जग हे धावपळीचे
भान असू दे मानवा
व्हावे पथदर्शक तू
शोध आता मार्ग नवा ।।१।।
धन द्रव्य संचयासी
नको करु मनःस्ताप
अंत काळी पुरे तुला
तीन मिटरचे माप ।।२।।
जन्म धन्य करावया
व्यर्थ नको धावाधाव
घे तू हाती एक शिळा
लिहावया तुझे नाव ।।३।।
आला तू रिकाम्या हाती
जाशीलही तू रिकामा
राम नामाचा मोत्यांनी
जागा लाभे निजधामा ।।४।।
पदस्पर्श होता तुझा
व्हावी प्रफुल्लित माती
जिव्हाळ्याचा प्रकाशाने
उजळून यावी नाती ।।५।।
जीव येथला करितो
धडपड जगण्याची
ऐसे व्हावे कर्म थोर
आस लागो मिलनाची ।।६।।
समजून घे तू एक
देवाने दिले वरदान
ओंजळीत येई तेच
तव भाग्याचे हे दान ।।७।।
प्रभातीचा सूर्य पहा
रोज येई नवा नवा
विसरुन क्लेश ताप
तम जाळी एक दिवा ।।८।।
फुला परी परिमळ
जगा अर्पित करावे
घेता निरोप जगाचा
तू किर्ती रुपी उरावे ।।९।।
क्षणोक्षणी येथे भेटे
कामा पुरते मामाजी
कुणी न् भला चांगला
खरा एक श्रीरामजी ।।१०।।
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "