Kaayguru.Marathi

बुधवार, नोव्हेंबर १६, २०१६

नोटांबंदी आणि शेतकऱ्याचा बळी

   बालपणी पाऊस व पावसाची गोष्ट  सांगताना आणि पावसाळ्यात  उंच आभाळात काळे ढग दिसू  लागले  की आम्ही  एक बडबड गीत सदानकदा  म्हणायचे.
          " ये रे ये रे पावसा
             तुला  देतो पैसा
            पैसा. ...झाला खोट्टा
            पाऊस आला  मोठ्ठा
पाऊस पडतो रिमझिम, अंगण झाले  ओलेचिंब
ये..ग ये...ग सरी , माझे मडके  भरी
सर आली  धावून मडके  गेले वाहून  "
या बडबड गीताचा कवी-रचयिता कोण ? कुणालाही  माहिती नाही. पण.. कवी त्रिकालगामी असावे असे मला वाटते. कारण  माझा  शेतकरी  बाप तेव्हाही मडकेभर पाण्यासाठी  पावसाला साकडे  घालत  होता, तरी धोधो पाऊस  पडायचा व त्यांत मडके  पाण्याने भरले जाऊनही पाण्यात  वाहून  जायचे.
म्हणजे  मोठा  पाऊस  पडला  तरी माझ्या  शेतकरी बाप तहानलेलाच राहायचा.म्हणजे त्याची स्वप्ने  अपूर्णच राहायची.ही परिस्थिती  आज खूप बदलली आहे;  असे कोणीही म्हणणार नाही.
     खूप वर्षानंतर यावर्षी (2016) हे सर्व  पुन्हा एकदा
आठवल ! कारण 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजीनी रात्री 🕗8-00 वाजता चलनात  असलेल्या रूपये 500 व 1000 च्या  सर्व  नोटा(चलन)रात्री🕛 12 वाजेनंतर चलनातून रद्द  करण्याचा निर्णय जाहीर केला. सर्व  नागरिकांनी  आपल्याकडील या नोटा दि.30/12/2016 पर्यत बॅकेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. माझा शेतकरी  बापासाठी  हा मोदी निर्णय
" आगीतून   वाचलो , फुफाट्यात   पडलो ." असाच!!!!
     या वर्षी  पावसाने काही ऐंकलच नाही.मोठा रूसवा धरून बसला.त्याचा रूसव्याने खरीप हातचा गेला.दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पिके डोळ्यासमोर करपून जाऊ लागली. जणू मेघातील जलबिंदु सागराने काढून घेतले ...! डोळ्यातले अश्रूही रोज -रोज गळू लागल्याने  तेही संपून गेले !
आणि  चमत्कार घडला..! ऑक्टोबर  महिन्यात  सर्वत्र हाहाकार माजविणारा पाऊस पडला.परतीचा पाऊस .... जणू जलप्रपात होऊन बरसला!
खरिपाची आशा पल्लवित  झाली  खरी,पण बडबडगीतातील मडके  जसे वाहून जात असे  तसे आताही वाहून गेले. मूग , उडीद, सोयाबीन, पावसात शेतातच सडून  नष्ट झाले. पण या परतीच्या  पावसाने हाहाकार  माजवला पण... माझा शेतकरी बापाला जगण्याची संधी दिली  हेही नसे थोडके !
   रब्बी हंगाम पुर्ण क्षमतेने  घेईन.वाहून गेलेले मडके  आता भरणारच ! या संकल्पाने  शेतकरी बाप कामाला लागला.काळ्या आईच्या  सेवेसाठी ईकडून-तिकडून कर्ज काढून बी-बीयाणे खरेदीसाठी  कृषी केंद्रावर जाणार  त्याच काळात  मोदी सरकारने  नोटबंदीचे आदेश  जाहीर केले. झाले. .. पोटात  धस्स.
   माझा शेतकरी  बाप हिंमत  संपली ,स्वाभिमान  दुखावला तर हतबल होतो. माझ्या  शेतकरी  बापाची 2 हेक्टर  बागायती शेती आहे. 1 हेक्टर क्षेत्रात ऊसाची लागण करायचीय ,त्यासाठी शेती मशागतीला रू.9000/- ,ऊसबेणे रू.10000/-,खते 7000/-,ऊसलागण 5500/- गडी एक- 1000/- असा प्रारंभीचा एकूण कमीतकमी  खर्च 32500/- लागणार आहे. उर्वरित  एक हेक्टर  साठी वेगळा  खर्च.  खर्च  भागवायचा तर दररोजच्या  बॅक खात्यावरील प्राप्त  मर्यादा  खुपच तुटपूंजी आहे.खात्यावर रक्कम  आहे,पण काढायला  प्रचंड मोठी रांग! त्यात  नियम व मर्यादा अडचणीच्या. मग ऊस लागवड  करायची कशी ? व केव्हा  ,
   घरात  कापूस पडून आहे .व्यापारी म्हणतात,
" जुन्या नोटा घेणार तर जास्तीत जास्त  भाव  देणार.व नव्या नोटा हव्या तर भाव कमी व पेमेंट  आठ दिवसांत  देईन ." असे संधीसाधू  व्यवहार. मग कसे करावे  माझ्या  शेतकरी  बापाने ? तुम्हीच सांगा  मोदीजी !
   मोदीजी (मायबाप सरकार )  जाहीरपणे म्हणताहेत,
" मित्रहो,आणखी 50 दिवस (दि.30/12/2016) कळ सोसा."
त्यांचे ऐकून  माझा  शेतकरी बापाने जर इतकी कळ सोसली तर येणारे रब्बी हंगामातील  पिकही हातचे जाईल. बाजारपेठेत  उधार द्यायला  आजच्या  घडीला  कोणी तयार नाही. त्यामुळे  माझ्या  शेतकरी बाप -सरकार  त्याला " बळीराजा  " म्हणते.पण सरकारच्या एका  रात्रीच्या निर्णयाने  राजा का बज गया बाजा ! या बाबतीत  सर्वच राजकीय पक्ष  केवळ  दिखाव्यापुरते.
पंतप्रधान  मा.नरेंद्रजी मोदीजींना माझा  एक सवाल .
' हेच का अच्छे  दिन ? '
आतापर्यंत  माझा शेतकरी बापाला नियंत्याने साथ  नाकारली.म्हणून त्याने मरण जवळ  केले. आजतर तुम्हीच नाकारता आहात .मग त्याने कोणाकडे न्याय मागावा ? आत्महत्या  हा उपाय योग्य  ठरेल का हो ?
तात्यासाहेब वि.वा.शिरवाडकर यांच्या अप्पासाहेबांच्या शब्दात  सांगायचे तर, 
To be or not to be,that is the question..
जगावं की मरावं
हा एकच सवाल  आहे.
आणि  पुढे अजून  ते  म्हणतात,
....आणि  करावा सर्वाचा शेवट
एका प्रहाराने
माझा तुझा याचा आणि  त्याचाही....
करणार का विचार  मा.नरेंद्रजी मोदी साहेब  आणि  मा.देवेद्रजी फडणवीस साहेब ?
मायबाप हो , कळकळीची  ही विनंती मान्य होईल ना?

● प्रा.पुरूषोत्तम पटेल,
   मुं.पो.म्हसावद,जि.नंदुरबार
   भ्रमणध्वनी -9421530412
   patelpm31@gmail.com

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...