Kaayguru.Marathi

मंगळवार, मार्च ०७, २०२३

कन्हैया तुझी रे...!

कन्हैया पाहते मी जेव्हा तुझ्या नजरेतून 
मी दिसे  यमुना धारा
सख्या झोंबतो जणू तू मलमली अंगाला
होऊन खट्याळ वारा ।।१।।

गोविंदा पाहते मी जेव्हा तुझ्या नजरेतून 
तू    भासे   चंद्र  नभा
सख्या उगवतीच्या रविकिरणात शोभतो
तू जणू गोपीकात उभा ।।२।।

रेऽ  वनमाळी पाहता मी तुझ्या नजरेतून
तू  फिरतो  चराचरात
सख्या वाजता गोड  मुरली तुझ्या ओठी
मी राधा वाहते सूरात ।।३।।

केशवा तुझ्या नजरेतून मी पाहते जेव्हा 
कळे मी पहाटेची उषा
सप्तअश्वांचा टापांनी  गुलाल  उधळीत
तूच व्यापितो दशदिशा ।।४।।

माधवा तुझ्या नजरेतून पाहते मी जेव्हा
मी होते मनमोहन
पाहते तव  हृदयी मी राधा  एक  प्यारी
तू  शिव  मी  प्राण      ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


सोमवार, फेब्रुवारी २७, २०२३

माय मराठी

आज जागतिक राजभाषा मराठी दिवस 
( दि.२७ फेब्रुवारी)
निमित्त माझी मातृभाषा माय मराठीची 
थोरवी गाणारी 
🙏🙏🙏🌹कविता…!🌹🙏🙏🙏

माझी माय मराठी 

मराठी  माझी  माय  तीची   प्रेमळ काया
रंग  जिव्हाळ्याचा  अन्  प्रीतिची  छाया

बारा  स्वर तिला भासे  बारा ज्योतिर्लिंग
वर्ण  अठ्ठेचाळीस   भासे    शारदेचे  अंग 

काना   मात्रा - हस्व  दिर्घ उकार वेलांटी
माझा  मायमराठीची वाटे जणू दुध वाटी

श्वासात असे तो श्वास गाईन तुझी गाणी
शब्दसुमन वाहतो आई आज तव चरणी 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, फेब्रुवारी १७, २०२३

आयुष्याच्या जोडीदार


प्रिये हाती घेऊन हात तुझा

दिधले  मी तुला  वचन एक
आयुष्यभराचा    जोडीदार
नातं    निभविन   मी  नेक

सखे    जाणून आहे  ग् मी
नाते   स्नेह  सौख्य प्रीतिचे
जगेन  तुझ्या  सवे   आनंदें
शब्द  एक  एक सप्तपदीचे

वाट  कितीही  असो बिकट
सोडणार  नाही  तुझी साथ
दुःख  संकटे   जरी   आली
सोबतीने  करु  त्यावर मात

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, फेब्रुवारी ०७, २०२३

सख्या रे...!

सख्या रे,सख्या रे ये ना...
विरह    हा सोसवेना 
मन   माझे  आतुरले 
येऊन  मिठीत  घे ना ।।१।।

तुझ्याविना   करमेना
वाटे   जीवन   उदास
तूच  तर  आहे  राजा
माझा जीवनात खास ।।२।।

सख्या तुझ्याविना भासे
बासुरीचे     मंद   सूर
मन  माझे   शोधते  रे
नको  राहू  रे  तू  दूर।।३।।

उमलेना  थिजली   रे 
तुझी  रे  ही  रातराणी
कोमेजली   श्वेततळी
जणू शुक्राची चांदणी ।।४।।

नभी   मेघांच्या राईत
चंद्र   लाजला   लपून
तनूवरी   या   घालावे
प्रीतरंगी       पांघरुन ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, जानेवारी १८, २०२३

जग हे ओळखावे![ अष्टाक्षरी]


जग    हे    धावपळीचे
भान   असू   दे  मानवा
व्हावे    पथदर्शक    तू
शोध  आता  मार्ग  नवा  ।।१।।

धन     द्रव्य  संचयासी
नको   करु   मनःस्ताप 
अंत  काळी   पुरे  तुला
तीन     मिटरचे    माप   ।।२।।

जन्म    धन्य   करावया 
व्यर्थ    नको  धावाधाव
घे  तू  हाती  एक शिळा
लिहावया   तुझे     नाव  ।।३।।

आला  तू रिकाम्या हाती
जाशीलही   तू   रिकामा
राम    नामाचा मोत्यांनी
जागा   लाभे  निजधामा ।।४।।

पदस्पर्श    होता    तुझा
व्हावी  प्रफुल्लित  माती
जिव्हाळ्याचा  प्रकाशाने
उजळून    यावी    नाती  ।।५।।

जीव    येथला    करितो
धडपड        जगण्याची
ऐसे   व्हावे    कर्म  थोर
आस   लागो  मिलनाची  ।।६।।

समजून   घे    तू    एक
देवाने     दिले    वरदान
ओंजळीत     येई    तेच 
तव     भाग्याचे  हे  दान ।।७।।

प्रभातीचा    सूर्य    पहा
रोज    येई    नवा   नवा
विसरुन     क्लेश    ताप
तम  जाळी   एक   दिवा ।।८।।

फुला    परी      परिमळ
जगा     अर्पित    करावे
घेता      निरोप   जगाचा
तू    किर्ती  रुपी    उरावे ।।९।।

‌क्षणोक्षणी    येथे    भेटे
कामा     पुरते   मामाजी
कुणी   न्  भला  चांगला
खरा    एक    श्रीरामजी ।।१०।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल 
" पुष्प "


Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...