Kaayguru.Marathi

शनिवार, ऑक्टोबर २०, २०१८

तोरणमाळ :खान्देशी सौदर्याची माळ

     तोरणमाळ : खान्देशी सौदर्याची माळ
    नंदुरबार जिल्ह्याच्या व शहादा तालुक्याच्या उत्तरेस असलेल्या सातपुडा आणि जिल्ह्याच्या पूर्वेस वाहणारी सूर्यकन्या तापीनदी ही खान्देशच्या इतिहासाची दोन जिवंत साधने आहेत. सूर्यकन्या तापीचा उल्लेख पुराणात सापडतो, तसाच सातपुड्याचा उल्लेखही महाभारत व रामायण या महाकाव्यात सापडतो. यावरून या दोहोंचा प्राचीनतेची कल्पना लक्षात येते. सातपुड्याच्या विचार केल्यास महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर हा पर्वत विस्तारला आहे. या मध्यकालीन पर्वताचे आयुष्य तेरा कोटी वर्ष असल्याचे संशोधकांचे मत आहे.
    पर्वताच्या एकामागे एक अशा सात रांगा असलेल्या सातपुड्याची पूर्व-पच्छिम लांबी ७२५ कि.मी. आहे, तर उत्तर-दक्षिण रुंदी साधारणत: १२ कि.मी. आहे. पच्छिमेस गुजरातमधील भडोच जिल्ह्यातील राजपिपला या गावाजवळील टेकड्यापासून या पर्वतमालेची सुरवात होते. या पर्वतरांगा लहानमोठ्या प्रमाणात एकमेकांना समांतर खेटून आहेत. सातपुड्यात तीन शिखरे आहेत. सर्वाधिक उंचीचे गुलीअंबा हे शिखर गुजरात हद्दीत येते. अस्तंबा हे दुसऱ्या क्रमांकाचे  तिसरे तोरणमाळ हे एक शिखर. ही दोन्ही महाराष्ट्रात येतात. तोरणमाळ हे या पर्वतीय प्रदेशात असून ते एक पर्वतांतर्गत पठार आहे. या पठाराचे क्षेत्रफळ ३.२ चौ.मै. इतके आहे. लहानमोठी असंख्य शिखरे, कडा, दरी, स्तर इ. या पर्वतरांगात आढळतात. तोरणमाळ हा भाग दुरस्थ क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हे सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून १०७६ मी. उंचीवर उत्तर अक्षांश २१ अंश ५३ मिनिट आणि पूर्व रेखांशावर ७४ अंश ४२ मिनिट असे वसले आहे. तोरणमाळ हे ता. धडगाव जि. नंदुरबार म्हणून परिचित आहे.
    तोरणमाळचे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हे दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून शासनदरबारी ओळखले जाते. तेवढेच ते पर्याटकांसाठीही मोहक आहे. नंदुरबार या जिल्हा मुख्यालयापासून ते ९५ कि.मी. आणि धुळे येथून १४० कि.मी. अंतरावर आहे. तोरणमाळला जाण्यासाठी नंदुरबारकडून किंवा धुळ्याकडून येतांनाही शहादा हा मध्यवर्ती थांबा लागतोच! शहादा तोरणमाळ हा पक्क्या स्वरूपाचा रस्ता असून राणीपूरपासून घाटरस्ता प्रारंभ होतो. शहाद्याहून लोणखेडा-जुनवणे-म्हसावद- कुबेर हायस्कूल-राणीपूर-नागझरी-कालापाणी  ते तोरणमाळ अशा मार्गाने पोहचता येते. येथे जाण्या-येण्यासाठी दररोज  शहादा आगारातून नियमित एस.टी. बसेस आहेत. खाजगी वाहनांनी देखील जाता येते.तोरणमाळला जातांना पर्वतरांगा ,पर्वत पठार ,आणि घाटरस्ता मार्गक्रमण करतांना पर्यटकांचा थकवा सहजच नष्ट होतो.घनदाट  व उंच उंच वृक्ष ऊंच ऊंच शिखरे, त्यावरुन लोळणारे मेघांचे लोट पाहून कवी कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती ओठांवर रुंजी घालू लागतात.
“आकाशातुन घनश्याम आळविती धरणीला
आणि सखीच्या गळा घाली मोत्यांची माळा ” हे अनुभवता येते.म्हणूनच तोरणमाळ येथे जाण्यासाठी वर्षातील वर्षा ऋतु मनमोहक आहे. पण.. इतर कोणताही दिवस पर्यटनासाठी योग्यच आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडे आस्वादक दृष्टी असली तर येथला कण अन् कण आणि प्रत्येक श्वास आनंददायी ठरतो. .सातपुड्याकडे  बघताना त्याची उंच उंच शिखरे जणू त्याचा दिलदार रुपाची आपल्याशी चर्चा करू लागतात .
    शहादा तालुक्याची हद्द संपताच तोरणमाळच्या  वाटेवर प्रथम भेटतो ; तो सातपायरी घाट.एकेका पायरीने सात घाट वळणं घेत मार्गक्रमण करताना होणारा आंनद शब्दातीतच ! हा प्रत्यक्ष अनुभवावाच. सातपायरी घाट चढल्यावर डाव्या बाजूवर दर्शन होते ते येथील पुरातन लेणीचे व त्यातील नागार्जुनाचे.ही देवता हिंदू जैन आणि बुद्ध या तिनही धर्मवीचारात दिसते. मूर्तीची भव्यता आणि शिल्पाची प्राचीनता आपल्याला इतिहासात घेवून जाते.येथेच थांबून सातपायरीघाटाचे विहंगम दृश्य पाहण्याचा  आंनद लुटता येतो.हे दृश्य डोळ्यात साठवून पुढे गेल्यावर उजव्या हातावर साधारणतः सात कि.मी.अंतरावर जालंन्धरनाथाचे भग्नावषेशातील मंदिर आहे. या ठीकानीच तोरणमाळ किल्यातील भव्य परंतु भग्न तटाचा रुंदीची प्रचीती येते. येथेच अभिरराजा युवानाश्व हा महाभारतकालीन राजा राज्य करीत होता. तो न्याय नितीचा वाली असून कौरवांचा बाजूने न लढता पांडवाचा बाजूने लढला होता असे या परिसरात म्हटले जाते. थोडं पुढे गेल्यावर ज्या शिखराने तोरणमाळला त्याचा नावाची ओळख व अस्तित्वाची ओळख करून दिली ,ते तोरणाईदेवीचे शिखर व तेथील मंदिर  दृष्टोत्पतीस पडते. नंतर भेटीची साद घालतो; यशवंत तलाव आणि गोरक्षनाथ मंदिराचा प्रसन्न व मोक्षदाई परिसर. येथे नवनाथांपैकी गोरक्षनाथ-मच्छीन्द्रनाथ यांचे वास्तव्य होते. हे पाहिल्यावर तोरणमाळचा खरा अनभिषिक्त सम्राट भगवान शंकरच असावेत ,असे जाणवते. याच भक्ती आसक्तीतून येथे  दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रोत्सव होतो. यावेळी आदिवासी स्त्री-पुरुषांची वेशभूषा त्यांचे दाग-दागिने त्यातून निसर्गविषयक साकारलेल्या कल्पना यांचे दर्शन घडते महाराष्ट्रासह गुजराथ, मध्यप्रदेश या तीनही राज्यातून भाविक भक्त लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतात. हा भक्ताचा मेळा श्रद्धा - भक्ति - विश्वास यांचा संगमात मनसोक्त न्हाऊन धन्य होतांनाचा भाव प्रत्येक चेह-यावर दिसून येतो.
    भगवान चंद्रमौळी व गोरक्षनाथांचा दर्शनानंतर खुणावतो यशवंत तलाव ! महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हान यांनी या ठिकाणी भेट दिल्याची आठवण म्हणून तलावाला दिलेले हे नाव तोरणमाळच्या रुंद छातीवर करुणा, स्नेह आणि बलिदान या तीन पवित्र मूल्यांचा संगम म्हणजे हा यशवंत तलाव. अतिशय विस्तीर्ण, स्वच्छ, आणि अखंड जलसाठा असलेला, दोन्हीकडे उंच टेकड्यांच्या आत सुरक्षित कडेवर असलेला नैसर्गिक तलाव होय. वनविभागाच्या माहितीनुसार त्याची खोली ९.२० मी. असून पाणी साठवण क्षमता ३५०० टी.एम.सी. आहे. तलावाचा परीघ ४ कि.मी. असून त्याला प्रदक्षणा घालण्याचा आनंदही लुटता येतो. याशिवाय येथे बोटिंगचा आनंदही घेता येतो.
    जवळच तोरणमाळ हिल रिसोर्ट आहे. त्याजवळच खडकी पॉईंट आहे. येथून सातपुड्याचे विहंगम दृश्य डोळ्यात साठविता येते. हिल रिसोर्ट पासून एक कि.मी अंतरावर सनराईज पॉईंट असून तेथून उगवत्या सूर्याच्या साक्षीने नवनवे संकल्प करता येतात. संपूर्ण जगाला चैतन्याचा थरार देणारा रविकिरण येथूच अनुभवने म्हणजे एक आनंदोत्सवच ! हिल रिसोर्ट पासून सुमारे दिड कि.मी. अंतरावर सनसेट पॉईंट असून अस्तंगत होणाऱ्या सुर्याला अभिवादन करून प्रकाशाचा वसा थोडासा कवडशासारखा आपल्या हृदयात जपता येतो.
    तोरणमाळच्या माथ्यावर ईशान्य कोपर्‍यात एक खोलदरी आहे. या दरीची खोली सुमारे १०० ते १२५ फुट आहे. हिलाच सिताखाई पॉईंट असे म्हणतात. ही खाई तीनही बाजूंनी प्रचंड पाषाण व उंच-उंच तासीव कड्यांनी वेढलेली असल्याने नयनरम्य भासते. खाईच्या तळाला एक कुंड  असल्याचे सांगितले जाते. त्याला सिताकुंड म्हणतात. सिताखाईच्या ठिकाणी पाऊसाळ्यात मोठा फेनिक धबधबा पाहता येतो. शिवाय येथे उभे राहून आवाज दिल्यास आवाजाचे प्रतिध्वनी तीनवेळा ऐकू येतात. याला इकोपॉईंट म्हणतात. सिताखाई जवळच कमळाचे एक तळे आहे. त्याला कृष्ण तलाव म्हणतात. तेथे उमलणारी पांढरी व गुलाबी रंगाची कमळपुष्प पर्यटकांना आकर्षित करतात.ते पाहण्याचा अनूभव काही औरच..!
    तोरणमाळ येथे १९व्या शतकाच्या पहिल्या दशकाअखेर उभारण्यात आलेली चर्च आहे. चर्चचे भव्य रूप बघून बुद्धी थक्क होते.  जाण्यायेण्यासाठी रस्ता किंवा साधने नसतांना चर्चचे बांधकाम चिरेबंदी दगडात  कसे केले असेल हा स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरावा. अनाकलनीय गोष्ट प्रयत्नपूर्वक मूर्त रूपात स्थापित करणाऱ्या वास्तूनिर्मिकाला अभिवादन केल्याशिवाय राहवत नाही.
    तोरणमाळचे एक प्राकृतिक वैशिष्ट म्हणजे हे जंगल कोरडे जंगल प्रकारात मोडते. म्हणून रखरखत्या उन्हाळ्यात येथील वृक्षराजी पर्णहीन होते व हवेच्या तालावर कोरडी पाने जणू विविध सप्तसूर आळवतात. पण .... चैत्रातील नवपल्लविने संपूर्ण दऱ्या खोऱ्या नव लेणं घेऊन नटून येतात.व मानवाला जणू उपदेश करतात, नवनिर्मितीसाठीच आम्ही हा त्याग करीत आहोत. तूही आमच्या सोबतीला ये! आणि कवी मंगेश पाडगावकरांची कविता आठवू लागते.
        “ या जन्मावर या जगण्यावर
               शतदा प्रेम करावे…! ”
    तोरणमाळच्या  रानात सलई, महू, चारोळी, टेंम्भूर्णी, तिवस, कुडा, खैर, जांबूळ, आवळा, आंबा, सीताफळ, बोर, भेडा , पळस आणि साग,बांबू इ. वृक्ष दिमाखदारपणे उभे असलेले पाहता येतात. चैत्र पालवीने लालबुंद झालेला पळस पाहतांना वाटू लागते की  जणू लाजेने लालीलाल झालेली नववधूच येथे उभी असावी! पळसाचे पर्णरहित फुलणे बघून जन्माचे सार्थक झाल्याचा आनंद मिळतो. वृक्षसंपदा बरोबरच येथे कारवी , धायटी, तोरण , करवंद अशी विविध झुडूपेही तसेच विविध प्रकारचे औषधी वनस्पती ,कंदमुळे आढळतात. यांचे संवर्धन करण्यासाठी वनविभागाने औषधी वनस्पती , कंद व फुले संवर्धन केंद्र सुरु केले असून तेथील विविध रंगी गुलाबाची फुले मनमोहक ठरतात.
तोरणमाळचे जंगल पक्षी संपदेनेही समृद्ध आहे. येथे एकूण २३३ प्रजातीचे पक्षी असल्याचे नोंद वनविभागाकडे आढळते. शिवाय हवामान आणि मनुष्य स्वभावाच्या वेडातून नामशेष होत असलेला एक पक्षी म्हणजे वनपिंगळा.जगभरात वनपिंगळ्याचा ३३प्रजाती आढळतात.पैकी येथील जंगलात त्यांचा ९ जाती आढळून आल्याची नोंद बाॅबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पक्षी तज्ज्ञांनी केली आहे. हा पक्षी केवळ सातपुडा पर्वतराजीत तोरणमाळ जंगलात, आणि मेळघाटच्या जंगलात, ओरिसाच्या जंगलात सापडतो. . हा पक्षी निशाचर नसून दिवसा भ्रमंती करतो. त्यालाही अनुभवणे म्हणजेच जागतिक लेणं अनुभवल्याचा आनंद पक्षी निरीक्षकांना मिळतो. दरवर्षी हिवाळ्यात येथे हिमालयातील ब्लॅक रेड स्टार , वारवब्लर आणि इतर बरेच पक्षी नियमित नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येतात व एप्रिल मे अखेर परतीच्या मार्गाला असतात. विदेशी पक्ष्यात प्रामुख्याने युरोपियन रोलर, हेन हॅरीयर, पेल हॅरीयर, ग्रे वॅगटेल, ग्रीन सॅडे पायपर इ. युरोपियन देशातील सायबेरीयातून हे पक्षी तोरणमाळला पाहुणे येतात.पक्षी अभ्यासकाना हे सारे काही संशोधनासाठी उपयुक्त खजिनाच होय . तोरणमाळ येथील निसर्गसौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना विश्रांती व सुविधा देणारे ठिकाण म्हणजे वनविभागाचे विश्राम गृह होय. त्या शिवाय दुसरे तोरणमाळ हिल रिसोर्ट होय. रिसोर्टद्वारा लाकडीफळीपासून आकर्षक पद्धतीने तयार केलेली मोबाईल घरे पर्यटकांना सुखावतात. खास सुविधा म्हणून अमरविला हा सुट बनविला आहे. तसेच प्राचीन आश्रमपद्ध्तीचा आनंद अनुभवन्याकरिता ऋषीमुनीच्या जीवनपद्धतीची व्यवस्था केली आहे.
सातपुड्याचे रुप मुळातच रौद्र असे आहे. हा शुरांचाही भूभाग म्हणून इतिहासाला परिचित आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणारा नेमाडातील स्वातंत्र्यदेवीचे उपासक, स्वातंत्र्यवीर तंट्या भिल ह्याच सातपुड्यात भूमिगत राहून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कार्य करीत होते. हे आपणास विसरता येणार नाही. ह्या स्वातंत्र्यवीराच्या पदस्पर्शाने पावन भूमीत फिरण्याचा अभिमान आपणास अनुभवता येतो.
तोरणमाळ (ता.धडगाव ,जि.नंदुरबार) हे पर्यटनाचे ठिकाण आबाल स्री-पुरुषांना वेड लावणारे, नियमित भेटीची ओढ निर्माण करणारे, निसर्गसौदर्याने नटलेले,खान्देशातील एकमेव गिरीस्थान. महाराष्ट्राचे पर्यटनाचे दुसऱ्या क्रमाकाचे थंड हवेचे ठिकाण.
सातपुड्याचा कुशीत, नंदुरबारच्या प्राकृतिक चेहरा खुलविणारे, वनउपजांनी व विविध वृक्ष-लतानी वेढलेले निसर्गाचे आवडते व मुक्त हस्ताने आनंदाची उधळण करणारे,
आल्हाददायक .ठिकाण तोरणमाळ...!
तोरणमाळला जाताना सातपुड्याचा चार रांगातून, घनदाट जंगलातून, वेडावाकड्या वळणातून सात घाट चढतांना निसर्गाचे नयनमनोहर दृश पाहून आनंदाने वेडावून टाकणारे रम्य   तोरणमाळ...!!!
नक्की या हं ..! तोरणमाळ प्रतिक्षा करते आहे. आपल्या आगमनाची !
( लेखकाच्या खाली दिलेल्या ब्लॉगवर वाचा तोरणमाळचे काव्यात्मक सुंदर वर्णन : माझे तोरणमाळ ही कविता.)
     शब्दसौदर्य :-  प्रा.पुरुषोत्तम पटेल,               उपप्राचार्य,                               
कुबेर हायस्कूलउच्च माध्यमिक
विद्यालय म्हसावद, ता.शहादा
जि. नंदुरबार   ४२५४३२
मोबा  : ८२०८८४१३६४,
          इ-मेल- patelpm31@gmail.com
          Blog- mhasawad.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...