Kaayguru.Marathi

शुक्रवार, मे १२, २०१७

माझे बाबा

          माझे बाबा

बाबा आता खूप थकला तुम्ही
थांबा न आराम करा आता
माझंही थोड ऐका...
तुमच्या चरणी ठेवितो माथा     ||१||

माहिती आहे बाबा मला
सुंदर तुमच्या जीवनाची गाथा
सहस्र सहस्र पानांची होईल
तुमच्या कर्तृत्वाची एकेक कथा ||२||

बाबा,तुम्हीच तर हात दिला मला
बालपणी चालतांना पडलो जेव्हा
शाळेची फी भरावी म्हणून तुम्ही वापरली
सदरा-ईजार ठिगळ लावून तेव्हा ||३||

स्वतःच्या मौजमजेला बाजूला केलं
जे हवं ते सारं मला दिलं
आजही फिटली नाही बाबा
माझ्यासाठीची खर्च उधारीची बिलं   ||४||

मला आजही आठवतात बाबा
माझ्या आजारपणाचे ते... दिवस
आईला धिर देत तुम्ही  बसले
उशाशी माझ्या रात्रंदिवस      ||५||

बाबा, लहानपणी माझा हट्टापायी
तुम्ही हत्ती न् घोडा व्हायचे
अन्... पाठ दुखेपर्यंत
मला अख्खा वाडाभर मिरवायचे  ||६||

चिखलातून चालताना मळ्याचा वाटेवर
तुम्ही उचलून मला घेतले खांद्यावर
माझं ओझे वाहण्याची तुम्हाला सजा
पण... मी अनुभवली मस्त मज्जा!||७||

माझ्या भल्यासाठी बाबा तुम्ही
एकच झिजविला चपलांचा जोड
घरात होते नव्हते सारे काही
तुम्ही व आईने दिली सारी मोड   ||८||

उपवासाचा नावाने उपाशी राहून मला
मुखीचे घास तुम्ही भरविले
अनंत खस्ता खाऊन  बाबा
तुम्ही मला सुशिक्षित केले          ||९||

बाबा, माझ्या सर्व सुखाचे
तुम्हीच तर खरेखुरे  धनी
मी फक्त निमित्त हो बाबा
सारे सुख उपभोगा ही माझी हमी ||१०||

तुम्ही म्हणता न् बाबा, बेटा!
तू तर  माझ्या स्वप्नांतील रत्न
बाबा तुम्ही फक्त हाक द्या
साद देण्यासाठी करीन सारे यत्न ||११||

बाबा, मला जाणीव आहे हो...
माझ्यावरील तुमच्या महान ऋणाची
स्विकारा न् आतातरी सेवा
त्यातून थोडं उतराई होण्याची....!
पण... बाबा, तुम्ही आता ऐकायचं
श्रमातून निवृत्त व्हायचचं...!       ||१२||

©कवि:- प्रा. पुरुषोत्तम पटेल
मु पो.म्हसावद, ता.शहादा
patelpm31@gmail.com

मंगळवार, मे ०२, २०१७

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

संमेलन विषयक :-
      ' ग्रंथकारांना उत्तेजन द्यावे, स्वस्त दराने ग्रंथ उपलब्ध व्हावेत व वाचकांनी दरसाल  पाच रुपयाचे ग्रंथ विकत घ्यावेत ' असे आवाहन ज्ञानप्रकाश  च्या दिं.७/२/१८७८ च्या अंकात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केले व दिं.१५/५/१८७८ रोजी पुणे येथे संमेलन आयोजित केले. तेव्हा न्यायमूर्ती रानडे यांचे वय अवघे ३६ वर्षे होते. व त्यांच्या नावावर त्यावेळी एकही मराठी ग्रंथ नव्हता.  हे संमेलन व नंतरची ४ संमेलने मराठी ग्रंथकार संमेलन (पहिली पाच संमेलने) या नावाने भरली.
© साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड प्रक्रिया :-
     प्रथम मराठी संमेलन १८७८ मध्ये भरविण्यात आले परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही संस्था १९६० साली उदयास आली. या महामंडळाच्या घटक संस्था -
१) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे     १२५ मते
२) विदर्भमराठी साहित्यसंघ,नागपूर १२५ मते
३) मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई  १२५ मते
४) मराठवाडा साहित्य परिषद,         
औरंगाबाद                                  १२५ मते
* महामंडळाच्या समाविष्ट संस्था :-
१) मराठी साहित्य  परिषद, हैदराबाद (आंध्र)
२) मराठी साहित्य  परिषद, जबलपूर (मध्यप्रदेश)
३) मराठी साहित्य परिषद,गुलबर्गा(कर्नाटक)
४) मराठी साहित्य परिषद गोवा
५) मराठी साहित्य परिषद छत्तीसगड
या पाचही संस्थाची प्रत्येकी         ४०मते
)मराठी साहित्य परिषद बडोदे   १०मते
) स्थानिक स्वागत समिती         ६०मते
       अशी ७७९अधिक (+)  माजी संमेलनाध्यक्षांची मते दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड करतात.
     ही घटना दुरुस्ती महामंडळाने १९७७ च्या पुणे संमेलनानंतर १९७८ मध्ये केली. आणि १९८० मध्ये बार्शी येथे (अध्यक्ष गं. बा. सरदार) भरलेल्या संमेलनापासून संमेलनाच्या अध्यक्षाची निवड या पद्धतीने सुरु आहे.
* संमेलनाची बदललेली नावे :-
      वर उद्धृत केल्यानुसार प्रारंभीची पाच संमेलने इ. स.१८७८,१९८५,१९०५,१९०६, १९०७,  ही ग्रंथकार संमेलने  म्हणून  नंतर १९०८ चे संमेलन लेखक संमेलन म्हणून  १९०९ चे संमेलन महाराष्ट्र साहित्य संमेलन म्हणून आणि इ. स.१९१२ पासून १९३४ पर्यंतची १३ संमेलने मराठी साहित्य संमेलने या नावाने तर १९३५ ते १९५३ पर्यंत १६ संमेलने पुन्हा महाराष्ट्र साहित्य संमेलने  या नावाने तर १९५४ पासून १९६४ पर्यंत  ९ संमेलने मराठी साहित्य संमेलने या नावाने तर इ. स.१९६५ पासून हैद्राबाद येथे भरलेल्या संमेलनापासूनची संमेलने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या संस्थेद्वारे भरविली जात आहेत.
      इ. स.१९१७ नंतर  सलग चार वर्षे  साहित्य संमेलन भरले नाही. १९२१ मध्ये ११ वे साहित्य संमेलन बडोदे येथे साहित्यसम्राट न. चिं.केळकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले.
* दोनवेळा अध्यक्ष होण्याचा बहुमान व गमतीचा घटना :-  
             
  ) महत्वाचे -   न. चिं. केळकरांना दुस-यांदा संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा योग १९३४ च्या बडोदे संमेलनातही मिळाला.पण..महाराष्ट्र साहित्य परिषदस्वागत समिती  यांच्यात वाद नको म्हणून स्वागत समितीने तडजोड स्विकारली आणि त्यांच्या ऐवजी ना.गो.चापेकरांना अध्यक्षपदाची संमती दिली.     
  २) १९३९ ला नगर संमेलनाचे अध्यक्षपद  ऐनवेळी द. वा.पोतदारांना मिळाले. त्यांना नियमानुसार दुस-यांदा अध्यक्ष होण्याचा मान १९४६ ला बेळगाव येथे आला होता. पण... त्यांचे भाग्य...!आगगाडी उशिरा पोहोचल्यामुळे ग. त्र्य. माडखोलकरांना मिळाले.
  ) इ. स. १९०८ साली पुणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारताचार्य चिं. वि. वैद्य यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,   ''.... वराह मिहिरच्या ग्रंथात ' महाराष्ट्र  ' हे नाव प्रथम आढळते. ईसवी सनाच्या पाचव्या शतकात  मराठी भाषेस हल्लीचे स्वरूप प्राप्त झाले व नवव्या शतकात मराठी वाड्:मयास सुरुवात झाली असावी. ज्ञानेश्वर, मुकुंदराज, व नामदेव हे मराठी  वाड्:मयाचा पाया होत. या पायावर एकनाथ, तुकाराम, मुक्तेश्वर, रामदास यांनी डौलदार मजले व मोठे मनोरे उभारले.. हे संमेलन लेखक संमेलन या नावाने भरले होते.      
  ४) इ. स. १९३९ च्या अहमदनगरच्या साहित्य संमेलनासाठी रियासतकार गो. स. सरदेसाई यांची बिनविरोध निवड झाली होती. परंतु त्यांनी अध्यक्ष होण्यास स्पष्ट नकार दिला. निवड होऊनही नकार देणारे ते एकमेव होत. इतिहासकाराऐवजी इतिहासकार म्हणून ऐनवेळी दत्तो वामन पोतदार यांची निवड करुन अध्यक्षस्थानी बसविण्यात आले.
  ५) अमरावती येथे १९८९ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष के. ज. पुरोहित हे केवळ एक मताने निवडून आले. त्यांच्या हा विक्रम सहजासहजी कोणालाही मोडता येणार नाही.
  शिवाय  हे संमेलन व्यायाम शाळेत भरले होते. व्यायाम शाळेत भरणारे हे जगातील पहिलेच साहित्य संमेलन असावे.
  ) इ. स. च्या ७२व्या मुंबई येथे  झालेल्या(१९९९) साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी स्वतः पुणे येथे जाऊन पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात वगैरे साहित्यिकांना निमंत्रित केले व संध्याकाळीच मुंबईत परतल्यानंतर मा. शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेऊन त्याचा हातात नारळ दिला.
  मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी आतापर्यंत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे पहिलेच स्वागताध्यक्ष.. परंतु स्वागताध्यक्ष पदी मुख्यमंत्री असूच शकत नाही. असाच नियतीचा डाव असावा.
  ७) कोल्हापूर  येथे भरलेल्या १८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड यांची निवड झाली. मात्र... महाराज या साहित्य संमेलनाला स्वतः उपस्थित राहिले नाही. त्यांचे खासगी कारभारी श्री. माने यांनी त्यांचे भाषण
संमेलनात वाचून दाखविले.
* संमेलनाचे अध्यक्ष :-
१ न्या. महादेव गोविंद रानडे  १८७८ पुणे
२ कृष्णशास्त्री राजवाडे        १८८५ पुणे
३ रघुनाथ पांडुरंग करंदीकर  १९०५ सातारा
४ गोविंद वासुदेव कानिटकर १९०६ पुणे
५ विष्णु मोरेश्वर महाजनी     १९०७ पुणे
६ चिंतामण विनायक वैद्य     १९०८ पुणे
७ कान्होबा रणछोडदास किर्तिकर
                                      १९०९ बडोदे                          
८ हरी नारायण आपटे         १९१२ अकोला
९ गंगाधराव गणेश पटवर्धन  १९१५ मुंबई
१० गणेश जनार्दन आगाशे   १९१७ इंदौर
११ नरसिंह चिंतामण केळकर १९२१ बडोदे
१२ माधव विनायक किबे     १९२६ मुंबई
१३ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर १९२७ पुणे
१४ माधव श्रीहरी अणे         १९२८ ग्वाल्हेर
१५ शिवराम महादेव परांजपे १९२९ बेळगांव
१६ वामन मल्हार जोशी       १९३० मडगाव
१७ श्रीधर व्यंकटेश केतकर  १९३१हैद्राबाद
१८ सयाजीराव गायकवाड   १९३२ कोल्हापूर
१९ कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर     
                                      १९३३ नागपूर
२० नारायण गोविंद चापेकर १९३४ बडोदे
२१भवानराव श्री.पंतप्रतिनिधी१९३५ इंदौर
२२ माधव ज्युलियन            १९३६जळगाव
२३ विनायक दा. सावरकर    १९३८ मुंबई
२४ दत्तो वा. पोतदार        १९३९ अहमदनगर
२५ नारायण सिताराम फडके १९४०रत्नांगिरी
२६ विष्णु सखाराम खांडेकर  १९४१ सोलापूर
२७ प्रल्हाद केशव अत्रे          १९४२ नाशिक
२८ श्रीपाद महादेव माटे        १९४३ सांगली
२९ भार्गवराम विठ्ठल वरेरकर १९४४ धुळे
३० गजानन त्र्यंबक माडखोलकर 
बेळगांव (कर्नाटक )             १९४६
३१ नरहर रघुनाथ फाटक      १९४७ हैद्राबाद
३२ शंकर दत्तात्रय जावडेकर १९४९ पुणे
३३यशवंत दिनकर पेंढारकर  १९५० पुणे
३४ अनंत काकबा प्रियोळकर१९५१कारवार
३५ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी
      अमळनेर                    १९५२
३६ विठ्ठल दत्तात्रय घाटे       १९५३       
       अहमदाबाद
३७ लक्ष्मणशास्त्री जोशी      १९५४ दिल्ली
३८ शंकर दामोदर पेंडसे      १९५५ पंढरपूर
३९ अनंत आ. काणेकर       १९५७औ'बाद
४० आ.रा.देशपांडे (अनिल)१९५८ मालवण
४१ श्रीकृष्ण केशव क्षीरसागर १९५९ मिरज
४२ रामचंद्र श्रीपाद जोग      १९६० ठाणे
४३ कुसुमावती आ.देशपांडे  १९६१ ग्वाल्हेर
४४ नरहर विष्णु गाडगीळ    १९६२ सातारा
४५ विष्णु वामन शिरवाडकर१९६४मडगाव
४६ वामन लक्ष्मण कुलकर्णी १९६५ सातारा
४७ विष्णु भिकाजी कोलते   १९६७ भोपाळ
४८ पुरुषोत्तम शिवराम रेगे    १९६९ वर्धा
४९ गजानन दिगंबर माडगूळकर    
                                      १९७३ यवतमाळ
५० पुरुषोत्तम ल. देशपांडे १९७४ इचलकरंजी
५१ दुर्गा नारायण भागवत  १९७५ कराड
५२ पुरुषोत्तम भा भावे      १९७७ पुणे
५३ वामन कृष्ण चोरघडे   १९७९चंद्रपूर
५४ गंगाधर बाळकृष्ण सरदार १९८० बार्शी
५५ गोपाळ नीळकंठ दांडेकर फेब्रुवारी १९८१
     अकोला
५६ गंगाधर गोपाळ गाडगीळ डिसेंबर  १९८१
      रायपूर
५७ व्यंकटेश माडगूळकर  १९८३ अंबाजोगाई
५८ शंकर रामचंद्र खरात   १९८४ जळगाव
५९ शंकर बाबाजी पाटील  १९८५ नांदेड
६० विश्राम चिंतामण बेडेकर १९८८ मुंबई
६१ वसंत शंकर कानेटकर  १९८८ ठाणे
६२ केशव जगन्नाथ पुरोहित १९८९ अमरावती
६३ डॉ. युसुफखान महंमदखान पठाण
                      जानेवारी १९९० पुणे
६४ मधु मंगेश कर्णिक
                      डिसेंबर  १९९० रत्नागिरी
६५ रमेश राजाराम मंत्री   १९९२ कोल्हापूर
६६ विद्याधर सं. गोखले   १९९३  सातारा
६७ राम बाळकृष्ण शेवाळकर 
                           १९९४  पणजी(गोवा)
६८ नारायण सुर्वे            १९९५ परभणी
६९ शांता जनार्दन शेळके १९९६आळंदी
७० नागनाथ इनामदार     १९९७ अहमदनगर
७१ द. मा. मिरासदार   १९९८ परळी वैजनाथ
७२ विश्वनाथ वामन बापट(वसंत बापट)
                                  १९९९ मुंबई
७३ य. दि. फडके           २००० बेळगाव
७४ विजया राजाध्यक्ष     २००१ इंदौर
७५ राजेंद्र बनहट्टी           २००२ पुणे
७६ सुभाष भेंडे              २००३ कराड
७७ रा. ग. जाधव           २००४ औरंगाबाद
७८ केशव मेश्राम           २००५ नाशिक
७९ मारुती चितमपल्ली  २००६ सोलापूर
८० अरुण साधू         २००७ नागपूर
८१ म. द. हातकणंगलेकर २००८ सांगली
८२ आनंद यादव       २००९महाबळेश्वर
८३ द.भि.कुलकर्णी   २०१० पुणे
८४ उत्तम कांबळे      २०११ ठाणे
८५ वसंत आ.डहाके  २०१२ चंद्रपूर
८६ नागनाथ कोत्तापल्ले २०१३ चिपळूण
८७ फ. मु.शिंदे          २०१४ सासवड
८८ डॉ. सदानंद मोरे   २०१५ घुमान(पंजाब )
८९ डॉ. श्रीपाल सबनीस २०१६ पिंपरी
      (चिंचवड)
९० डॉ. अक्षयकुमार काळे २०१७ डोंबिवली

बुधवार, नोव्हेंबर १६, २०१६

नोटांबंदी आणि शेतकऱ्याचा बळी

   बालपणी पाऊस व पावसाची गोष्ट  सांगताना आणि पावसाळ्यात  उंच आभाळात काळे ढग दिसू  लागले  की आम्ही  एक बडबड गीत सदानकदा  म्हणायचे.
          " ये रे ये रे पावसा
             तुला  देतो पैसा
            पैसा. ...झाला खोट्टा
            पाऊस आला  मोठ्ठा
पाऊस पडतो रिमझिम, अंगण झाले  ओलेचिंब
ये..ग ये...ग सरी , माझे मडके  भरी
सर आली  धावून मडके  गेले वाहून  "
या बडबड गीताचा कवी-रचयिता कोण ? कुणालाही  माहिती नाही. पण.. कवी त्रिकालगामी असावे असे मला वाटते. कारण  माझा  शेतकरी  बाप तेव्हाही मडकेभर पाण्यासाठी  पावसाला साकडे  घालत  होता, तरी धोधो पाऊस  पडायचा व त्यांत मडके  पाण्याने भरले जाऊनही पाण्यात  वाहून  जायचे.
म्हणजे  मोठा  पाऊस  पडला  तरी माझ्या  शेतकरी बाप तहानलेलाच राहायचा.म्हणजे त्याची स्वप्ने  अपूर्णच राहायची.ही परिस्थिती  आज खूप बदलली आहे;  असे कोणीही म्हणणार नाही.
     खूप वर्षानंतर यावर्षी (2016) हे सर्व  पुन्हा एकदा
आठवल ! कारण 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजीनी रात्री 🕗8-00 वाजता चलनात  असलेल्या रूपये 500 व 1000 च्या  सर्व  नोटा(चलन)रात्री🕛 12 वाजेनंतर चलनातून रद्द  करण्याचा निर्णय जाहीर केला. सर्व  नागरिकांनी  आपल्याकडील या नोटा दि.30/12/2016 पर्यत बॅकेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. माझा शेतकरी  बापासाठी  हा मोदी निर्णय
" आगीतून   वाचलो , फुफाट्यात   पडलो ." असाच!!!!
     या वर्षी  पावसाने काही ऐंकलच नाही.मोठा रूसवा धरून बसला.त्याचा रूसव्याने खरीप हातचा गेला.दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पिके डोळ्यासमोर करपून जाऊ लागली. जणू मेघातील जलबिंदु सागराने काढून घेतले ...! डोळ्यातले अश्रूही रोज -रोज गळू लागल्याने  तेही संपून गेले !
आणि  चमत्कार घडला..! ऑक्टोबर  महिन्यात  सर्वत्र हाहाकार माजविणारा पाऊस पडला.परतीचा पाऊस .... जणू जलप्रपात होऊन बरसला!
खरिपाची आशा पल्लवित  झाली  खरी,पण बडबडगीतातील मडके  जसे वाहून जात असे  तसे आताही वाहून गेले. मूग , उडीद, सोयाबीन, पावसात शेतातच सडून  नष्ट झाले. पण या परतीच्या  पावसाने हाहाकार  माजवला पण... माझा शेतकरी बापाला जगण्याची संधी दिली  हेही नसे थोडके !
   रब्बी हंगाम पुर्ण क्षमतेने  घेईन.वाहून गेलेले मडके  आता भरणारच ! या संकल्पाने  शेतकरी बाप कामाला लागला.काळ्या आईच्या  सेवेसाठी ईकडून-तिकडून कर्ज काढून बी-बीयाणे खरेदीसाठी  कृषी केंद्रावर जाणार  त्याच काळात  मोदी सरकारने  नोटबंदीचे आदेश  जाहीर केले. झाले. .. पोटात  धस्स.
   माझा शेतकरी  बाप हिंमत  संपली ,स्वाभिमान  दुखावला तर हतबल होतो. माझ्या  शेतकरी  बापाची 2 हेक्टर  बागायती शेती आहे. 1 हेक्टर क्षेत्रात ऊसाची लागण करायचीय ,त्यासाठी शेती मशागतीला रू.9000/- ,ऊसबेणे रू.10000/-,खते 7000/-,ऊसलागण 5500/- गडी एक- 1000/- असा प्रारंभीचा एकूण कमीतकमी  खर्च 32500/- लागणार आहे. उर्वरित  एक हेक्टर  साठी वेगळा  खर्च.  खर्च  भागवायचा तर दररोजच्या  बॅक खात्यावरील प्राप्त  मर्यादा  खुपच तुटपूंजी आहे.खात्यावर रक्कम  आहे,पण काढायला  प्रचंड मोठी रांग! त्यात  नियम व मर्यादा अडचणीच्या. मग ऊस लागवड  करायची कशी ? व केव्हा  ,
   घरात  कापूस पडून आहे .व्यापारी म्हणतात,
" जुन्या नोटा घेणार तर जास्तीत जास्त  भाव  देणार.व नव्या नोटा हव्या तर भाव कमी व पेमेंट  आठ दिवसांत  देईन ." असे संधीसाधू  व्यवहार. मग कसे करावे  माझ्या  शेतकरी  बापाने ? तुम्हीच सांगा  मोदीजी !
   मोदीजी (मायबाप सरकार )  जाहीरपणे म्हणताहेत,
" मित्रहो,आणखी 50 दिवस (दि.30/12/2016) कळ सोसा."
त्यांचे ऐकून  माझा  शेतकरी बापाने जर इतकी कळ सोसली तर येणारे रब्बी हंगामातील  पिकही हातचे जाईल. बाजारपेठेत  उधार द्यायला  आजच्या  घडीला  कोणी तयार नाही. त्यामुळे  माझ्या  शेतकरी बाप -सरकार  त्याला " बळीराजा  " म्हणते.पण सरकारच्या एका  रात्रीच्या निर्णयाने  राजा का बज गया बाजा ! या बाबतीत  सर्वच राजकीय पक्ष  केवळ  दिखाव्यापुरते.
पंतप्रधान  मा.नरेंद्रजी मोदीजींना माझा  एक सवाल .
' हेच का अच्छे  दिन ? '
आतापर्यंत  माझा शेतकरी बापाला नियंत्याने साथ  नाकारली.म्हणून त्याने मरण जवळ  केले. आजतर तुम्हीच नाकारता आहात .मग त्याने कोणाकडे न्याय मागावा ? आत्महत्या  हा उपाय योग्य  ठरेल का हो ?
तात्यासाहेब वि.वा.शिरवाडकर यांच्या अप्पासाहेबांच्या शब्दात  सांगायचे तर, 
To be or not to be,that is the question..
जगावं की मरावं
हा एकच सवाल  आहे.
आणि  पुढे अजून  ते  म्हणतात,
....आणि  करावा सर्वाचा शेवट
एका प्रहाराने
माझा तुझा याचा आणि  त्याचाही....
करणार का विचार  मा.नरेंद्रजी मोदी साहेब  आणि  मा.देवेद्रजी फडणवीस साहेब ?
मायबाप हो , कळकळीची  ही विनंती मान्य होईल ना?

● प्रा.पुरूषोत्तम पटेल,
   मुं.पो.म्हसावद,जि.नंदुरबार
   भ्रमणध्वनी -9421530412
   patelpm31@gmail.com

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...