Kaayguru.Marathi

बुधवार, मार्च १५, २०२३

सख्या रे...


सख्या रेऽऽ तू यावे भेटीस माझ्या
दे ना  गोड चुंबन गाली
उमटेल मुखावरी लाली
लाजेने  कळत नकळत ।।१।।

प्रिये...बावणखणी रुप तुझे
त्यावर रुळे कुंतल केशरी
भासे जणू तू अप्सरा
पाहता कळत  नकळत ।।२।।

सख्या रेऽऽ नकोस राहू दूर असा
घे ना तू मिठीत मजला
पेटला प्रीतिचा वणवा
शांतवी कळत नकळत ।।३।। 

प्रिये...आठवतो मज गत जन्म
मी राजा तू होती राणी
ये जवळी लिहू कहाणी
मिलनाची कळत नकळत।।४।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, मार्च ०७, २०२३

कन्हैया तुझी रे...!

कन्हैया पाहते मी जेव्हा तुझ्या नजरेतून 
मी दिसे  यमुना धारा
सख्या झोंबतो जणू तू मलमली अंगाला
होऊन खट्याळ वारा ।।१।।

गोविंदा पाहते मी जेव्हा तुझ्या नजरेतून 
तू    भासे   चंद्र  नभा
सख्या उगवतीच्या रविकिरणात शोभतो
तू जणू गोपीकात उभा ।।२।।

रेऽ  वनमाळी पाहता मी तुझ्या नजरेतून
तू  फिरतो  चराचरात
सख्या वाजता गोड  मुरली तुझ्या ओठी
मी राधा वाहते सूरात ।।३।।

केशवा तुझ्या नजरेतून मी पाहते जेव्हा 
कळे मी पहाटेची उषा
सप्तअश्वांचा टापांनी  गुलाल  उधळीत
तूच व्यापितो दशदिशा ।।४।।

माधवा तुझ्या नजरेतून पाहते मी जेव्हा
मी होते मनमोहन
पाहते तव  हृदयी मी राधा  एक  प्यारी
तू  शिव  मी  प्राण      ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


सोमवार, फेब्रुवारी २७, २०२३

माय मराठी

आज जागतिक राजभाषा मराठी दिवस 
( दि.२७ फेब्रुवारी)
निमित्त माझी मातृभाषा माय मराठीची 
थोरवी गाणारी 
🙏🙏🙏🌹कविता…!🌹🙏🙏🙏

माझी माय मराठी 

मराठी  माझी  माय  तीची   प्रेमळ काया
रंग  जिव्हाळ्याचा  अन्  प्रीतिची  छाया

बारा  स्वर तिला भासे  बारा ज्योतिर्लिंग
वर्ण  अठ्ठेचाळीस   भासे    शारदेचे  अंग 

काना   मात्रा - हस्व  दिर्घ उकार वेलांटी
माझा  मायमराठीची वाटे जणू दुध वाटी

श्वासात असे तो श्वास गाईन तुझी गाणी
शब्दसुमन वाहतो आई आज तव चरणी 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, फेब्रुवारी १७, २०२३

आयुष्याच्या जोडीदार


प्रिये हाती घेऊन हात तुझा

दिधले  मी तुला  वचन एक
आयुष्यभराचा    जोडीदार
नातं    निभविन   मी  नेक

सखे    जाणून आहे  ग् मी
नाते   स्नेह  सौख्य प्रीतिचे
जगेन  तुझ्या  सवे   आनंदें
शब्द  एक  एक सप्तपदीचे

वाट  कितीही  असो बिकट
सोडणार  नाही  तुझी साथ
दुःख  संकटे   जरी   आली
सोबतीने  करु  त्यावर मात

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, फेब्रुवारी ०७, २०२३

सख्या रे...!

सख्या रे,सख्या रे ये ना...
विरह    हा सोसवेना 
मन   माझे  आतुरले 
येऊन  मिठीत  घे ना ।।१।।

तुझ्याविना   करमेना
वाटे   जीवन   उदास
तूच  तर  आहे  राजा
माझा जीवनात खास ।।२।।

सख्या तुझ्याविना भासे
बासुरीचे     मंद   सूर
मन  माझे   शोधते  रे
नको  राहू  रे  तू  दूर।।३।।

उमलेना  थिजली   रे 
तुझी  रे  ही  रातराणी
कोमेजली   श्वेततळी
जणू शुक्राची चांदणी ।।४।।

नभी   मेघांच्या राईत
चंद्र   लाजला   लपून
तनूवरी   या   घालावे
प्रीतरंगी       पांघरुन ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...