक, बदाम, नारळ, खण, हिरव्या बांगड्या, गळेसरी, आरसा, फणी, विडा व दक्षिणा, इत्यादि.
🔽पुजेसाठी नियम ◽
०१) पूजेचे धातूमय साहित्य तांब्याचे असावे. चांदीची उपकरणेही उपयोगात आणता येतील.
०२) मूर्ती मातीच्या असल्यास पूजेचे उपचार हळूवारपणे करावेत. दुर्वेने किंवा फुलाने किंचीत पाणी शिंपडावे.
०३) घरातील देवासमोर विडा ठेवून, नमस्कार करुन मगच आसनावर बसून पुजेस यथाक्रम सुरुवात करावी. पूजा करतांना सर्व साहित्य व पदार्थ जवळच आणून निट सांभाळावे. मध्येच उठू नये.
०४) देवीवर फुले उडवू नयेत. हलकेच वाहावित. प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तरपूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये.
०५) देवीला अनामिकेने कुंकू वाहावे. कुंकूम-अक्षता व फूले उजव्या हाताची अनामिका, मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने वाहाव्यात.
०६) विड्याची पाने उताणी व देठ देवीकडेकरुन देवीसमोर ठेवावी, वर सुपारी ठेवावी. नारळाची शेंडी देवीकडे करुन ठेवावा. देवीचे मुख पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असावे. देवीच्या डाव्या बाजूस समई व निरांजन उजव्या बाजूस ठेवावे. उदबत्ती निरांजनाजवळ ठेवावी.
०७) अर्घ्य म्हणजे गंधपुष्प व अक्षता. अक्षता म्हणजे कुंकूममिश्रित तांदूळ. फूले सुंगधित ताजी व न तुटलेली वाहावीत.
०८) फुलाचे देठ देवीकडे करुन वाहावीत. देवीला लाल व पिवळी फुलं फार प्रिय असतात. दुर्वा व बेलाचे त्रिदल आपल्याकडे अग्र करुन वाहावे.
०९) प्रदक्षिणा घालतांना स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे फिरावे. त्यावेळी हात जोडलेले असावेत.
१०) देवीला उदबत्ती, निरांजन, कापूर आरतीने ओवाळतांना ती उजव्या हाताने खालून आपल्या डावीकडून वर व वरुन उजवीकडे खाली अशी देवीच्या मूर्तीवर प्रकाश पाडीत ओवाळावी. त्या वेळी डाव्या हाताने घंटानाद करावा.
दुस-या दिवशी उत्तरपूजा होईपर्यंत तेलाचा दिवा सतत लावलेला असावा. उत्तरपूजेनंतर हरितालिकेच्या मूर्ती, देवीला वाहिलेली फुले, पत्री इत्यादि (निर्माल्य ) समुद्रात किंवा वाहत्या नदित किंवा भरलेल्या तळ्यात विसर्जित करावे.
हरितालिका व्रत करणाऱ्या सुवासिनीने नवीन साडी नेसावी. नथ व दागदागिने हे सौभाग्यअलंकार धारण करावे. हळद-कुंकू लावून घ्यावे. कुमारिकेनेही हे व्रत आचरावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक, लाभदायक व मनोरथ पूर्ण करणारे असे आहे. व्रत करतांना मनात कोणतीही अढी, क्लेश, नैराश्य, चिंता न धरता सश्रद्ध भक्तिभावे आचरावे.
🔹🌸 🔸💠🔸🌹🔸🌸🔹
◽ पूजा प्रारंभ करण्यापूर्वी ◽
व्रत करणाऱ्या सुवासिनीने प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळद-कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवून नमस्कार करावा. ब्राह्मण गुरुजींना व वडिलधारी माणसांना नमस्कार करुन नव्या किंवा स्वच्छ धुतलेल्या आसनावर बसावे. नंतर पूजा प्रारंभ करावी.
* * * * * * * * * * * * *
◽।। अथ हरितालिका पूजा प्रारंभ।। ◾
◾ द्विराचम्य ◽
तीन नावांचा उच्चार करुन प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्राशन करावे. :-
०१) ॐ केशवाय नमः ।
०२) ॐ नारायणाय नमः ।
०३) ॐ माधवाय नमः ।
* पुढील नावाच्या उच्चार करुन -
०४) ॐ गोविंदाय नमः।
म्हणून संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन सोडावे. याप्रमाणे दोन वेळा करावे.
येथून पुढे ध्यान करावे. हातात अक्षता घेऊन दोन्ही हात जोडावेत. दृष्टि आपल्या समोरील देवीवर असावी.
०५) ॐ विष्णवे नमः।
०६) ॐ मधुसुदनाय नमः ।
०७) ॐ त्रिविक्रमाय नमः ।
०८) ॐ वामनाय नमः।
०९) ॐ श्रीधराय नमः ।
१०) ॐ ह्रषीकेशाय नमः ।
११) ॐ पद्मनाभाय नमः ।
१२) ॐ दामोदराय नमः ।
१३) ॐ संकर्षणाय नमः ।
१४) ॐ वासुदेवाय नमः ।
१५) ॐ प्रद्युम्नाय नमः ।
१६) ॐ अनिरुद्धाय नमः ।
१७) ॐ पुरुषोत्तमाय नमः ।
१८) ॐ अधोक्षजाय नमः ।
१९) ॐ नारसिंहाय नमः ।
२०) ॐ अच्यूताय नमः ।
२१) ॐ जनार्दनाय नमः ।
२२) ॐ उपेन्द्राय नमः ।
२३) ॐ हरये नमः ।
२४) ॐ श्रीकृष्णाय नमः ।
हातातील अक्षता देवीला वाहाव्यात.
◽ देवतावंदन ◽
🔽श्रीमन् महागणाधिपतये नमः ।
🔽इष्टदेवताभ्यो नमः।
🔽कुलदेवताभ्यो नमः।
🔽ग्रामदेवताभ्यो नमः।
🔽स्थानदेवताभ्यो नमः।
🔽मातृपितृभ्यो नमः।
🔽उमामहेश्वराभ्यो नमः।
🔽श्रीलक्ष्मीनारायणांभ्यो नमः।
🔽सर्वेभ्यां देवेभ्यो नमः।
🔽सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्यो नमः।
निर्विघ्नमस्तू।।
© प्रा.पुरूषोत्तम पटेल, मु.पो.म्हसावद
mhasawad.blogspot.in