आत्महत्या... आज सर्वत्र सहजच वापरला जाणारा शब्द. पण, आपल्या साधू-संत, ऋषी - मुनी आणि श्रृती-स्मृतीकार, पुराणकार, देवीभागवत, शुक्र नीति,चाणक्यनीति, रामायण, महाभारत, संहिताग्रंथ, इत्यादि परमपवित्र ग्रंथकारांनी मानवी जीवनाला मार्गदर्शक सिद्धांत, तत्व, नीति-नियम, कथिले. ह्याद्वारा मानवी जन्म सार्थकी लागावा. जीवाला परमात्मा आणि मोक्षप्राप्ती व्हावी हाच परम उद्देश यातून साध्य व्हावा असा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते.
भगवान श्रीकृष्णाने गीताग्रंथात अगदी स्पष्टपणे कथन केले आहे की, -
यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परा गतिम्।
तस्माच्छास्त्र प्रमाणं ते कार्याकार्यव्वस्थितौ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्त कर्म कर्तुमिहार्हसि।।
(गीता १६।२३-२४)
अर्थ -
" जो मनुष्य शास्त्रसंमत विधीला सोडून आपल्या इच्छा नुसार मनमानी वर्तन करतो, अशा मनुष्याला सिद्धी, शान्ती आणि परमगती प्राप्त होत नाही. कारण, मनुष्यासाठी कर्तव्य - अकर्तव्य समजून घेण्यासाठी शास्त्र हेच प्रमाण आहे. असे समजून हे मनुष्या.. तू या लोकांत शास्त्रसंमत नियत कर्तव्य - कर्म करावे.अर्थात,तू शास्त्रसंमत असेच कर्तव्य - कर्म करीत रहा.
तात्पर्य, असे की, आपण ' काय करावे, काय करु नये?' हे समजून घेतांना विधीशास्त्र प्रमाणभूत मानले पाहिजे. "
जे शास्त्रसंमत आचरण करतात ते ' नर ' आणि जे मनाला येईल असे आचरण करतात. ते ' वानर ' होत. गीताग्रंथात भगवान श्रीकृष्णाने मनमानी आचरण करणा-यास ' असूर ' असे म्हटले आहे.
' प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदूरासुराः।'
(गीता १६।७)
आत्महत्या करु नये. या संबंधी शास्त्र काय म्हणते. ते जाणून घेऊ या.
१) आत्महत्या करणारा मनुष्य साठ हजार वर्षापर्यंत अन्धतामिस्त्र नरकात निवास करतो.
संदर्भ - ◽(पाराशरस्मृती ४।१-२)
२) भावाचा खुण केल्याने अत्यंत घोर नरकाची प्राप्ती होते, परंतु त्याहूनही भयंकर नरक स्वतः आत्महत्या केल्याने प्राप्त होतो.
◽(महाभारत, कर्णपर्व-७०।२८)
३) जो पुरुष अथवा स्त्री काम, क्रोधाने फाशी घेऊन, शस्त्रद्वारा किंवा विष प्राशन करुन आत्महत्या करतात. त्यांचे शव चांडाळाने दोरी बांधून राजमार्गावरुन फरफटत न्यावे. अशा व्यक्तींचे अग्निसंस्कार आणि इतर विधि करणे वर्जित करावे.
◽(कौटिल्य - अर्थशास्त्र ४।७)
४) आत्महत्या करणारे पुरुष स्त्री घोर नरकात जातात. आणि सहस्त्र नरक यातना भोगून वराह योनीत जन्म घेतात. म्हणून समजदार व्यक्तींनी चुकूनही आत्महत्या करु नये.
◽(स्कंदपुराण, काशी. पू. १२।१२-१३)
५) आत्महत्या करणारी व्यक्ती कदाचित वाचली व जीवंत राहीली, किंवा संन्यास ग्रहण करुन ह्या विचारांचा त्याग जरी केला तरी ती व्यक्ती 'प्रत्यवसित' म्हणून ओळखली जाते. अशी व्यक्ती समाजात सर्वाकडून बहिष्कृत समजली जाते. तिची शुद्धी केवळ चांद्रायणव्रत किंवा दोनदा तप्तकृच्छ-व्रत केल्यानेच होऊ शकेल. ( हे व्रत अत्यंत कठिण आहे.)
◽( लघुयमस्मृती २२-२३)
६) जी व्यक्ति आत्महत्या करते तीचे सुतक धरु नये.
◽१) याज्ञवल्क्यस्मृती ३।६
२) विष्णुस्मृती २२
३)गरुडपुराण, आचार. १०६।६
४) कूर्मपुराण, उ. २३।७३
वरील विषयाने आपल्या स्मृतीकारांनी अत्यंत दूरदृष्टीने, खडतर तपश्चर्या करुन प्राप्त केलेल्या योगसामर्थ्याने मांडलेले हे सिद्धांत, केलेला उपदेश सुज्ञपणे समजून घेतला तर मानवी जन्म खरोखर सार्थकी लागेल. कारण हा नरदेह प्राप्त होणे सहजसाध्य गोष्ट नाही. आपली धर्मसंस्कृती ८४ लक्ष योनी (जन्म )मानते.
त्या योनींची संख्या समजून घेतांना त्यांचे प्रकार विचारात घेतल्यास लक्षात येईल.
🔸पदम् पुराणातील एक श्लोकानुसार...
जलज नव लक्षाणी, स्थावर लक्ष विम्शति, कृमयो रूद्र संख्यक:।
पक्षिणाम दश लक्षणं, त्रिन्शल लक्षानी पशव:, चतुर लक्षाणी मानव:।।
संदर्भ ◽( पद्मपुराण-७८।५)
अर्थात :-
🔸जलचर ९ लाख,
🔸स्थावर अर्थात वृक्ष - वेली २० लक्ष, 🔸सरीसृप, कृमि कीटक- ११ लक्ष,
🔸पक्षी/नभचर १० लक्ष ,
🔸स्थलीय/थलचर ३० लक्ष
🔸आणि उर्वरित ४ लक्ष मानवीय
एकूण प्रकार ८४ लक्ष असे आहेत.
वरील माहिती समजुन घेतली आणि हे जाणून अनमोल असा मनुष्य जन्म प्राप्त झाला असल्याने आपल्यावर असणारे जन्मजात ऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे ऋण :-
१) देव ऋण
२) मातृ ऋण
३) पितृ ऋण
४) गुरु ऋण
५) समाज ऋण
ह्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण कटिबद्ध राहावे. कारण निसर्गाच्या प्रत्येक घटक आपणास सदैव खडतर जीवन जगण्याचे व सुखाचे दिवस प्राप्त करण्याचे अखंडित मार्गदर्शन करीत असतात.
१) सूर्य रोज अस्ताला जातो. पण पुन्हा नव्याने सकाळी उदयाला येतो.
२) अमावास्या अंधार घेऊन आली म्हणून पौर्णिमा उजेड देणे बंद करीत नाही.
३) कृष्णपक्षात कलेकलेने लहान होणारा चंद्र शुक्लपक्षात त्याच कलेकलेने मोठा होऊन सृष्टीला अमृत प्रकाश प्रदान करतो.
४) समुद्राला ओहोटी आहे तशीच आनंदाची भरतीही आहे. किना-याला भेटण्याची त्याची आस वर्षानुवर्षे जीवंतच आहे.
५) ग्रिष्माची काहिली सहन केली तरच वसंताचा स्पर्श आपणास अनुभवता येईल हे वृक्ष - तरुंना चांगलेच कळते. म्हणूनच ते पानगळती स्विकारतात कारण त्या शिवाय हिरवाई शक्यच नाही. हे त्यांनाही कळते.
६) माठ थेंबाथेंबानी पाझरतो, तेव्हाच त्यातील जल शितल होते. व त्याला अनंत हातांचा स्पर्श घडतो. उष्णोदकाला कोण प्राशन करील?
७) सागर, सरोवर, नदी-तलाव यातील पाणी सूर्यकिरणांची तप्तता सहन करते, तापते, तेव्हा त्याची वाफ बनते. त्यातून बनतो मेघ. मेघ जलाभिषेक करतात तेव्हाच सृष्टीचा सर्जनोत्सव सुरु होतो.
८) उन्हाच्या झळा सोसून भेगाळले तरच मृगसरी प्राशन करता येईल. ही वेडी आस घेऊन भूमी दरवर्षीचा ताप सहन करतेच ना?
९) गढूळ पाण्याचा पूर आल्याशिवाय नदीपात्रालाही पुर्णत्व लाभत नाही. हे कसे विसरता येईल.
१०) सकाळ आहे त्यानंतर दुपार आहेच, दुपार नंतर संध्याकाळ आहेच, रात्री नंतर दिवस उगवणारच आहे. हे आपण नाही समजणार तर कोण समजून घेईल.?
११) जन्म आहे हे खरे.. पण ती प्रत्येकाला मरणही आहे. मरण आहे म्हणून सृष्टी चक्र थांबले का?
या समस्त गोष्टी आपण समजून घेतल्या तर हा मनुष्य जन्म नक्की गोड होईल. व कोणीही आत्महत्या करण्यास धजावणार नाही.म्हणूनच हे सद्गमानवांनो
सुखी जगा.इतरांनाही सुखाने जगु द्या, कोणालाही काया, वाचा, मनाने दुखवू नका. दुःख हलके करण्यासाठी खूप हसा. हसवत रहा.!
संदर्भ :- १)क्या करे, क्या न करे? (आचार संहिता) राजेंद्र कुमार धवन
प्रकाशक- गीताप्रेस, गोरखपूर २७३००५(१३ वी आवृत्ती )
◽प्रा.पुरूषोत्तम पटेल,
मुं.पो.म्हसावद
ता.शहादा जि.नंदुरबार
भ्रमणध्वनी :- ८२०८८४१३६४