Kaayguru.Marathi

सोमवार, फेब्रुवारी २७, २०२३

माय मराठी

आज जागतिक राजभाषा मराठी दिवस 
( दि.२७ फेब्रुवारी)
निमित्त माझी मातृभाषा माय मराठीची 
थोरवी गाणारी 
🙏🙏🙏🌹कविता…!🌹🙏🙏🙏

माझी माय मराठी 

मराठी  माझी  माय  तीची   प्रेमळ काया
रंग  जिव्हाळ्याचा  अन्  प्रीतिची  छाया

बारा  स्वर तिला भासे  बारा ज्योतिर्लिंग
वर्ण  अठ्ठेचाळीस   भासे    शारदेचे  अंग 

काना   मात्रा - हस्व  दिर्घ उकार वेलांटी
माझा  मायमराठीची वाटे जणू दुध वाटी

श्वासात असे तो श्वास गाईन तुझी गाणी
शब्दसुमन वाहतो आई आज तव चरणी 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, फेब्रुवारी १७, २०२३

आयुष्याच्या जोडीदार


प्रिये हाती घेऊन हात तुझा

दिधले  मी तुला  वचन एक
आयुष्यभराचा    जोडीदार
नातं    निभविन   मी  नेक

सखे    जाणून आहे  ग् मी
नाते   स्नेह  सौख्य प्रीतिचे
जगेन  तुझ्या  सवे   आनंदें
शब्द  एक  एक सप्तपदीचे

वाट  कितीही  असो बिकट
सोडणार  नाही  तुझी साथ
दुःख  संकटे   जरी   आली
सोबतीने  करु  त्यावर मात

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, फेब्रुवारी ०७, २०२३

सख्या रे...!

सख्या रे,सख्या रे ये ना...
विरह    हा सोसवेना 
मन   माझे  आतुरले 
येऊन  मिठीत  घे ना ।।१।।

तुझ्याविना   करमेना
वाटे   जीवन   उदास
तूच  तर  आहे  राजा
माझा जीवनात खास ।।२।।

सख्या तुझ्याविना भासे
बासुरीचे     मंद   सूर
मन  माझे   शोधते  रे
नको  राहू  रे  तू  दूर।।३।।

उमलेना  थिजली   रे 
तुझी  रे  ही  रातराणी
कोमेजली   श्वेततळी
जणू शुक्राची चांदणी ।।४।।

नभी   मेघांच्या राईत
चंद्र   लाजला   लपून
तनूवरी   या   घालावे
प्रीतरंगी       पांघरुन ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, जानेवारी १८, २०२३

जग हे ओळखावे![ अष्टाक्षरी]


जग    हे    धावपळीचे
भान   असू   दे  मानवा
व्हावे    पथदर्शक    तू
शोध  आता  मार्ग  नवा  ।।१।।

धन     द्रव्य  संचयासी
नको   करु   मनःस्ताप 
अंत  काळी   पुरे  तुला
तीन     मिटरचे    माप   ।।२।।

जन्म    धन्य   करावया 
व्यर्थ    नको  धावाधाव
घे  तू  हाती  एक शिळा
लिहावया   तुझे     नाव  ।।३।।

आला  तू रिकाम्या हाती
जाशीलही   तू   रिकामा
राम    नामाचा मोत्यांनी
जागा   लाभे  निजधामा ।।४।।

पदस्पर्श    होता    तुझा
व्हावी  प्रफुल्लित  माती
जिव्हाळ्याचा  प्रकाशाने
उजळून    यावी    नाती  ।।५।।

जीव    येथला    करितो
धडपड        जगण्याची
ऐसे   व्हावे    कर्म  थोर
आस   लागो  मिलनाची  ।।६।।

समजून   घे    तू    एक
देवाने     दिले    वरदान
ओंजळीत     येई    तेच 
तव     भाग्याचे  हे  दान ।।७।।

प्रभातीचा    सूर्य    पहा
रोज    येई    नवा   नवा
विसरुन     क्लेश    ताप
तम  जाळी   एक   दिवा ।।८।।

फुला    परी      परिमळ
जगा     अर्पित    करावे
घेता      निरोप   जगाचा
तू    किर्ती  रुपी    उरावे ।।९।।

‌क्षणोक्षणी    येथे    भेटे
कामा     पुरते   मामाजी
कुणी   न्  भला  चांगला
खरा    एक    श्रीरामजी ।।१०।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल 
" पुष्प "


शनिवार, डिसेंबर ३१, २०२२

२०२३ चे स्वागत…नव्हे,स्मरण दिव्यत्वाचे !

२०२३ चे स्वागत…नव्हे,स्मरण दिव्यत्वाचे!
   

   मित्रहो…आज संपूर्ण जगात दूरदूरपर्यंत पाहता २०२२ या सरत्या वर्षाला निरोप देण्याची जय्यत तयारी सुरु असल्याचे चित्र दिसून येते आहे.२०२२ च्या अंतिम दिवसांच्या अस्ताला जाणारा सूर्य आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी,तसेच आपल्या मोबाईल कॅमे-यात टिपून घेण्यासाठी आबालवृद्ध,त्यातही
तरुणाई सज्ज झाली आहे.जगभरातील सनसेट ( सूर्यास्त) पॉईंट आज तरुणाईच्या गर्दिने फुलून आलेले पाहायला मिळतील.
   …आणि त्याचबरोबर येणारे नुतन वर्ष २०२३ च्या घड्याळातील पहिला ठोका कानात भरुन घेण्यासाठी,उदयाला येणारा रविराज त्याचा सहस्ररश्मींसह डोळ्यात साठवून घेण्यासाठी, उगवत्या रविला साक्ष ठेवून आनंद अनुभवायला तरुणाई उल्हसित झाली आहे. त्यासाठी जगभरातील सनराईज पॉईंट तरुण- तरुणींच्या आगमनाने फुल्लमऽऽफूल झालेले बघायला मिळताहेत.केवढा उल्ल्हास ? केवढी उत्सुकता?किती आतुरता? वर्णन करायला शब्दही कमी पडावेत!
  मित्रहो,ही तर अस्ताचलाकडे जाणा-या सरत्या वर्षातील सूर्याला निरोप देण्याची तयारी मात्र हा सायंकाळी अस्ताचलाकडे जाणारा सूर्य उद्या प्रभाती,वेळ न चुकता,न विसरता, चराचर सृष्टीला नवचैतन्य घेऊन येणारच आहे ना! मला वाटते,सूर्य हा तर जीव सृष्टीचा प्राण. जीव सृष्टीचा चैतन्याचा स्रोत.जीवसृष्टीचा संजीवक.त्याचा एक एक किरण जणू जीवसृष्टीसाठी जगण्याचा श्वासच म्हणा ना! तो आहे म्हणून तर जीवसृष्टीला उभारी देणा-या जलाची ( जल हेच जीवन ) निर्मिती होते.त्याच जलाने जीवसृष्टीची तृषा,तल्ल्खली, दाह ,शांत होतो.मग हे एवढे महान कार्याची जबाबदारी टाकून तो रवीराज जाणार आहे का? नाही जाऊ शकत.जो कायमचा जाणारच नाही,मग त्याला निरोप देणे कितपत योग्य आहे हो? हा माझ्या मनात आलेला मोठ्ठा गुढ प्रश्न ! 
  या गुढ प्रश्नाचे उत्तर शोधतांना मी दृष्टीसमोर एक दिव्य गोष्ट अनुभवली.ती म्हणजे सूर्य रोज प्रभाती रक्तवर्णी रुपाने येतो.रक्ताचा रंग लाल. रक्त हे चैतन्य शक्तीचे अमृतच ! जीव चैतन्यमय व जीवंत असणेचं सिद्ध करणारा महान घटक होय.रोज निवांत झोपलेल्या चराचर सृष्टीला जागृत करण्यासाठी त्यांचे हे रक्तवर्णी रुप.तद्नंतर तो उत्तरोत्तर रजतवर्णी म्हणजेच लख्ख श्वेतवर्णी होतो.जसे रजत म्हणजे चांदी त्यांचा वर्ण रजत…हे धातूबल वाढविणारे रसायन औषध आहे, जे शरीराची ताकद वाढवून पुनरुत्थानास मदत करते.शरीराला ताकत देते, उत्साह निर्माण करते.अगदी तसेच फायदे सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतल्याने शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व " डी " प्राप्त होते. जे हाडांच्या मजबुतीकरिता आवश्यक असते. कोवळ्या उन्हात अंग शेकल्याने सांधेदुखी आणि थंडीमुळे होणारा अंगदुखीचा त्रास दूर होऊन आराम मिळतो.नवीन ताकद अंगात येऊन नवी स्फूर्ती,प्रेरणा अंगी बळावते.
  हाच सूर्य उत्तरोत्तर अस्ताचलाकडे सरकू  
लागतो. पूर्ण अस्ताचलाजवळ जातो तेव्हा त्यांचा वर्ण पित होतो.सूर्याला पाहतांना जणू तो सोन्याचा गोळाच आहे असे भासते.कवी बालकवींची त्याला " सोन्याचा गोळा " ही उपमा दिली आहे.ती अगदी सार्थ वाटते
तेव्हा सुवर्णाचे गुण जणू त्याच्यात उतरतात.
जसे सुवर्णभस्म प्राशन केले तर– मानवी
शरीरावर आलेला तणाव दूर होतो.व शांत झोप लागते असे म्हणतात.त्याचप्रमाणे दिवसभर काम-धाम करुन घरी आल्यावर माणसाला रात्रीची शांत झोप घेता यावी म्हणून सूर्य अस्ताला जातो.जणू पित रंगाने सुवर्णभस्म देऊनच तो जातो.पण…माणसाला आश्वस्त करुन जातो की, 
" बाळा,तू रात्रीची शांत झोप घे.मी तुला प्रभाती चैतन्य देण्यासाठी परत येतोय !" आहे की नाही गंमत ? म्हणूनच तर कुमुदिनीच्या पाकळीत रात्रभर विसावलेला भ्रमर सूर्यतेजाने नवतेज घेऊन मुक्त होतो. खोप्यात विसावलेली पाखरे नभाकडे झेप घेऊ लागतात.वृक्षाची मिटलेली पाने हरित चैतन्याने सळसळू लागतात.कळीची फूले होऊन सुगंध दशदिशांना बागडू लागतो. मंदिरात भाट भूपाळी आळवू लागतात. गायींना पान्हा फूटतो. दवबिंदूंचे मोती-हिरे होतात.हे केवळ सहस्ररश्मींच्या उदयानेच!
     आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपली भारतीय संस्कृती ही दिव्य,भव्य आणि सुवर्णमयी आहे.तीचे नववर्ष हे चैत्र मासाच्या  प्रारंभी म्हणजेच " चैत्र प्रतिपदेपासून " सुरु होते.त्यामागची कथा  थोडक्यात - आजच्याच दिवशी प्रभू श्रीराम हे वनवासातून सीतामाई,बंधु लक्ष्मणासह अयोध्यापुरीत परतले.तो आनंद शब्दातीत! या दिवशी खूप छान गोडधोड,खिर-पुरणपोळी, श्रीखंड,बासुंदी-पुरी पदार्थ बनवून एकमेकांसोबत आनंदाने आस्वाद घेतो.कोणत्याही पक्षी,प्राण्यांचा जीवावर उठून हा उत्सव साजरा होत नाही.ही वैभवशाली संस्कृती आपली आहे.
     गुढीला कुंकू अक्षता वाहून मनोभावे आपल्या नवीन वर्षाला सुरवात करतात. हा आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण. त्याचे दिव्य स्मरण म्हणूनच आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या समोरच गुढी उभारुन आनंदोत्सव साजरा करतो.हेही विसरणे म्हणजे कृतघ्नपणाचे ठरेल. 
  अजून एक गोष्ट सांगता येईल.हा सूर्य बारा तासांसाठी आपली विश्रांतीसाठी काळजी घेतो.त्याचे हे किती मोठे औदार्य ! आई जितके प्रेम, जिव्हाळा आपल्या बाळावर करते,तिला बाळाचा जितका लळा असतो. तितकेच प्रेम हा सूर्य देव चराचर सृष्टीतील आपल्या लेकरांवर करतो.जणू चैतन्यमयी आई बनून! प्रत्येक लेकराला आईची माया, कृपेची छाया सदैव जवळच असावीशी वाटते.आई जिथे जाईल, तिथे त्याच्याबरोबर तिच्या पदराला धरुन लेकरु-बाळ सोबत जाणारच ! हे सांगण्यासाठी कोणी तज्ज्ञ ज्योतिषाची गरज नाही ते तर अटळ सत्यच! आपल्या बाळाला आराम मिळावा म्हणून आई अंगाई गाऊन त्याला जोजवते; झोपवते.अन् ती स्वतः काम-धाम करते.
अशा आईला आपण कधीच निरोप देऊ शकतच नाही. का ? तर तिचा प्रेमपान्हा, ममत्वाचा झरा,तो आपणास कायम प्राशन करता यावा.अगदी तसेच सूर्याचेही ! अशा चैतन्यशक्तीच्या महानस्रोताला निरोप दिला तर…तर त्याचा अस्तित्वाविना ही जीवसृष्टीच संपून जाईल.म्हणून मी तर म्हणेेन,ज्याचातून संपूर्ण ब्रम्हांडाची निर्मिती करणा-या ब्रम्हाची निर्मिती झाली.त्याला निरोप देणे योग्य नव्हेच ! तर त्या हिरण्यगर्भाची प्रार्थना करणे मनुष्यासाठी चराचर सृष्टीचा हितासाठी योग्य ठरेल.
🌹।। ॐ हिरण्यगर्भाय नमः ।।🙏

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...