पवित्र स्मरण -
मृत्यूला हसत हसत आलिंगन देणारा महाराष्ट्राच्या मातीतील थोर क्रांतिकारक - शहिद शिवराम हरी राजगुरु.
भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वांपैकी एक होय. जीवाची पर्वा न करता इंग्रजांच्या नाकी नऊ आणणा-या या थोर क्रांतिकारकाची ‘शहिदगाथा’!
‘ शिवराम हरी राजगुरू ’ ! लहानपणी त्यांना ‘रघुनाथ’ या नावाने ओळखले जात. राजगुरू म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र!
२४ ऑगस्ट१९०८ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड गावात त्यांचा जन्म झाला. त्यांना अचूक नेमबाजी आणि दांडगी स्मरणशक्तीचे वरदान होते. त्यातूनच त्यांच्या बुद्धीला खाद्य पुरवले जात असे .
वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी घर सोडल्यानंतर. सर्वप्रथम नाशिकला काही काळ वास्तव्य केले. नंतर शिक्षणाच्या उद्देशाने ते काशीला पोचले. तेथे पुस्तकांत, राजकीय वातावरणात आणि व्यायामशाळेत लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या खेळात ते रमून गेले.त्याकाळी काशी येथील पंडीत मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हे साऱ्या क्रांतिकारकांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जायचे. तेथे अनेक गुप्त खलबतेही होत असतं. याच काळात काशीमध्येच राजगुरूंची भेट चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत झाली. राजगुरूंचे निडर व्यक्तिमत्त्व पाहून आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामील करून घेतले. त्या क्रांतिमय वातावरणात वावरताना राजगुरूंमधील क्रांतिकारक घडत गेला. कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असतं. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती.
पुढे राजगुरूंनी केलेली अजून एक जबरदस्त कामगिरी म्हणजे सॉंंडर्सचा वध होय. पंजाबकेसरी लाल लजपतराय यांच्यावर निर्दयीपणे लाठीहल्ला करून त्यांना ठार मारणाऱ्या पोलीस अधिकारी स्कॉटला जगण्याचा अधिकार नाही अशी गर्जना करीत भगतसिंगांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला. राजगुरूंनी हट्ट केल्यामुळे भगतसिंगांनी त्यांना देखील आपल्या बरोबर सामील करून घेतले. त्यांचा अजून एक साथीदार जय गोपाळ पोलीस स्टेशनवर स्कॉटच्या हालचालीवर पाळत ठेवून होता. पण ४-५ दिवस स्कॉट त्या भागात आलाच नाही.
अखेर दुसऱ्या दिवशी एक गोरा अधिकारी डॉ पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. जय गोपाळला वाटले की हाच स्कॉट आहे, म्हणून त्याने दबा धरून बसलेल्या भगतसिंग आणि राजगुरूंना खुण केली. पण भगतसिंगांनी हा स्कॉट नसावा अशी प्रतिक्रिया दिली, परंतु राजगुरूंचं त्यांच्याकडे लक्षच नव्हते. भगतसिंगांनी नकार देण्यापूर्वीच राजगुरूंनी त्या गोऱ्या अधिकाऱ्यावर गोळी झाडली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भगतसिंगांनी सलग आठ गोळ्या झाडत त्या गोऱ्या अधिकाऱ्याला यमसदनी धाडले. त्या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यात मात्र ते यशस्वी झाले. नंतर दोघांनाही कळले की तो स्कॉट नसून सॉंंडर्स होता. माणूस चुकला पण मोहीम अयशस्वी राहिली नाही यातच भगतसिंग आणि राजगुरू या दोघांनीही समाधान मानले.
इकडे मारेकऱ्यांच्या मागावर पोलीस हात धुवून लागले होते, पण शेवटी वेषांतर करून भगतसिंग आणि राजगुरू दोघेही दिवसाढवळ्या एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले. पुन्हा काशीत परतल्यावर राजगुरू उघडपणे वावरू लागले. लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यांच्यात मिसळू लागले. परंतु फार काळ ते पोलिसांना गुंगारा देऊ शकले नाहीत आणि १९२९ सालच्या सप्टेंबर महिन्यात ते पोलिसांच्या हाती लागले.
त्यांनी साथीदारांची नावे सांगावीत म्हणून कारागृहात त्यांचा अमानवी छळ करण्यात आला. शेवटी छळ करणारे थकले पण राजगुरूंनी त्यांना आपल्या साथीदारांच्या नावाची साधी पुसटशी कल्पनाही येऊ दिली नाही. यावरून त्यांची निष्ठा दिसून येते.
पुढे कारावासात शिक्षा भोगत असताना भगतसिंग आणि सुखदेव या आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांची पुन्हा भेट झाली. तेथेही त्यांनी आपलं क्रांतिकारी बाणा ढळू दिला नाही. अखेर लाहोर खटल्याचा निकाल आला आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये २३ मार्च, इ.स. १९३१ ला संध्याकाळी ७.३३ वाजता फासावर चढवण्यात आले आणि तीन पेटत्या निखाऱ्यांची धग विझली. त्यांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस आपल्याकडे शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.
स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ आणि केवळ देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतिपर्वात सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या राजगुरु नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला त्रिवार मानाचा मुजरा!!!
🔹प्रा.पुरूषोत्तम पटेल
Mhasawad.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा