माझे बाबा
बाबा आता खूप थकला तुम्ही
थांबा न आराम करा आता
माझंही थोड ऐका...
तुमच्या चरणी ठेवितो माथा ||१||
माहिती आहे बाबा मला
सुंदर तुमच्या जीवनाची गाथा
सहस्र सहस्र पानांची होईल
तुमच्या कर्तृत्वाची एकेक कथा ||२||
बाबा,तुम्हीच तर हात दिला मला
बालपणी चालतांना पडलो जेव्हा
शाळेची फी भरावी म्हणून तुम्ही वापरली
सदरा-ईजार ठिगळ लावून तेव्हा ||३||
स्वतःच्या मौजमजेला बाजूला केलं
जे हवं ते सारं मला दिलं
आजही फिटली नाही बाबा
माझ्यासाठीची खर्च उधारीची बिलं ||४||
मला आजही आठवतात बाबा
माझ्या आजारपणाचे ते... दिवस
आईला धिर देत तुम्ही बसले
उशाशी माझ्या रात्रंदिवस ||५||
बाबा, लहानपणी माझा हट्टापायी
तुम्ही हत्ती न् घोडा व्हायचे
अन्... पाठ दुखेपर्यंत
मला अख्खा वाडाभर मिरवायचे ||६||
चिखलातून चालताना मळ्याचा वाटेवर
तुम्ही उचलून मला घेतले खांद्यावर
माझं ओझे वाहण्याची तुम्हाला सजा
पण... मी अनुभवली मस्त मज्जा!||७||
माझ्या भल्यासाठी बाबा तुम्ही
एकच झिजविला चपलांचा जोड
घरात होते नव्हते सारे काही
तुम्ही व आईने दिली सारी मोड ||८||
उपवासाचा नावाने उपाशी राहून मला
मुखीचे घास तुम्ही भरविले
अनंत खस्ता खाऊन बाबा
तुम्ही मला सुशिक्षित केले ||९||
बाबा, माझ्या सर्व सुखाचे
तुम्हीच तर खरेखुरे धनी
मी फक्त निमित्त हो बाबा
सारे सुख उपभोगा ही माझी हमी ||१०||
तुम्ही म्हणता न् बाबा, बेटा!
तू तर माझ्या स्वप्नांतील रत्न
बाबा तुम्ही फक्त हाक द्या
साद देण्यासाठी करीन सारे यत्न ||११||
बाबा, मला जाणीव आहे हो...
माझ्यावरील तुमच्या महान ऋणाची
स्विकारा न् आतातरी सेवा
त्यातून थोडं उतराई होण्याची....!
पण... बाबा, तुम्ही आता ऐकायचं
श्रमातून निवृत्त व्हायचचं...! ||१२||
©कवि:- प्रा. पुरुषोत्तम पटेल
मु पो.म्हसावद, ता.शहादा
patelpm31@gmail.com