Kaayguru.Marathi

बुधवार, एप्रिल १६, २०२५

अहाहा...बहावा फुलला!

सातपुडा साहित्य मंच आयोजित
उपक्रम क्र- १५
विषय - अहाहा!बहावा फुलला!
--------------------------------------------------------------
शिर्षक: बहावा फुलला!

ऋतुराजाचा स्वागताला
पहा उभा नटून अहाहा
कवेत घेण्या  आतूरला
प्रसन्न   हा  सोनबहावा १

पर्ण भासे  हिरवा  चुडा
पुष्प अहाहा मदनबाण
हृदयाला देई संजीवनी 
प्रसन्न   आनंदाचे  दान २

हळद  माखून  अंगावर
सृष्टी  भासे  नवी नवरी
पुष्पमाळा घेऊन आला
पितांबर  नेसून  श्रीहरी ३

पानं  भासे हिरवा चुडा
फुलं    पिवळी   हळद
लाजेचा   नेसून   शालू
बहावा  घालतोय  साद ४

बहावा  वाटे   प्रितवेडा
जणू करितो प्रियाराधन
राधेसंग रासक्रीडा खेळे
नयनी  दिसे  मनमोहन ५

इवली  इवली  पाकळी
जणू  मिणमिणते  डोळे 
टोकावरच्या   कळ्यांचे
भाव भासती  हो भोळे ६

फांदी  फांदीवरची फुलं 
वाटे   मोती अन् पोवळे
रविकिरणात   शोभतसे
नवरत्नांचे मळे  आगळे ७

भुईने लावली जणू नभी 
पिवळ्या दिव्यांचे झुंबर
सृष्टी  भासे  नवी  नवरी
बहावा दिसे नयनमनोहर ८

वाढता उन्हाची काहीली
बहावा   येई‌  बहरायला
खिन्न   मानवी   मनाला 
प्रसन्न होऊन हसवायला ९

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “ पुष्प ”

रविवार, एप्रिल ०६, २०२५

राम जन्मला !




शिर्षक: राम जन्मला !

चैत्र मास शुद्ध नवमी राजा दशरथाचे नगरी
राणी कौशल्या उदरी जन्मले वैकुंठीचा हरी ।।१।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

पुष्पांजली अर्पितसे स्वर्गीचे सुरवर ऋषीमुनी
प्रसन्न होऊन नाचती नभीच्या दिशा चारी ।।२।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

पुत्रदर्शने आनंद अश्रु दाटे कौसल्या लोचनी
कुंकुम लाली विलसे कैकयी सुमित्रा गालावरी।।३।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

पाळणा सोनियाचा आज सजला राजमहाली
बाळाच्या मुखदर्शना गर्दी दाटली राजद्वारी ।।४।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

आनंदे नाचती अवघी अवधपुरीची नरनारी
कल्लोळ उठे दशदिशी वाजते सनई तुतारी ।।५।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

उष्ण वायू अश्ववेगे पुण्य वार्ता घेऊन पळे
स्तब्ध कळ्या फुलल्या दरी खोरी तरुवेलीवरी।।६।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

सूर्यही थांबला नभी पाहाया हर्ष मुखकमळे
कुहुकुहू गाते कोकिळ सु-स्वरे आम्रवृक्षावरी ।।७।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

चौखूर उधळीत आल्या पान्हावल्या धेनू अंगणी
भाट गाती स्तुतीसुमने नृपतीचे मध्यान्ह प्रहरी।।८।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...