Kaayguru.Marathi

रविवार, सप्टेंबर २७, २०२०

तोरणमाळ : खान्देशाच्या सौंदर्याची माळ

तोरणमाळ: खान्देशाच्या सौंदर्याची माळ

 दिनांक २७ सप्टेबर हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो.त्यानिमित्त महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ असा लौकिक असलेल्या तोरणमाळची ही गाथा ….   

 महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील ,शहादा तालुक्याच्या उत्तरेस असलेल्या सातपुडा आणि जिल्ह्याच्या पूर्वेस वाहणारी सूर्यकन्या तापी नदीच्या उल्लेख पुराणात सापडतो.तसाच सातपुड्याचा उल्लेखही महाभारत व रामायण या महाकाव्यात सापडतो.यावरुन ह्या दोहोंचा प्राचीनतेची कल्पना लक्षात येते.सातपुडा पर्वताचा विचार केला तर, महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवर हा पर्वत विस्तारला आहे.हा मध्यकालीन पर्वत असून त्याचे आयुष्य तेरा कोटी वर्ष असल्याचे संशोधकांचे मत आहे.

     सातपुड्याच्या एकामागे एक अशा सात रांगा असलेल्या सातपुड्याची पूर्व-पश्चिम लांबी ७२५ कि.मी.आहे.तर उत्तर-दक्षिण रुंदी साधारणत: १२ कि.मी आहे.पश्चिमेस गुजरातमधील भडोच जिल्ह्याच्या राजपीपला ह्या गावाजवळील टेकड्यापासून या पर्वतमालेची सुरुवात होते.ह्या पर्वतरांगा लहान-मोठ्या आकारांनी  जणू एकमेकांना समांतर खेटून उभ्याआहेत.जणू सात बहिणी एकमेकांना मिठी मारुन आपले सहोदरत्व सिद्ध करताहेत असे वाटावे.

     सातपुड्याची तीन शिखरं आहेत-

१) गुलीअंबा - हे  सातपुड्याचे सर्वाधिक उंचीचे  प्रथम क्रमांकाचे शिखर.हे गुजरात हद्दीत येते.

२) अस्तंबा - हे दुस-या क्रमांकाचे शिखर.हे महाराष्ट्राच्या हद्दीत येते.

३) तोरणमाळ - सातपुड्याच्या कडेवरील हे तिसरे शिखर . हे देखील महाराष्ट्राच्या हद्दीत येते. 

ही तीनही शिखरे म्हणजे सातपुड्याची काया,वाचा आणि मन होत.

    तोरणमाळ हे पर्वतीय प्रदेशात असून ते एक पर्वतांतर्गत पठार आहे.त्याच्या पलीकडे उत्तरेला नर्मदा अहोरात्र स्तुतीसुमने आणि ऋ्चा गायन करीत आहे.तोरणमाळ पठाराचे क्षेत्रफळ ३.२ चौरस मैल एवढे भरते.शिवाय सातपुड्याच्या कुशीत असंख्य शिखरे,कडा,दरी,स्तर इत्यादि विसावली आहे.तोरणमाळ हे दुरस्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते.हे सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत असून समुद्रसपाटीपासून ११४३ मिटर उंचीवर , 

उत्तर अंक्षाश २१  ५२ ' ४८ " आणि 

पूर्व रेखांश ७४ ° २७ '  ३६ " अशी भौगोलिक स्थाननिश्चिती आहे.तोरणमाळचे वैशिष्ट्य म्हणजे ते धडगाव तालुक्यात समाविष्ट आहे.पण...इथे जाण्यासाठी धडगावहून आजतरी सरळ रस्ता नसून म्हसावद (ता.शहादा) मार्गावरुनच जावे-यावे लागते.

     तोरणमाळचे  शासकीय विशेष म्हणजे हे महाराष्ट्र राज्याचे दुस-या क्रमांकाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून शासन दरबारी ओळखले जाते.अगदी पर्यटकांना भूरळ घालणारे असे हे स्थान ; नंदुरबार या जिल्हा मुख्यालयापासून ९५ कि.मी.अंतरावर ,धुळे येथून १४० कि.मी.अंतरावर आहे.तोरणमाळला पोहचण्यासाठी नंदुरबार किंवा धुळे येथून  एस.टी.किंवा खासगी वाहनाने येणे हाच एकमेव पर्याय आहे. दोन्ही जिल्हा मुख्यालयावरुन येतांना शहादा हा मध्यवर्ती थांबा लागतोच.तो अटळ होय.शहादाहून म्हसावद हा १५ कि.मी अंतरावरील दुसरा अटळ थांबा लागतोच !  शहादाहून येतांना लोणखेडा-दराफाटा- नवलपूर-आवगे-म्हसावद-कुबेर हायस्कूल-इस्लामपूर-राणीपूर-कालापाणी-आणि तोरणमाळ असे सुमारे ५७ कि.मी चे अंतर पार केल्यावर तोरणमाळ येथे पोहचता येते.

    मध्यप्रदेशातून येतांना खेतीया मार्गे येऊन रायखेड गावाच्या पुढे दोन कि.मी.अंतरावरुन ऊजव्या दिशेने वळण घ्यावे.तेथून सुलतानपूर-सुलवाडा-म्हसावद- येथे यावे.म्हसावद येथून तोरणमाळला जाता येते.शहादा,नंदुरबार,धुळे एस.टी आगारातून दररोज एस.टी.बस सुरु आहे.

   म्हसावद (ता.शहादा) येथून तोरणमाळ जाण्यासाठी पक्का डांबरी सडक आहे.राणीपूर येथून घाटरस्ता प्रारंभ होतो.तोरणमाळला जातांना पर्वतरांगा,पर्वत पठार,आणि पर्वतातून वाहणारे झरे ,ओहोळ , आणि पावसाच्या ऋतूमध्ये गेल्यास हिरवागार पर्वत पाहून दशदिशा जणू हिरवा शालू नेसून आपल्या प्रियकराच्या  भेटीसाठी नटून थटून उभ्या असल्याचे भासते.राणीपूरहून सुरू होणारा घाटरस्ता (सातपायरीचा घाट ) मार्गक्रमण

सातपायरीचा घाट
करतांना पर्यटक अंतर्बाह्य खुलून पूर्ण थकवाच विसरून जातो.पावसाळ्यात भेटीला जातांना घनदाट व उंच असे साग,अर्जुन  वृक्ष,उंच उंच गिरी शिखरे,त्यावरुन लोळणारे मेघांचे लोट पाहून कवी कुसुमाग्रजांंची काव्यपंक्ती ओठांवर रुंजी घालू लागते.

" आकाशातून घनःश्याम

 आळविती धरणीला

आणि सखीच्या गळा घाली 

मोत्याची माला "

असे हे निसर्गालाही वेड लावणारे तोरणमाळ कवीकुलगुरु  कालीदासाच्या मेघा ( दूत ) लाही भुरळ घातल्याशिवाय राहिले नसावे.तो मेघ तोरणमाळच्या पर्वत शिखरांवरुनच सखीला संदेश घेऊन गेला असावा.असे वाटते.तोरणमाळसाठी वर्षा ऋतू मनमोहक आहे.असे असले तरी तोरणमाळ येथे कवी मंगेश पाडगावकरांच्या भावकवितेतील,

 " सहा ऋतुंचे सहा सोहळे 

येथे भान हरावे "

अनुभवता येतात .म्हणजे चैत्र-वैशाखात वसंत ऋतूच्या आगमनाने लाल,हिरवा,जांभळा रंगाच्या वृक्षपर्णाचा पिसारा फुललेला,तर जेष्ठ-आषाढात येणा-या ग्रिष्माची काहिली अनुभवता येते.श्रावण-भाद्रपदात येणा-या वर्षा ऋतूची तर गोष्टच न्यारी ! दशदिशा जणू नवोन्मेशांनी बहरलेल्या…,सर्वत्र हिरवळ,शिखरांवर लोळण घेणारे मेघ, वा-याबरोबर वाहणारे हलकेसे जलतुषार,

बालकवीची ती फूलराणी आठवू लागते.,

" स्वर्गभूमीचा जुळवित हात 

नाचनाचतो प्रभातवात "

आश्विन-कार्तिकातील शरदाचे मनमोहक चांदणे येथील यशवंत तलावात नौका विहार करुन डोळ्यात साठवता येते.जणू वाटते की

यशवंत तलाव

"  मध्यरात्रीच्या निवांत समयी

खेळ खेळते वनदेवी ही "

मार्गशिर्ष-पौषातील हेमंत ऋतूची आल्हाद देणारी हलकीशी आणि शिशिरातील पर्णगळ व वा-यावर उडणारी कोरड्या पर्णांची सळसळ जणू सप्तसूर आळवण्याचा भास व पळस वृक्षाला पर्णगळ होऊन आलेल्या लाल-केशरी फुलांचे गुच्छ जणू वसंताचा आगमनाची चाहूल देतात.असे हे सहा ऋतूंचे आगमन व सोहळे येथे अनुभवता येतात.

      येणारा पर्यटक हौशी असला तर कोणताही ऋतू मनमौजीच ! सातपुडा पर्वताकडे बघतांना त्याची उंच उंच शिखरे जणू त्यांचा दिलदार रुपाची व मोहक अदाची चर्चा करु लागतात.पर्यटकांना कायमचा एक सखा भेटतो.ह्रदयात प्रिती घेऊनच पर्यटक  पुन्हा लवकरच भेटण्याचा संकल्प घेऊन सातपुड्याच्या निरोप घेतो.

    तोरणमाळ वाटेवर जेथे शहादा तालुक्याची हद्द संपते तेथेच धडगाव तालुक्याची हद्द प्रारंभ होते.येथेच प्रथम भेटतो … सातपायरी घाट !

एकेका पायरीने घाटातील वळणं घेत मार्गक्रमण करतांना आनंद तो काय वर्णावा ? असे म्हणतात की, पुढे चालणा-याला मागचं दिसत नाही.पण तोरणमाळला जातांना सातपायरी घाट पहील्या वळणापासून तर शेवटच्या सातव्या वळणापर्यंत आपली साथसंगत सोडतच नाही.

सातपायरी घाट चढून आल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजुला दर्शन होते ते नागार्जुनाचे .ही मूर्ती एका लहानशा गुहेत असून ही देवता हिंदू-जैन आणि बुद्ध अशा तिन्ही धर्मवीचारात दिसते.मूर्तीची भव्यता आणि शिल्पाची प्राचीनता पाहून पर्यटक इतिहासात डोकावून जातोच .या स्थळी थांबून सातपायरीच्या विहंगम वळणाचे दृश्य अनुभवता येते.

पुढे गेल्यावर उजव्या हातावर साधारणतः आत सात कि.मी.अंतरावर जालंधरनाथाचे भग्नावस्थेतील मंदिर आहे.तेथून मुख्य रस्त्यावर येऊन पुढे गेल्यास मच्छिंद्रनाथ गुंफा लागते.सध्या येथे जाण्यासाठी रस्ता खराब असल्याने जाता येत नाही.पुढे चालून गेल्यावर प्राचीनकाळचा परंतु सध्या भग्न किल्ल्याचा भव्य रुंदीच्या तटाची प्रतिती येते.सध्या ह्या स्थळी वनविभागाचे कार्यालय व विश्रांती गृह आहे. ह्या किल्ल्याचा न्याय-नितिसंपन्न ,प्रजाहितैशी अभिरराजा युवनाश्व  होऊन गेला.तो महाभारतकालीन समजला जातो.कुरुक्षेत्री झालेल्या धर्मयुद्धात तो कौरवांच्या विरोधात पांडवांचा बाजूने लढला असे जुने जाणते म्हणतात.मार्गक्रमण  व गप्पा करीत पर्यटक तोरणमाळ येथे पोहचतो.ज्या शिखराने तोरणमाळला त्याचा ऐतिहासिक व पौराणिक व नैसर्गिक नावाची व अस्तित्वाची ओळख करुन दिली.ते तोरणाई शिखरं येथून दृष्टोत्पत्तीस पडते.येथे देवी तोरणाईचे मंदिर असून शिखरं चढतांना व उतरतांना मज्जा व भिती दोघांचीही अनुभूती येते.

तोरणाईचे दर्शन झाल्यावर भेटीची साद घालतो... गोरक्षनाथ मंदिराचा प्रसन्न व मोक्षदाई परिसर.येथे नवनाथांपैकी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ यांचे वास्तव्य होते.असे मानले जाते. नाथसंप्रदायातील  ह्या दोन महामेरुंचे दर्शन घेतल्यावर , तोरणमाळचा खरा अनभिशिक्त परमेश्वर  चंद्रमौळी श्रीमहादेवच असावेत याची मनोमन खात्री पटते व आपसूकच सश्रद्ध 

भावे नतमस्तक व्हावेसे वाटते.ही दृढ श्रद्धा व भक्ती पिढ्यानपिढ्या येथे दरवळत असून त्याच प्रितभावनेतून येथे दरवर्षी महाशिवरात्रीला महायात्रोत्सव भरतो.यात्रेत महाराष्ट्र, गुजरात,मध्यप्रदेश आणि दूरदूरुन भाविक भक्ती श्रद्धेने दर्शनाला येतात.यावेळी आदिवासी समाजातील स्री-पुरुषांची वेशभूषा , त्यांचे विविध आकारांचे वजनदार दागदागिने, त्यांची बोलीभाषा , निसर्गप्रेमातून साकारलेल्या कल्पना यांचे जवळून दर्शन घडते.व तेच खरे निसर्ग पूजक असल्याचा विश्वास वाढून सुशिक्षितांचा निसर्गप्रेमाचा बेगडीपणा दिसून येतो.

     ह्यानंतर खुणावतो यशवंत तलाव ! महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ह्या स्थळाला भेट दिल्याची मोरपंखी स्मृती म्हणून तलावाला दिलेले नाव. तोरणमाळच्या रुंद छातीवर क-हाडच्या प्रिति संगमाइतकाच पावन : विश्वास, करुणा,स्नेह,आणि बलिदान हे चार पवित्र मूल्य म्हणजे चार दिशांनी आलेला चार मूल्यांचा  पावन संगमच ! क-हाडच्या प्रिति संगमाइतकाच पावन ! हा तलाव अतिशय विस्तीर्ण,स्वच्छ,तरल,आणि अखंड जलाने समृद्ध.आजपर्यत कधीही न आटलेला असा.दोन्हीकडे उंच टेकड्यांच्या आंत जणू तोरणाईच्या सुरक्षित कुशीत असलेला हा नैसर्गिक तलाव आहे. वनविभागाच्या माहितीनुसार त्याची खोली ९.२० मिटर असून जल साठवण क्षमता ३५०० टीएमसी आहे.परीघ ४ कि.मी.असून त्याला प्रदक्षिणा घालण्याचा आनंदही लुटता येतो.याशिवाय नौकानयन व जलविहार करता येतो.

   तोरणमाळ येथे पर्यटकांना मुक्कामासाठी तलावाजवळ हिल रिसोर्ट आहे . वनविभागाचे विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रांती गृह,तसेच काही खासगी विश्रांती गृह देखील भाडयाने उपलब्ध होतात.रिसोर्टजवळच काही अंतरावर खडकी पॉईंट आहे.येथून सातपुड्याचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवता येते.एक कि.मी.अंतरावरच सनराईज पॉईंट असून तेथून उगवत्या सूर्याच्या साक्षीने नवनवे संकल्प करता येतात. संपूर्ण विश्वाला

चैतन्य आणि तेजोमय थरार देणारा रविकिरण येथून अनुभवणे म्हणजे एक अहोभाग्यच ! हिल रिसोर्ट पासून सुमारे दिड कि.मी. अंतरावर सनसेट पॉईंट असून स्वत: जळून  इतरांना प्रकाश देऊन अस्तंगत    होणा-या सूर्याला अभिवादन करुन,त्याचा एक का असेना ; पण एक तरी किरण आपल्या हृदयात जपता येतो.

      सिताखाई…

तोरणमाळच्या पर्यटनातील एक अविस्मरणीय स्थळ.ही तोरणमाळच्या ईशान्य कोप-यातील एक खोलदरी होय.     तोरणमाळला गेल्यावर तोरणमाळ गावठाण पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सिताखाई पाँईटवरून दिसणाऱ्या खोल दऱ्या पाहण्यासाठी  पर्यटक गर्दी करतात. स्थानिक समजूतीनुसार रामराज्याच्या काळात श्रीराम व सीता हे रथावर जात असतांना त्यांच्या रथाचे चाक या ठिकाणी अडकल्याने भला मोठा खड्डा पडला होता. आणि त्या खड्ड्यालाच सीताखाई म्हणून ओळखले जाते.तिची खोली सुमारे १५० फूट असावी.ही खोलदरी तीनही बाजूंनी प्रचंड पाषाणाच्या व उंच उंच  जणू तासीव कडांनी निसर्गतः निर्माण झाली आहे.खाईच्या तळाला एक जलकूंड असून त्याला सिताकूंड असे गोड नाव आहे.सिताखाईत पावसाळ्यात मोठा फेनिक धबधबा उसळतो.शिवाय येथेच उभे राहून आवाज दिल्यास तिनदा आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू येतो.यालाच ईकोपॉईंट म्हणून ओळखले जाते.सिताखाईच्या अलिकडे एक तळे असून त्यात कृष्णकमळे आढळतात.त्यास कृष्णकमळ तलाव असे म्हटले जाते.

      तोरणमाळ येथे  एक चर्च आहे ती १९ व्या शतकाच्या पहिल्या दशकाअखेर बांधल्याचे म्हटले जाते.चर्चचे भव्य रुप बघून बुद्धी थक्क होते.ज्या काळात तोरणमाळ येथे जाण्या - येण्यासाठी रस्ता,व सुविधा नव्हती,त्या काळात चर्चचे भव्य बांधकाम कसे बरे झाले ? असो,हा संशोधनाचा स्वतंत्र विषय ठरेल.अनाकलनीय गोष्ट प्रयत्नपुर्वक मूर्त रुपात स्थापित करून मानवाला मनःशांतीचे साधन देणा-या वास्तूनिर्मिकाला अभिवादन केल्याशिवाय राहवत नाही.

      तोरणमाळचे प्राकृतिक वैशिष्ट्य म्हणजे ते कोरडे जंगल प्रकारात मोडते.येथील वृक्षराजी उन्हाळ्यात पर्णहिन होते.व हवेतल्या तालावर कोरडया पानांची सळसळ  जणू आर्त विराणी गाऊन वसंताला आवाहन करतात.त्याची ही आर्तता चैत्रपल्लविचे नवं लेणं नेवून नव्या जगण्याला सामोरे जाऊ लागतात.जणू ते मानवाला म्हणते, ह्या नवनिर्मितीसाठीच आम्ही ही पानगळ स्विकारली होती.आणि राजकवी तांबे आठवू लागतात ," जुने जावू द्या मरणालागूनी " 

किती मोठे समर्पण... निराश मनाला हा एक नवा संदेशच हे वन देते.आणि सूचवते,

" या जन्मावर या जगण्यावर 

शतदा प्रेम करावे …"

     तोरणमाळच्या जंगलात सलई ,साग, महू,चारोळी,टेंभुर्णी,तिवसा,कुडा,खैर,अर्जुन,आवळा,जांभूळ,आंबा,सिताफळ,पेरु,बोर,पळस,बांबू, इत्यादि वृक्ष आढळतात.चैत्र पालवीने लालबुंद झालेला पळस पाहताना वाटू लागते की, जणू लाजेने लालीलाल झालेली नवयौवना  येथे उभी आहे की काय ?

 वृक्षसंपदेसह येथील वनात कारवी,धायटी,तोरण,करवंद,इ.रानमेवा  माका ,रिठा,आणि वनवेलींची  मोहक फुले आढळतात.  या औषधी वनस्पतींचा लेगापाणी वनोद्यानात संग्रह करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून तसेच परराज्यातून अनेक संशोधक या वनस्पती उद्यानाला भेट देतात. या ठिकाणी हिरडा, बेहडा, रंगतरोडा, बायन्या, कुकडकांदा, जिरण्या, तिरकांदा, जंगलीकेळी, कुदळा, नजऱ्या यासारख्या भरपूर औषधी वनस्पती आढळतात. या वनस्पतींपासून डोकेदुखी, अंगदुखी, लकवा, मुतखडा, डायबेटीस, सर्पदंश, श्वानदंश, अपचन,कॉलरा,कॅन्सर,मलेरिया,थंडीताप,खरुज,गजकर्ण आणि शरीरातील इतर आजारावर , गाठींवर ,जखमेवर स्थानीक रहिवासी कडून इलाज केला जातो. पळसाच्या पानांपासून द्रोण, पत्रावळी बनवणे.उन्हाळ्यात तेंदु पत्ता गोळा करणे,हिवाळ्यात महूफुले गोळा करणे.या महूफुलांपासून घरगुती पद्धतीने मद्य बनविली जाते.उत्सवात,लग़्नप्रसंगी तिचा आस्वाद घेतला जातो.शिवाय महूफुलांपासून भाकरी बनवून खाल्ली जातात.

     तोरणमाळचे जंगल पक्षी संपदेनेही समृद्ध आहे.१८८० मध्ये संपादित केलेल्या खान्देश राजपत्रात येथे एकूण २९४ प्रजातींचे पक्षी आढळल्याची नोंद आहे.त्यापैकी २३३ जातीचे पक्षी येथील जंगलात आढळत असल्याचे माहिती  वनविभागाकडे आहे.शिवाय मनुष्य स्वभावाचा मौजमजा करण्याच्या उद्देशाने अणि अज्ञान आणि अंधश्रद्धेचा वेडापायी पक्षीजगतातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला एक पक्षी ठिपकेदार वनपिंगळा. हा ११३ वर्षाच्या अज्ञातवासानंतर १९९७ साली पुन्हा आढळून आला . घुबडासारखाच दिसत असला तरी  दिवसा भ्रमंती करीत असल्याने तो निशाचर नाही.या वनपिंगळ्याच्या ३३ पैकी नऊ दुर्मिळ प्रजाती तोरणमाळच्या जंगलात आढळून आले आहेत हे सर्वेक्षण पक्षीतज्ज्ञ गिरीश अविनाश जठार यांनी येथे वास्तव्य करुन केले असून त्यांचा निरीक्षणात  ग्रेट हॉर्न्ड आऊल,ब्राऊन फिश आऊल,ब्राऊन डॉक आऊल,मॉटेलवूड आऊल, ओरिएंटल स्कॉप्स आऊल, जंगल आऊलेट,पॅलिड स्पॉप आऊल,फॉरेस्ट आऊल,फॉरेस्ट स्पॉटेड आऊल आदि जातीचे वनपिंगळा असल्याची नोंद बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ऑफ इंडिया मुंबई येथील पक्षीतज्ज्ञांनी् संशोधनाअंती केली आहे.हा पक्षी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या राणीपूर आणि लेगापाणी ,केलापाणी परिसरात आढळतो.तसेच मेळघाटच्या व्याघ्रप्रकल्पातील जंगलात आढळतात. सध्या हा पक्षी महाराष्ट्राच्या राज्यपक्षी होण्यासाठी प्रस्तावीत आहे.त्यालाही अनुभवता येते.

    दरवर्षी तोरणमाळ येथे थंडीच्या काळात नियमितपणे बहूसंख्य हिमालयातील पक्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तोरणमाळ येथे येतात.त्यात हिमालयातील ब्लॅक रेड स्टार, वारवब्लर,आणि विदेशी पक्ष्यात युरोपियन रोलर,पिंटेल डक,कॉमन सॅड पाईपर,ग्रीन सॅड पाईपर, हेन हॅरीयर, पेल हॅरीयर, ग्रे वॅगटेल,व्हाइट वॅगटेल,ग्रीन सॅड पायपर,ब्लॅक रेड स्टार  हे पक्षी हजारो कि.मी.सैर करुन युरोपातील  सायबेरियातून हे पक्षी तोरणमाळला येतात.पक्षी जगतासाठी ही आनंददायी आहे. एप्रिल मे महिन्यांत परतीच्या वाटेवर निघतात.पक्षी अभ्यासकांना ह्या पाहुण्या पक्षाचा अभ्यास येथे करता येण्याची संधी तोरणमाळ देते.

     सातपुड्याचे रुप हे मुळातच रौद्र रुप आहे.हा शुरांचा,विरांचा,क्रांतीकारकांचा भूभाग म्हणून इतिहासाला परिचित आहे.स्वातंत्र्याचा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे या भूभागातील एका स्वातंत्र्ययोद्याचे नाव.इंग्रजाना सळो की पळो करुन सोडून जेरीस आणणारे नेमाडातील स्वातंत्र्यदेवीचे उपासक स्वातंत्र्यवीर तंट्या भिल हे सातपुड्याच्याच मातीतील एक तेजस्वी रत्न होत.हे या मातीत पर्यटन करतांना विसरता येणे शक्यच नाही.स्वातंत्र्योद्धा विर तंट्या भिल्ल यांचे हौतात्म्य आठवले की, आपोआपच नतमस्तक व्हावेसे वाटते.ते ह्या मातीतच !

त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर हिंडल्याचा गर्वाने ऊर फुलून येतो.

     तोरणमाळ जंगलात पदभ्रमंती करतांना

 सातपुड्याच्या कुशीतील असंख्य शिखरे,कडा, दरी ,स्तर , वृक्षवल्ली,लता, औषधी वनस्पती,कंदमुळे,फुले,फळे ,पक्षी,येथील बोलीभाषा,उत्सव आणि इतिहास आपल्याला साद घालतो.

तोरणमाळ (ता.धडगाव,जि.नंदुरबार-महाराष्ट्र ) महाराष्ट्रातील द्वितिय क्रमांकाचे  थंड हवेचे हे पर्यटनस्थळ .  सात पायरीचा घाट रस्त्यातून वळणावळणाचा मार्गक्रमणाचा आनंद देणा-या वाटेवरील,आबाल स्त्री पुरुषांना वेड लावणारे, निसर्गाच्या वरदहस्तांनी समृद्ध असलेले, आणि नंदुरबार जिल्ह्याच्या लौकिक वाढविणारे,खान्देशाचा मुकूटमणी,असे हे तोरणमाळ सातपुड्याच्या कुशीत विसावलेले,विविध वनौषधींनी युक्त,वृक्षवेलींनी सुशोभित , संरक्षित पर्यावरणाचा वारसा जपत आपल्या स्वागतासाठी आतूर आहे.

    नक्की या हं ! मी तोरणमाळ... तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारे सर्व पॉईंट म्हणजे माझी लेकूरवाळे , माझ्या अंगाखांद्यावर घेऊन मी तुमची आतूरतेने प्रतिक्षा करते आहे.तुमच्याशी प्रित,स्नेह,ममत्त्व,आणि जिव्हाळ्याने संवाद साधायला माझ्या लेकरांसह मला खुपचं  आवडते.तुमच्या भेटीने माझे मन प्रफुल्लित होते. मी आतूरतेने तुमची चातकाप्रमाणे वाट पाहते आहे.मला विश्वास आहे ,  माझी प्रेमळ साद ऐंकूण तुम्ही नक्की याल ! मी , तोरणमाळ .

तुमच्याच आगमनाच्या प्रतिक्षेत…!

© प्रा.पुरुषोत्तम म.पटेल, 

उपप्राचार्य,

कुबेर कला-विज्ञान ज्युनिअर कॉलेज,

मु.पो.म्हसावद,ता.शहादा,

जि.नंदुरबार, महाराष्ट्र -४२५४३२

भ्रमणध्वनी-९४२१५३०४१२

८२०८८४१३६४




 






 



 




Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...